October 23, 2008

अमेरिकेतील खादययात्रा!! भाग-१







इथे आल्यावर, आजूबाजूला बघितल्यावर अमेरिकन लोकांची खादाडी जाणवतेच. आल्यावर पिझ्झाह्टमधे गेलो होतो. तिथे वेजी असा एक पिझ्झा उपलब्ध असतो. तो मेडीयम ऑर्डर केला. इथे कोणत्याही रेस्टारंटात सॉफ्ट ड्रींक भरपूर मिळतात. आणि त्याचा ग्लास साधारण अर्धा लिटरचा असतो. त्यात निम्मा ग्लास आईसक्युब्ज घालून उरलेल्या जागेत सॉफ्ट ड्रींक भरले जाते. पहिला ग्लास संपत आला की दुसरा भरून मिळतो, दुसरा संपला की तिसरा. त्याला काही लिमिट नाही. पण निम्मा ग्लास आईसक्युब्ज घातलेले ते पाणचट सॉफ्ट ड्रींक एक ग्लास सुद्धा संपत नाही. हे लोक मात्र, म्हणजे, आबालवॄद्ध सगळे, ते आईसक्युब्ज कुरुम, कुरुम, असे चावून खात, सॉफ्ट ड्रींकचे ग्लासवर ग्लास रिचवत असतात. पाणी सहसा कोणी पिताना मी तरी नाही बघितला!! पेप्सी, कोक, किंवा फ्रूट ज्युस! आणि त्याबरोबर निम्मा ग्लास आईसक्युब्ज हवेतच. माझ्या ऑफिसमध्ये शेजारच्या क्युबीकलमधून वेळी-अवेळी कुरुम, कुरुम आवाज कसला येतो त्याचा उलगडा मला पिझ्झाह्ट मधे झाला!!


तर असो! मी काय सांगत होतो, मेडीयम वेजीपिझ्झा ऑर्डर केला. त्याच्याबरोबर गार्लिक ब्रेड, चीज डीप आणि सलाड. ऑर्डर सर्व्ह होईपर्यन्त माउंटन ड्यू घेतले. ते वर सांगितल्याप्रमाणे आले-निम्मा ग्लास आईसक्युब्ज घालून! मित्राशी गप्पा मारताना पहिला ग्लास संपवला. म्हणून दुसरा ग्लास आणू का, असं विचारयला आलेल्या वेट्रेसला म्हटलं की "येस, प्लीज रीफील, बट विदाउट आईसक्युब्ज" कुठ्च्या परग्रहावरुन आलाय हा प्राणी, असे भाव चेहर्यावर आणत तिने दुसरं ग्लास आणून ठेवला.सॉफ्ट ड्रींक विदाउट आईसक्युब्ज हे काही तिला पचनी पडलेलं दिसलेलं नव्हतं.

पण आता आलेला मेडीयम वेजीपिझ्झा पाहून आम्ही दोघेही हादरलो, त्या सहा तुकड्यांपैकी दोघात कसेबसे चार संपले. बहुतेक दोन ग्लास माउंटन डयू चा परिणाम असावा.त्या स्मॉल पोर्शन गार्लिक ब्रेडकडे पाहून वाटलं की हा स्मॉल तर लार्ज केव्हढा असेल? त्त्याच्यासोबत असेलेले चीज हे डीप करण्यासाठी होतं की चमच्याने खाण्यासाठी ते कळेना! दोन माणसांसाठीचे सलाड म्हणजे आम्हा दोघांना आठवडयाची पालेभाजी झाली असती.

शेवटी होईल तेव्हढे संपवून बाकीचे पॅक करुन घेऊन आम्ही निघालो.पण बाकी सर्व टेबलांवर यथेछ खादाडी सुरु होती. ग्लासावर ग्लास सॉफ्ट ड्रींक कुरुम, कुरुम आवाज करत रिचवली जात होती. चिकन सलाड, टुना आणि सलमॉन माश्याचे सलाड, टर्कीब्रेस्ट, बीफस्टीक, लार्ज पिझ्झे, लार्ज गार्लिक ब्रेड विथ चीज डीप आरामात संपत होते. आसपासची अमेरिकन माणस डीनरांनंदात तल्लीन झाली होती!!

इथे खाण्याचे सगळेच प्रकार किंगसाईझ!! तयार फ्रोझन फूड असूदे, किंवा दही , दूध चीज असूदे. सगळ्याचं पॅकिंग मोठं मिळणार. दूध लिटरमधे नाही मिळत, एक किंवा अर्धा गॅलन मिळतो ( १ गॅलन= ३.७८ लिटर!!) दह्याचा, सँडविच स्प्रेडचा, पी-नट किंवा आलमंड बटरचा, चीजचा,पॅक कमीतकमी २ पौंडी( म्हणजे साधारण १ किलो). ब्रेडचा लोफ सुद्धा दिड पौंडी. सफरचंद, पीचेस, प्लम फ्रूट्स,पीअर,वाटरमेलन,पम्प्कीन काहीही घ्या ३पौंडी आकर्षक भरलेल्या पिशव्या मिळतील, लूजपण मिळतात. छोटया भोपळ्याएव्हढा टोमॅटो बघायला मिळेल. कांदे- बटाटे बचक्यात बसणार नाहीत-एकाचं वजन असेल अर्धा पौंड! वेफर्सची पाकीटं सुद्धा अशीच प्रचंड. कॉर्न ऑइलची, ऑलिव्ह ऑइलची बाटली कपाटात सहसा न मावणारी! महात्मा ब्रॅन्ड तांदूळ मिळेल १०पौंडी पॅकमधे. विश्वास बसत नाही . फोटो पहा.

आटयाचे कितीप्रकार सांगू? ब्लीच्ड आटा, स्टोन ग्राउंड आटा( म्हणजे काही प्रक्रिया न- करता, आपल्या चक्कीवर मिळतो तसा!!) ऑल्-परपज आटा,कॉर्न्-मील( मक्याचा प्रकार) ओट-मील घ्याल तेव्ह्ढे !!


मांसाहारींसाठी तर इथे स्वर्ग आहे. पोर्क,मटण, लॅम्ब, बीफ, चिकन, बेकन, टर्की ( बदक?) , कोळंबी, लॉबस्टर, टुना आणि सलमान फीश (खान नव्हे) चे विविध प्रकार दिसतील, किसलेले लांब शेवयांसारखे बीफ, कणकीच्या गोळ्यासारखे बीफ, जाडसर काप काढून ठेवलेले बीफ मिळेल, पापडाची लाटी करायच्या आधी आपण जशी लांब गुडाळी करतो तशी लांब गुंडाळी केलेले बीफ तर फूटावर मिळते. म्हणजे पॅकच्या बाहेर किती फूट लांब गुंडाळी ते लिहिलेले असते. बहुधा अश्या गुंडाळ्यांचे डायमीटर सगळीकडे सारखे असावेत!!


पोर्कच्या चरबीत तळलेल्या वेफर्स आणि चिकनच्या चरबीतील बिस्किटे हा इथला हीट आयटेम आहे. बहूतेक वेळा हे दोन्ही पदार्थ आउट ऑफ स्टॉक असल्याचे बोर्ड लागलेले दिसतात.
हे सगळं वाचून ह्या पॄथ्वीतलावर चार पायांवर चालणारे कोणतेही प्राणी इथे खायला उपलब्ध असतात की काय अशी शंका आल्यास ते वावगे नाही.


असं असेल तर शाकाहारींनी खायचं तरी काय?... नाराज नका होऊ, वाचा भाग-२ नमुन्यादाखल फोटो इथे दिले आहेतच. अजून फोटो बघण्यासाठी भेट द्या माझ्या पिकासा वेब अल्बमला.






http://picasaweb.google.com/kapilkale75/JHLKxF#



No comments:

Post a Comment