December 6, 2008

जातो आपुल्याच गावा

अष्टाक्षरी छंदातील ही रचना असून. माझे छंदगुरु श्री. धोंडोपंत ह्यांच्या छंदविवेचनानंतर ही स्फुरली आहे. आता उद्या घरी जाणार तेव्हा काय काय होइल ह्याच्या कल्पना लढबत असतानाच हे रचना झाली. ८,८,८,८ अशी रचना तसेच दुसरया आणि चौथ्या ओळीचे यमक हे ह्या छंदाचे वैशिष्ट्य.

पोचले रे माझे मन
घरीदारी भारतात
भेटतील सानथोर
हात घेउनी हातात

दिन एकच उरला
नुरले हे माह तीन
माझ्या आधी पोहोचली
माझी वेडी आठवण

धाव घेइल अनन्या
वेगे कुशीत शिरेल
घरी पाउल पडता
बार्बी द्यावया लागेल

हुंकारेल माझा दंफी
रांगे रांगे घेइ धाव
अष्ट शब्दी छंद आहे
अनुष्टुभ त्याचे नाव

बोजे ठेवूनी बाजूला
थोडा टाकीन मी श्वास
पाण्यासोबत ऎकेन
काकणांचे अनुप्रास

असेलच आई तिथे
आणि बाबा उत्सुकसे
काय होइल होइल
सर्व तुम्हां सांगू कसे!


(माझ्या मुलाचे नाव अनुष्टुभ. ते ठेवताना बराच काथ्याकूट झाला होता. त्याची आत्ता आठवण येत आहे. अनुष्टुभात सुद्धा ८ अक्षरे येतात पण लघु-गुरु अक्षरांचे नियम वेगळे आहेत.गीता, रामरक्षा, अनेक संत रचना तसेच भीमरुपी स्तोत्र हे अनुष्टुभ छंदाची उदाहरणे.)

असो चला आता परत भेटू , पण थोडया विश्रांतीनंतर!!

No comments:

Post a Comment