December 2, 2008

मंबइवरील हल्ले आणि काही प्रश्न

मुंबईवर लादल्या गेलेल्या युद्धात जे शूर पोलिस , जवान आणि कमांडो अधिकारी हुतात्मा झाले त्यांना माझी श्रद्धांजली.

गेले काही दिवस माझी घुसमट सुरु आहे. अनेक उलट- सुलट लेख, प्रतिक्रिया, ब्रेकिंग न्यूज मध्ये माझा कोंडमारा होतोय. पण मी अंतर्मुख होवून विचार केला आणि एक निर्णय घेतला आहे.

असे हल्ले भारतातच काय जगात कुठेही होउ शकतात. कुणी सांगावे? मलाही एखादवेळीस ओलिस ठेवले जाउ शकते. त्यामुळे जर असा प्रसंग माझ्यावर ओढवला तर माझ्या सुटकेसाठी कोणत्याही अतिरेक्याला सोडू नये. अशी इच्छा मी माझ्या कुटुंबीयांकडे व्यक्त केली आहे. असा प्रसंग माझ्यावर आलाच तर त्यांनी तसे सरकारला कळवावे. आपल्याला पटत असेल तर बघा. आपणही असा निर्णय घ्या असे माझा आग्रह नाही. मी जे ठरवले ते माझे वैयक्तिक मत आहे. पण देशासाठी प्राण देणारया बहाद्दर सैनिकांसाठी आपण एवढे नक्की करु शकतो. बघा मनाशी फक्त कल्पना करा अश्या प्रसंगाची. आणि त्यानंतर तुलना करा त्या बहाद्दरांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या प्रसंगाची. तेव्हा तुम्हाला ह्या प्रसंगाचे गांभीर्य समजेल.

अशी वेळ आपल्या देशावर का यावी? १९९२ मध्ये अतिरेक्यांनी सागरी मार्गाचा वापर करुन स्फोटके उतरवली. आज १६ वर्षानंतरही तोच मार्ग त्यांनी अनुसरला. आपली सुरक्षा व्यवस्था इतकी पोकळ आहे? महासत्ता होण्याच्या गप्पा करतो ना आपण?

अतिरेक्यांना “ दीज पर्सन्स” म्हणणारे, दिवसाला तीनदा कपडे बदलणारे, मंद दबक्या आवाजात बोलणारे केंद्रीय गॄहमंत्री, सिनेस्टार पुत्राला ताजची सैर घडवणारे मुख्यमंत्री, “५००० लोकांना मारायचे होते पण २०० च मेले, छोट्याश्या घटना होतातच हो” असे म्हणणारे कणखर आबा राज्याचे गॄहमंत्री म्हणून लाभल्यावर असेच होणार. ह्यांची गच्छंती आधीच व्हायला हवी होती. पण त्यांचा घडा भरायला थोडा वेळच लागला म्हणायचा.

अमेरिकेवर ९/११ हल्ला झाल्यावर परत का नाही हो झाले हल्ले? मग आपल्यावरच का होतात परत परत? कारण अमेरिका एकत्र येउन उपाय करते . आपण नाही करत .आता वेळ आहे ते एकत्र येण्याची जशी अमेरिका एकत्र आली होती. भले आपण देशात असू १०० कौरव आणि ५ पांडव. बाहेरच्यांसाठी आपण आहोत १०५ हे दाखवून देण्याची.

मग एवढीही राजकिय समज आपले नेते दाखवू शकत नाहीत? देशासाठी आपल्यातले भेदभाव बाजूला ठेवण्याची तयारी नाही ह्यांची? काय गरज होती ताजसमोर येउन एक कोटी मदत जाहीर करण्याची. सगळ्यांपेक्षा महान , स्वयंभू मीच हे दाखवण्याची ही वेळ होती का? देशभक्तीचा मक्ता आपल्याकडेच असे वाटणारया ह्या पक्षाचे सरकार असताना त्यांनी तर अतिरेक्यांना अगदी घरपोच करायला मंत्री पाठवला होता. त्यांनी कशाला बाता कराव्या देशाच्या? करकरेंच्या स्वाभिमानी कुटुंबियांनी ह्यांची एक पै सुद्धा नाही घेतली.

दैवदुर्विलास म्हणजे ह्या घटनेच्या निषेधाचे भाषण पंतप्रधानांनी टेलीप्रॉम्टरवरुन वाचून दाखवले तो क्षण. अगदीच सपक आणि कणाहीन नेतॄत्व. एक कठोर शब्द नाही उच्चारला गेला त्या भाषणात. अशीच प्रतिक्रिया गॄहमंत्री अगदी क्षीण आवाजात, खांदे पाडून देते झाले तेव्हाच त्यांनी अतिरेक्यांचा “ दीज पर्सन्स” असा उल्लेख केला.

मग राजीनामा सत्रच जणू सुरु झाले. पण जनतेच्या डोळ्यात अशी धूळफेक करुन भागेल का? पुढे काय करणार? मुंबईसारख्या ठिकाणी दिल्लीहून कमांडो पोचायला १० तास लागतात. देशाचे गॄहमंत्री किती कमांडो पाठवले ते वाहिन्यांवरुन सांगतात, अरे साधी अक्कल कशी नाही? तुमच्या वाहिन्या अतिरेक्यांचे कमांड सेंटर पण बघतेच की. मग त्यांना तुमच्या सगळ्या हालचाली जाहीर रित्या सांगता?
“दे वील नॉट हार्म यू अनलेस यू लेट देम हार्म यू” असे एक वचन आहे. प्रत्येक वेळी हल्ला झाला की शेजारयांकडे का बोट दाखवायचं? त्या शेजारयांची आपल्याकडे डोळा वर करुन बघायची हिंमत होता कामा नये असे काहीतरी करुन दाखवायलाच लागेल. इतक्या लांब पसरलेल्या किनारपट्टीवर नजर कशी ठेवणार? पण मग इतर देशांनाही आहेच की किनारा, ते काय करतात? आपण जर चंद्राचे फोटो काढू शकतो तर भारताच्या किनारपट्टीच्या लांबीचं कसलं आलंय कौतुक? मानवविरहीत छोटी टेहळणी विमाने आहेत की.

अमेरिका- मेक्सिकोच्या सीमेवर घुसखोरी टाळण्यासाठी एक आभासी( व्हर्च्युअल) कुंपण आहे. त्याचा भंग करुन प्रवेश करायचा प्रयत्न केला की तातडीने तिथे फौज जमते. आपण आपल्या किनारयाचे रक्षण अश्या प्रकारे करु शकत नाही असे मला वाटत नाही. पहिल्याच प्रयत्नात चांद्रकक्षेत यान यशस्वीरित्या सोडणारया देशाला हे नक्कीच अवघड नाही.

प्रतिबंध हाच एकमेव उपाय आहे अतिरेका वर.
आपली सहिष्णुता हा जर आपला कच्चा दुवा बनला तर ते घातक आहे भारतासाठी.

3 comments:

  1. Prashna sagalech vicharat aahet. Ata vaat pahatoy uttara denaryachi. Sadhya taree "Horizon" konich disat nahi! Tula "palyad" hoon dista ka re koni?

    ReplyDelete
  2. मी माझ्या परिने जो निर्णय घेतलाय तो दिलाच आहे वरती. मला ही उत्तर हवी आहेत. ती कोण देणार ह्यापेक्षा स्वत:च शोधूया.
    ह्या वर्षी निदान मतदान करु या.

    ReplyDelete