October 23, 2008

अमेरिकेतील खादययात्रा!! भाग-२











वरती सांगितल्याप्रमाणे सफरचंद, पीचेस, प्लम फ्रूट्स,पीअर,वाटरमेलन,टरबूज,स्ट्रॉबेरी अशी विविध फळं तर आहेतच, पण त्याच्या जोडीला लेट्यूस चे नानाविध प्रकार असतात, बीटाच्या रंगाचा कोबी, प्रचंड भोपळे, एक मिरची पसाभर सहज होईल अश्या लाल, पिवळ्या, हिरव्या ढोबळी मिरच्या, ब्रोकोली, २ पौंडी कॉलीफ्लावर, फूटभर लांब, आणि बोटभर लांब गाजरं, कांदापात, मोहरीचा पाला, रताळी, काटे-कणगरं, ऑलिव्ह- ताजे आणि खारवलेले, अस्पारागसच्या मुळ्या, रताळी, कांदे- बटाटे, अर्धा फूट लांब केळी, आणि एव्हढं कमी म्हणून की काय, चहाची पात सुद्धा आहे उपलब्ध. वाटाणे, हरभरे, मटार, राजमा अशी कडधान्य नका घ्यायला विसरू, हो. ओला नारळपण मिळतो. अगदी खोबरं खरवडून!


मग हे सगळं घेऊन स्वयंपाक करायचा तर कांदा- लसूण पेस्ट? ती सुद्धा आहे. त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. लसणीची बारीक पूड मिळेल, तसेच लसणीचे क्युब्ज मिळतील( क्यूब्ज करण्याइतपत जाड पाकळी असते लसणीची!!) कांदयाचे ग्रॅन्यूल्स आवडतात की पावडर? ते ही आहेत. कांदा- लसूण पेस्ट बरोबर, आलं घालून मिळालं तर काय बहार येइल ? नाराज नका होऊ ते ही मिळेल. टोमॅटोचे किती प्रकार? डाईस्ड(काप केलेला),मिन्स्ड(छोटे गोळे केलेला),बॉईल्डपील्ड-व्होल,( उकडून सोललेला पण अख्खा!!) प्युरी आणि पेस्ट. एक ना अनेक, दम लागेल, बेताने वाचा.


आणि मग मसाल्यांचं काय हो? प्रवीणचे मसाले आहेत ( पण किंमत बघून, ५० ने गुणून झालं की पाकीट परत कपाटात आपसूकच जाईल) पण म्हणून काय झालं? वेस्ट इंडीज आणि मेक्सिकोहून आलेले मसाले घ्या ना.!! दालचिनी, तमालपत्र, पांढरी मिरी, काळी मिरी, धने,जिरं,मोहरी, मेथी संकेश्वरी मिरचीच्या तोडीसतोड लाल मिरची एव्हढं कमी म्हणून की काय दगडफूल सुद्धा आहे.


आता एव्हढं सगळं चांगलं-चुंगलं हादडल्यावर स्वीट डीश हवी ना? का नाही? विविध आईस्क्रीम्स आहेत. त्यातही ब्लॅक फॉरेस्ट, वालनट- आलमंड, ड्राय्-फ्रूट, फ्रेश- फ्रूट असे तोंडाला पाणी सोडणारे प्रकार आहेत. अट एव्हढीच की कमीत कमी २पौंडी पॅक मिळेल, जास्तीत जास्त १०पौंडापर्यंत. इथे पहिल्यांदा आईस्क्रीम्स टब असे का म्हणतात असा प्रश्न पडला होता. पण ते आपल्याकडच्या ऑईलपेंट्च्या प्लॅस्टीकच्या डब्यांएवढे आईस्क्रीम्सचे कंटेनर पाहून टब ह्या नावाव्यतिरिक्त दुसरं कोणतंही नाव त्याला शोभून दिसणार नाही याची खात्री होते.

इथल्या चॉकलेट्सबद्दल मी काय सांगावं? केक आणि पेस्ट्रीजची रेलचेल असते. हलोविनसाठी भोपळ्याचा केक मला आपल्या दसर्याच्या भोपळ्याच्या घारग्यांची आठवण करुन गेला. आगेमागे येणारे दोन्ही सण भोपळ्याशिवाय साजरे नाही होत. चॉकलेट फज केक,चीज केक, प्लम फ्रूट् केक, ब्लॅक फॉरेस्ट,स्ट्रॉबेरी, रास्पेरी केक, ऑरेंज्-ब्लॅक ग्रेप केक, अशा नानाविध प्रकारांबरोबरच तेव्ह्ढीच नवलाईची मूज मिळतात- मॅगो, पायनापल चॉकलेट ह्या आपल्याकडे उपलब्ध असणार्या मूजबरोबरच, मी इथे किवी, ग्रेप आणि क्रॅनबेरीचे मूज अवश्य खातो. मूज म्हणजे आईस्क्रीमही नाही आणि केकही नाही असा अर्धवट प्रकार. पण तो मूज केक नको हं फक्त मूज आहे का ते पहा.

विविध प्रकारच्या फळांचे रस मिळतील अगदी आपल्या आंबा, संत्र्यापासून ते किवी, लिची, स्ट्रॉबेरी, रास्पेरी,क्रॅनबेरीच्या रसापर्यन्त. ही सगळी फळं- डाईस्ड( काप काढलेली) मिळतील, टीनपॅक करुन. फोडून खाल्ला की दिला फेकून. तशी नकोत तर फ्रेशली कट ह्या प्रकारात घ्या की!!

अमेरिकेत खादाडीला फुल्ल स्कोप आहे बरं का भाऊ, फक्त तुमची नजर हवी आणि काही दिवस आपल्या नेहमीच्या डायेटमधे बदल करुन हे सगळं एक-एकदा तरी ट्राय करुन बघायची हौस!!
(नमुन्यादाखल फोटो इथे दिले आहेतच. अजून फोटो बघण्यासाठी भेट द्या माझ्या पिकासा वेब अल्बमला)




http://picasaweb.google.com/kapilkale75/JHLKxF#

2 comments: