पुढे अपार्टमेंटचे कुलुप, आलो तेव्हा बरोबर आलेल्या माईकने उघडून दिले. पण दुसरया दिवशी ऑफिसला जाताना दार लॉक करता येइना. मला लॉक म्हणजे क्लॉकवाईज माहिती हो, बराच वेळ खटपट करुन लक्षात आलं, उलट फिरवून बघूया, म्हणून पाहिलं तर काय, झालं की लॉक!! पुन्हा घरी आलो तेव्हा असाच घोळ. तेव्हा पण थोडया वेळाने उलट फिरवून पाहिल्यावर खुल जा सिम सिम झालं. लाईटची बटणं तर असतातच उलटी, त्याची झाली सवय, पण किचन कॅबिनेटच्या दारं , किंवा कोणताही एका झडपेचा दरवाजा, आपल्या भारतीय पद्धतीपेक्षा उलटाच असणार. म्हणजेच त्याला डावीकडे बिजागरी( हिंजेस) आणि उजवीकडे हँडल असणार. अजूनही किचन कॅबिनेटस उघडताना हात डावीकडे जातो, पण तिथे हिंजेस असतात!! मॉल्स मधली, दूध, दही, आईस्क्रीम, फ्रोजन फूड्सची कपाटंसुद्धा उलटी. आता ती सगळी एकमेकाला चिकटून ठेवलेली असतात. त्यामुळे काचेतून दिसणारया,आपल्याला हव्या असलेल्या वस्तूसमोरचा दरवाजा उघडला की समोर भलतीच वस्तू असते. कारण आपण पुढच्या कपाटाचा दरवाजा उघडलेला असतो!! इथे टाकलेले फोटो पहा. त्या फोटोंवर क्लिक केल्यावर ते मोठे दिसतील.
इथल्या जाहिरातीत दिसणारे कॉल सेंटर्सचे नंबर्स. ते नंबर म्हणजे आकडे नसतात, तर इंग्रजी अल्फाबेट्स असतात. म्हणजे इथेही उलटेपणाच की? मी आलो तेव्हा एअरलाईनच्या बॅगेज क्लेमचा नंबर दिला होता. तो असा 1-800-2235-BAGS. आता ही BAGS ही काय भानगड? हा नंबर डायल तरी कसा करायचा हो? तेव्हा समजलं की फोनच्या डायलपॅडवर जी इंग्रजी अल्फाबेट्स प्रत्येक आकडयाच्या खाली असतात, ते आकडे डायल करायचे, म्हणजे, BAGS साठी 2247 डायल करायचं. इथल्या लोकांच्या मेमरीला नंबर ध्यानात ठेवायचा जास्त ताण पडू नये म्हणून ही युक्ती. तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर डायल करा BOOK म्हणजे 2665 वगैरे वगैरे..
इथे एका विकांताला(हा शब्द मी माझा मित्र प्रशांतकडून उसना घेतला आहे, वीकेंड्साठी त्याने कॉईन केलेला हा शब्द!!) कारमधून भटकूया म्हणालो. माझ्याकडे आन्तरराष्ट्रीय चालक अनुमती ( ईन्टरनॅशनल ड्रायव्हींग परमीट) आहे, आणि मी रहातो तिथे विशेष ट्राफीक नाही त्यामुळे, म्ह्टलं की बघू चलवून गाडी इथे. न्यूयॉर्कचा अनुभव होताच, तसेच मी इथल्या कलिगच्या गाडीत त्यांच्या शेजारी बसलो होतो, त्यामुळे भीड चेपली होती. पहिल्यांदा अपार्टमेंट्च्या आसपास चालवली. काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे मेन रोडवर गेलो. हो जाताना उजवीकडे व्यवस्थित शॉर्ट टर्न न चुकता मारला. स्वतःलाच शाबसकी दिली.पुढे गेलो, आता सिग्नल होता. केला की घोळ भाउ, मी तिथे!! वळल्यावर पाठीमागून सायरन वाजवत कॉप हजर. समोर ट्राफिक नव्हतं त्यामुळे काही झालं नाही, पण मी चक्क राँग साईडला घुसलो होतो!! कॉपने परिस्थिती समजवून घेऊन, मोठया उदारपणे सोडून दिले!! वरती विचारले की, सोडू का घरी परत नेऊन? तेव्हापासून कार, स्वतःच चालवत कुठेही जात नाही!!
No comments:
Post a Comment