December 2, 2008

मुंबईवरील हल्ले, चॅनेलवाले आणि काही जाहिराती

ह्या सगळ्या हल्ल्यांमध्ये मला दोन घटना खटकल्या.

पहिली म्हणजे चॅनेलवाल्यांचा अति- उत्साह..

चॅनेलवाले पण अति उत्साही, कमांडो हेलिकॉप्टर्मधून खाली कसे उतरले? ताज मध्ये शिरताना करकरेंनी अंगावर काय काय घातलंय? ताजमध्ये अडकलेल्या पत्रकार कोणत्या रुम मध्ये आहेत? अजून किमान १०० लोक आत अडकले आहेत. घ्या अतिरेक्यांनो तुम्हाला १०० बकरे आहेत अजून कत्तल करायला. मिडिया अशी माहिती विनासायास अतिरेक्यांच्या कमांडसेंटरला पोचवत होता.

सगळ्यवर कडी केली ती चरखा बाई मठ्ठ ह्यांनी, सुटका झालेल्या परदेशी महिलेला चरखा बाइ विचारत्या झाल्या “ इतके होवूनही तुम्ही भारतात परत याल का?” ह्या प्रश्नातून काय सूचित करायचं होतं चरखाला कोण जाणे? त्या महिलेनेच सांगितलं की असं कुठेही होवू शकतं त्यामुळे परत न येण्याचा विचार कशाला करु. तेव्हा चरखा मुस्काडात बसल्यागत गप्प.

श्रीयुत लाजबीज छोडदेसाइ तर दमच घेत नव्हते. आमच्याच चॅनेलने किती बातम्या ब्रेक केल्या ह्याची आकडेवारी देताना त्यांची धावपळ उडत होती.

मिडीयाला किती आणि काय दाखवायची परवानगी दयावी ह्याचे काही नियम आहेत की नाही? अश्याप्रसंगी काय करायचे ह्याची काही आखणी आहे की नाही. नसेल तर आता तरी ती सरकार करणार की नाही? ह्या मिडियावाल्यांनाही काही पाचपोच आहे की नाही? भारतीय प्रसारमाध्यमांना आता एवढी वैचारिक समज कधी येइल?

आणि आता दुसरी अजूनच व्यथित करणारी घटना जाहिरातींबद्द्लची..
ह्या गंभीर घटनेचं भांडवल करायला राजकारणीच नव्हेत तर अनेक भारतीय कंपन्या देखील पुढे सरसावल्यात. सध्या सुरु असलेली एअरटेल ची जाहिरात पाहिलीत? आर्यभट्ट,चाणक्य, सुश्रुत, जगदीशचंद्र बोस, विनोद धाम ते अगदी गांधीजी( An Indian who won war without fight) अश्या इतिहासात आणि वर्तमानात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महान भारतीयांचे, An Indian who invented the chip, An ancient Indian economist ,असे त्यांच्या Indian असण्याचे दाखले देउन झाले की ही जाहिरात Indian मधील I आणी Bharati मधील I ह्यात साम्य दाखवते. किंबहुना ह्या दोन्ही शब्दांमधला I एकसारखाच चित्रीत केला आहे. ह्या दोन्ही शब्दांची कॅलीग्राफी(अक्षरलेखनाची पद्धत) आणी रंगसंगती ही एकसारखीच. परिणाम साधण्यासाठी संपूर्ण जाहिरात कॄष्ण-धवल रंगात. देशभक्तीपर संगीत पार्श्वभूमीवर सुरुच असते. आणी मग Proud To Be Indian अशी पंचलाइन एकू येते. अशीच एक दुसरी जाहिरात म्हणजे ज्या समूहाच्या हॉटेलावर हल्ला झाला त्या टाटा समूहाच्या टाटा इंडिकॉम ह्या दूरध्वनी सेवेची. त्यांनी ही असेच देशभक्तीपर संगीताच्या पार्श्वभूमीवर आपल्या “इंडि”कॉम ची जाहिरात केलेली आहे. ही अगदीच कमी कालावधीची जाहिरात फक्त पंचलाइन सांगून जाते. राजकारण्यांनतर हे व्यावसायिक सुद्धा आता मॄतांच्या टाळूवरचे लोणी खायला निघाले आहेत.

दहशतवादी हल्ल्यांनंतर जो एक युफोरिया निर्माण झाला आहे त्याचे भांडवल करु पाहणारी ही किळसवाणी आणि विकॄत मनोवॄत्ती.

पण ह्या युफोरियाचे विधायक शक्तीत रुपांतर करण्याची आज गरज आहे. त्यातूनच भारताला ह्या समस्येवरचा उपाय सापडेल.

1 comment:

  1. absolutely agree with you.. Even the Politicians are not far behind who say " this kind of small things happen in big cities" also Politicians who say" Even dogs would not have visited this place"
    I guess we all need to make the change happen....

    ReplyDelete