October 22, 2008

माझा गाव आणि माझे लहानपण-भाग-१

मुंबई- गोवा हायवेशेजारी वसलेलं माझं गाव- खारेपाटण(Kharepatan). रत्नागिरी- सिंधुदुर्गजिल्ह्यांच्या सीमे वर वसलेलं. हायवे वरून पाहीलं तर गाव खाली रहातो. असेल एक १०० फूट खाली नदीच्या किनारी. पण वरून छान दिसतं चित्र. गावातल्या घरांची कौलारु छपरं,भातशेती, माड, कलमं असं अगदी टीपीकल कोकणी गाव वाटतं, पण मला दिसलेलं, लहानाचा मोठा होईपर्यंत अनुभवलेलं गाव-- ते तर वेगळेच आहे.

हायवे वरून झोकदार वळण घेऊन गाडी खाली उताराला लागली की समोर आमची शाळा लागते. आणि तेव्हा आमचं गाव सुरु होतं- खारेपाटण. शाळेजवळून पुढे गेलात तर "राऊतांची विहिर" दिसते. आमच्या लहानपणी तिथे एक विचित्रपणे वाढलेला माड होता. विचित्र अशासाठी की सरळसोट वाढून तो अचानक वळण घेता झाला होता. त्यामुले तो एखादा विळा/कोयता उभा करुन ठेवल्यासारखा दिसे! ती आमच्या शाळेजवळची राऊतवाडी, विहिरीवर पाणी भरणार्या बायका, त्यांच्या गप्पा,त्यांचे कपडे धुताना येणारे फट- फट असे लयबद्ध आवाज, काढण्याने पाणी काढून, कळशीत ओतताना होणारा तो विशिष्ट नाद, आणि ह्या सगळ्याचा एकत्रित होणारा परिणाम , मी अजूनही तसाच जपून ठेवला आहे मनाच्या तळाशी!

विहीरीकडून पुढे गावात निघालो की डाव्या हाताला थोडं लांबवर राणे डॉक्टरांच्या दवाखान्याकडे नजर जाते. . लहान असताना त्यांच्या दवाखान्यात बघितलेले त्यांचे पदवीदानाचे फोटो, त्यांच्या बॅचचे फोटो अजून आठवतात. तेव्हा तर त्यांच्या दवाखान्यातील, पेशंटाना बसण्याच्या खोलीत भिंतीवर लावलेले शरीराच्या विविध भागांचे क्रॉस्-सेक्शन्स, विशेषतः मानवी जबड्याचा कुण्या फिरंगी चित्रकाराने काढलेला सेक्शन,त्यातील ती पिंग्या-सोनेरी केसांची मुलगी, आयुष्यात पहिल्यांदाच बघितलेली ती फिरंगी रंगसंगती, जुनी शिसवी लाकडाची,हात ठेवण्याची जागा गोल केलेली बाकं, काचेच्या बाटलीतून, बाहेर मापाची कागदी पट्टी लावून मिळणारं लाल औषध, आणि " काय गे, आपली बाटली येताना घेऊन येवक काय झाला?" असे लटकेच राग भरणारा कंपाऊंडर,- सगळं अजून जसच्या तसं आठवतं. विशेष म्हणजे आजही त्यांचा दवाखाना आहे तसा , त्यांच्या पुढील पिढीने जपलाय!!


रस्त्याच्या दुतर्फा असणारे भाताचे मळे आणि उजव्या अंगाला दिसते ती खडकवाडी, इथल्या देवस्थळींच आमच्या गावात मेडिकल दुकान आहे. तेव्हा त्यांच्याकडे कधीही गेलं तरी आल्याची गोळी हातावर मिळायचीच. आपल्याकडे एखादे औषध नसल्यावर ते आजोबा, थोडं इकडे-तिकडे बघून म्हणायचे " अमॄतांजन,?अमॄतांजन,अमॄतांजन,अमॄतांजन नाsssहीsss. म्हणजे कसं गिर्हाईकलाही समाधान वाटायचं की एवढं शोधून देखील आपल्याला हवंय ते औषध नाही बुवा मिळत. "लर्न द आर्ट ऑफ सेयीन्ग नो" चे धडे मी आज शिकतो, पण ती कला त्या देवस्थळीआजोबांना तेव्हाच अवगत होती!!


केदारेश्वराच्या मंदिराजवळून पुढे गेल्यावर एस्.टी स्टँड. तिथला आमचा अकबर पेपरवाला, त्याची त्याच्या भावाबरोबर पेपरविक्रीवरुन होणारी भाडणं आणि आजूबाजूच्या स्टाँल्सवरून येणारा कांदाभज्यांचा घमघमाट हे दोन गोष्टीं अजूनही आहेत. स्टँडशेजारच्या तॄप्ती कोल्ड्रींक हाऊसमधे तेव्हा मिळणार्या लस्सीची चव आणि दर्जा अजूनही आहे तसाच. पण तिथला तो गोटी सोडा फोडताना येणारा आवाज आता मात्र येत नाही कारण गोटी सोड्याची जागा आता आधुनिक कोला आणि पेप्सीने घेतली आहे.


इथून गावाची बाजारपेठ सुरु होते. बाजरपेठेतील लाल मातीच्या रस्त्यावर, धूळ उडू नये म्हणून , सपासप पाणी मारणारे व्यापारी बघत पुढे निघालं की, डाव्या बाजूला एक चप्पलांचं दुकान दिसतं. मी लहान असताना म्हणजे १९८०-८२ साली ते दुकान, भारत-पाकिस्तान फाळणीतून आमच्या गावी आलेल्या एका सिंधी कुटुंबाने सुरु केलं. त्यांच्यासमोर तळगांवकरांचं दुकान, पानाच्या करंडीवर पाणी मारत, एका हाताने ते देठाच्या बाजुने खायची पाने अशी सफाईने मोजत. त्यानंतर त्या पानांची उभी गुंडाळी करून त्याला बारीक धागा बांधून देत असत. इतका वेळ त्यांच्या दुकानासमोर उभे राहिलात की तंबाखूचा उग्र नी तिखट गंध तुमचा नाकात घुसलाच समजा!! असोली सुपारी, सुपारी खंड आणी पूजेला लागणारी अख्खी सुपारी त्यांच्याचकडे मिळायची.

No comments:

Post a Comment