October 24, 2008

घरोघरी मातीच्या चुली.. अमेरिकेतील निवडणूक प्रचार

सध्या इथे निवडणूकांचे दिवस आहेत. अगदी आपल्याकडच्यासारखा नसला तरी थोडाफार तसाच प्रचार सुरु आहे. ऑफिसमधे तीच चर्चा सुरु असते.

डेमोक्रॅटीक पक्षाचे बराक ओबामा हे रिपब्लिकन जॉन मॅक्-केन यांच्याविरुद्ध उभे ठाकले आहेत.बराक ओबामांचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे. आजपर्यन्त झालेल्या तिन्ही आमने-सामने डिबेट्समध्ये तर ओबामा भाव खाउन गेले. उपहास, नर्म्-विनोद,वेळोवेळी वस्तुस्थितीची जाणिव करुन देणे आणि समोरच्यावर चिखलफेक न करता आपले मुद्दे ठाशीवपणे मांडण्याच्या त्यांच्या शैलीमुळे, मॅक्-केन हे पुरते बॅक-फूटवर गेलेले आढळले. गेल्या ८-९ वर्षातील रिपब्लिकन बुश शासनाचा कारभार, आणि सध्याची मंदीसादॄश्य परिस्थिती मॅक्-केन यांच्या काळजीत भर घालत आहेत. त्यांच्याकडे मुद्द्यांचा अभाव दिसतो आणि ओबामांएव्हढा कोणत्याही प्रश्नाचा अभ्यासही दिसत नाही.


डेमोक्रॅट पक्षाचे तिकिट मिळवण्यासाठी हिलरी आणि ओबामा यांच्यातील लढत, ओबामांनी जिंकून इतिहास घडवला. प्रथमच एक आफ्रो-अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या इतका जवळ आला आहे. त्या दोघांपैकी कोणीही जिंकले असते तरी तो इतिहासच होता कारण तर दुसरी महिला होती. पण एक झालं, डेमोक्रॅट पक्षाने त्या दोघांना उमेदवारी देऊन आपली प्रतिमा पुरोगामी बनवली.

आंतरराष्ट्रीय राजकारणाचा कमी अनुभव असलेल्या ओबामांनी त्या विषयातील महारथी जो बिडेन यांना आपला उपाध्यक्षपदाचा उमेदवार बनवले तर हिलरींना मिळणारा महिलांचा पाठिंबा लक्षात घेऊन, राजकारणात मुरलेल्या धूर्त मॅक्-केन यांनी अलास्काच्या गव्हर्नर सारा पॅलिन यांना आपला उपाध्यक्षपदाचा उमेदवार बनवले. तोपर्यन्त ह्या पॅलिन बाई कुणाला ठाउकही नव्हत्या. ह्या अनपेक्षित खेळीने ओबामांची कॅम्पेन १-२ आठवडे पिछाडीवर होती.पॅलिन बाई, त्यांचे फॅशनेबल कपडे,त्यांची धर्म श्रद्धा, त्यापोटी त्यांना झालेली पाच मुलं, त्यापैकी सगळ्यात मोठया षोडशवरशा मुलीला तिच्या बॉय-फ्रेंडपासून गेलेले दिवस (ज्यूली आठवतोय का?), पॅलीन बाईंचे फॅशनेबल ड्रेस ह्याने जणू काही अमेरिकेच्या समाजमनावर मोहिनी घातली. बाई आपल्या कुटुंब-कबिल्यासह प्रचारासाठी दिसू लागल्या. त्यांची ५ महिन्याची पोटुशी मुलगी, त्यांच्या प्रचाराचे जणू साधन बनली. धर्मनिष्ठेपोटी आपण मुलीचा, गर्भपात न करता तिचे, तिच्या बॉय-फ्रेंडबरोबर कसे लग्न लावून देणार आहोत, त्याच्या सुरस कथा साक्षात पॅलीन बाईंकडूनच ऐकाव्यात. त्या ऐकून इथल्या कॅथॉलिक सनातन्यांचे आपल्या बाजूने ध्रुवीकरण होइल अशी अपेक्षा असणारे रिपब्लिकन काही दिवसातच जमिनीवर आले. कारण ह्या सगळ्याला कंटाळलेली अमेरिकन जनता शेवटी, ओबामांकडे झुकती झाली. (आपल्याकडे त्यांना पालिन असे म्हटले जाते, इथे उच्चार पॅलिन असा करतात.बराक ओबामांना बर्राकोबामा, तर मॅक-केन ह्यांचा उच्चार जॉनकेन असा केला जातो.)


ओबामांनी छोटे उद्योगधंद्याना, तसेच मध्यम वर्गीयांना करसवलती देण्याचे घोषित केले आहे. इथे हेल्थ-इन्शुरन्स फार महाग आहे. त्यामुळे आम्ही तो स्वस्त कसा करु हे, ओबामा प्रत्येक डिबेटमधे मांडताना दिसतात. शिक्षणव्यवस्थेतही महत्त्वाचे बदल घडवून आणण्याचे त्यांचे मनसुबे त्यांनी जाहीर केले आहेत. इराकपेक्षा , अफगाणीस्तान- पाकिस्तानात सैनिकी कारवाईची गरज असल्याचे ओबामांचे मत आहे. इराक युद्धात किती मिलियन डॉलर्स फुकट चालले आहेत त्याची ते आकडेवारी देतात. आपला हेल्थ-इन्शुरन्सचा मुद्दा पटवून देताना, आपल्या आईच्या आजारपणाच्यावेळी इन्शुरन्स कंपनीबरोबर आपल्याला किती भांडावे लागले होते ह्याची ते भावनाविवश होऊन आठवण करुन देताना पाहून, आपल्या देशातील राजकारण्यांची आठवण येते. कोणत्याही फोरममध्ये, आम्हा पोलिटीशीयन्सना असलेल्या सुविधा, सामान्य माणसाला मिळत नाहीत, ह्याची आपल्याला किती खंत वाटते, ह्याची ओबामा वारंवार आठवण करून देतात असे म्हणण्यापेक्षा,संभाषणाची गाडी ह्याच मुद्द्यावर आणण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. ते बघून आपल्या देशातील आम आदमीचा नारा लावणार्या राजकारण्यांची आठवण येते.
बेल आउट पॅकेजचे श्रेय दोन्ही उमेदवार घेताना दिसतात.


परंतु मॅक्-केन यांच्याकडे मुद्द्याची कमतरता जाणवते. नवीन मुद्दे मांडण्यापेक्षा ओबामांचे मुद्दे खोडण्यावरच त्यांचा भर दिसतो. इराक युद्ध हे देवाने सोपवलेली जबाबदारी आहे, आणि खर्च होतोय म्हणून माघार घेणे म्हणजे आतापर्यन्त सांडलेल्या रक्ताचा अपमान आहे,असे सनातन्यांच्या हृदयाला हात घालणारे,टाळीखाउ मुद्दे ते मांडतात.त्यांच्या घरातील, आजोबांपासून चालत आलेल्या, सैन्यात सेवा करण्याच्या परंपरेचे ते भांडवल करायचा प्रयत्न करतात. भारताशी केलेया अणु- करारामुळे, अमेरिकेला किती बिलियन डॉलर्स धंदयाची संधी उपलब्ध झाली आहे, ह्याचा मॅक्-केन यांच्या वाद सभेतील उल्लेखाखेरीज, भारताचा कुठेही उल्लेख होत नाही.


मी सध्या आहे त्या लुईझिआनाच्या सिनेटर डेमोक्रॅट मेरी लँन्ड्रू आहेत. त्यांचे विरोधक रिप. जॉन केनेडी त्यांच्या विरोधात जोरात जाहिरात करतात. ह्या बाईंची भ्रष्ट्राचाराची प्रकरणे तसेच त्यांनी किती वेळा, कोणत्या विधेयकाच्या बाजूने अथवा विरोधात मतदान केले आहे त्याची आकडेवारी केनेडी आपल्या जाहिरातींमध्ये दाखवतात. त्यांच्या विरोधात लँन्ड्रू बाई, केनेडींनी कितीवेळा पक्ष बदललेला आहे त्याची जंत्री देतात. त्यांच्या जाहिरातीत केनेडींच्या फोटोबरोबर एक रंग बदलणारा शॅमेलियॉन दाखवला आहे.ओबामा-मॅक्-केन ह्यांच्या जाहीराती अश्याच एकमेकांवर चिखलफेक करतात. जाहीरात संपता संपता ही जाहीरात कोण करत आहे हे दिसते , तसेच घाईघाईने सांगितले जाते.( म्युचुअल फंडाच्या जाहीरातीच्या शेवटच्या डिस-क्लेमर प्रमाणे!)


असे असले तरी ह्या आठवडयाअखेरीस ओबामांनी ५०% मतदारांची पसंती मिळवली आहे. मॅक्-केन ह्यांना ३९% पसंती आहे. प्री एलेक्शन ओपिनिअन पोलचे फॅड फार आहे. त्यातील निकालांच्या विश्लेषणाचे दळण मिडीया करत असतो. तसेच त्यावर उमेदवारांचाही विश्वास दिसत आहे. "मॅक्-केन इज अ फायटर, फायटर आल्वेज कम्स बॅक" हे खुद्द मॅक्-केन यांचे ताजे उद्गार ह्याच गोष्टीचे द्योतक आहेत. आघाडीच्या सर्व वृतपत्रांच्या ओपिनिअन पोलमध्ये ओबामाच आघाडीवर आहेत.


आर्थिक मंदीच्या गाळात , रिपब्लीकन पक्षाचे जहाज खोल रुतले आहे. त्यामुळे त्यातून उडया ठोकून तीर गाठणारयांची चढाओढ लागली आहे. अशीच उडी ठोकून, बुशप्रशासनातील माजी परराष्ट्रमंत्री जनरल कॉलिन पॉवेल ह्यांनी सरळ ओबामांचा तीर गाठला आहे. ओबांमाची कँपेन त्यांना "फिनॉमेनल" वाटायला लागली आहे. ते काही असले तरी ओबामांनी कँपेनच्या खर्चासाठी ह्या एका आठवडयात १५ कोटी डॉलर्स मिळवले आहेत.

मॅक्-केन ह्यांनी नुकतीच केलेली, बुशप्रशासनावरची जाहीर टीका, आणि प्रेसिडेंट बुश ह्यांना त्यांनी आपला प्रचार करण्यासाठी नाकारलेली अनुमती दोन गोष्टी पुरेशा बोलक्या आहेत असे मला वाटते. असे असले तरी, इथल्या अनेक विचारवंतांना ओबामांचा ब्रॅडली होणार की काय? अशी भिती वाटते. ब्रॅडली हे लॉस-एंजलिसचे अत्यंत लोकप्रिय, पण कृष्णवर्णीय मेयर होते. ते कॅलिफोर्निआच्या गव्हर्नरपदाच्या निवडणूकीला उभे राहिले होते, तेव्हा त्यांना मतदानपूर्व भरघोस पाठिंबा मिळत होता. तेच जिंकणार अशी परिस्थिती असताना ऐन मतदानाच्यावेळी वर्णभेद उफाळून आल्यामुळे, ते निवडणूक हरले. ही साधारण ३० वर्षांपूर्वीची घटना आता इथे सर्वांना आठवू लगली आहे.

इथला निवडणूक प्रचार पाहून,त्याची भारतातील प्रचाराशी तुलना केली तर, घरोघरी मातीच्याच चुली, ह्या म्हणीची सार्थता पटल्यावाचून रहात नाही.

No comments:

Post a Comment