October 23, 2008

अमेरिका म्हणजे फक्त पिझ्झा आणि कोक नव्हे

सध्या अमेरिकेत कामानिमित्त तीन महिने वास्तव्य आहे. इथं आलो तेव्हा अमेरिकेबद्दल एक वेगळंच चित्र होतं. भांडवलशाही, प्रगत सोसायटी, एकमेकांशी कामापुरता संबंध ठेवणारे सहकारी, असं काहीसं चित्र मनात होतं; पण जसे दिवस गेले, तसं मनातलं हे चित्र हळूहळू धूसर होत गेलं.


मी आलो तेव्हा अमेरिकेला नुकताच हरिकेन "आयके'चा तडाखा बसला होता. मला न्यूयॉर्कला उतरून पुढे ह्यूस्टनला जायचं होतं. मुंबईला बोर्डिंगच्या वेळीच सांगितलं होतं, की हवामान खराब असल्याने ह्यूस्टनचं उड्डाण रद्द झाल्यास एअरलाइनतर्फे कोणतीही सोय केली जाणार नाही. न्यूयॉर्कला उतरल्यावर समजलं, की हरिकेनमुळे ह्यूस्टन विमानतळ बंद आहे. लगेच मुंबईतील घोषणा आठवली. मनाशी विचार केला, आठवड्यानंतर आलो तरी चालणार होतं. मुंबईत हे समजल्यावर तरी तिकीट पुढं ढकलायला हवं होतं. असू दे. आता आलोच आहे तर बघू काय होतंय ते, म्हणून एअरलाइनच्या काऊंटरवर चौकशी केली. पहिला धक्का इथंच बसला. एअरलाइनने चक्क न्यूयॉर्कमध्ये दोन दिवस चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली होती! खरं तर तांत्रिक किंवा तत्सम कारणास्तव उड्डाण रद्द झाल्यास एअरलाइनतर्फे सोय केली जाते. पण इथ ते "ग्राहक देवो भव' या उक्तीला जागले. ग्राहक हा राजा असतो, त्याचा अनुभव आला.
दुसऱ्या दिवशी ह्यूस्टन विमानतळ सुरू झाल्याचं समजलं, म्हणून न्यूयॉर्क विमानतळावर गेलो. पाऊण तासानंतर फ्लाइट होती. त्यामुळे बोर्डिंग गेटजवळ गेलो. तिथं घोषणा होत होती, "हरिकेनमुळे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी आयोजित केलेलं हे विशेष उड्डाण असून, ते कॉंटिनेंटलच्या नेहमीच्या वेळापत्रकात समाविष्ट नाही. त्याचप्रमाणे हरिकेनमुळे ह्यूस्टन विमानतळावरील आमचा स्टाफ न्यूयॉर्कला येऊ न शकल्यामुळे हे उड्डाण घेऊन जाण्यासाठी पायलट, को-पायलट, तसेच केबिन क्रू उपलब्ध नाहीत. त्यामुळे उड्डाणाला उशीर होत आहे. आम्ही प्रयत्न करतच आहोत. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व."


मला कॉंटिनेंटल एअरलाइनचा सच्चेपणा आवडला. जे आहे ते सत्य सांगितल्यामुळे तेथे उपस्थित २००-३०० प्रवाशांपैकी कोणीही तक्रारीचा सूर काढला नाही.


पुढे ह्यूस्टनमार्गे लुईझिआनामधील रस्टन येथे आलो. उतरल्यावर पाहिलं तर काय, माझं लगेज आलंच नव्हतं. कॉंटिनेंटलच्या काऊंटरवर क्‍लेमफॉर्म भरला. तेथील सुंदरीने बऱ्याच वेळा "सॉरी, सॉरी' म्हणत सांगितलं, की हरिकेनमुळे त्यांच्या सेवेवर परिणाम झाला असून, बराच स्टाफ ह्यूस्टनला कामावर येऊ शकलेला नाही. त्यामुळे ह्यूस्टनहून जे विमान मला घेऊन निघालं, त्यात माझं लगेज चढवलं गेलं नाही. सुंदरीने सांगितलं, की लगेज मिळण्यास २-३ दिवस तरी लागतील. तसं बघितलं तर सर्व कपड्यांचा एक संच हातातल्या बॅगेत ठेवला होता. त्यामुळे दोन-तीन दिवस काढायला हरकत नव्हती; पण एअरलाइनतर्फे मला एक नित्योपयोगी वस्तूंचे किट दिल्यावरच तिचं समाधान झालं.

तिने दोन-तीन दिवस म्हणून सांगितलं खरं, पण खरोखरच दोन दिवसांनंतर लगेज घेऊन कुरिअरचा माणूस घरी हजर! आल्यावर एकच प्रश्‍न, ""यू, कॅपिल?'' मी हो म्हणताच कोणतेही ओळखपत्राचे सोपस्कार न करता लगेज माझ्या हवाली! समोरच्यावर विश्‍वास दाखवला, तर सगळ्याच गोष्टी सोप्या होतात त्या अशा. पण एवढाही विश्‍वास बरा नाही, असं मनाशी म्हणत लगेज ताब्यात घेतलं.
आता काम सुरू करून तीन आठवडे झाले. थोडासा उष्णतेचा त्रास सुरू झाला. अंगावर फोड आले. ऑफिसमध्येच ताप आला. त्यामुळे डॉक्‍टरचा शोध सुरू केला. जवळच्या डॉक्‍टरकडे दोन आठवडे बुकिंग म्हणून "वॉक-इन' क्‍लिनिक (वॉक-इन क्‍लिनिकमध्ये अपॉइंटमेंटची गरज नसते. नावाप्रमाणे जस्ट वॉक-इन!)ची चौकशी केली. आता ही बातमी कानावर जाऊन कंपनीची एच.आर. हेड ब्रेंडा रॉबिन्सन माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, ""माझ्याकडेच का नाही आलास थेट? आता चल, मी तुला घेऊन जाते वॉक-इन क्‍लिनिकमध्ये.'' असं म्हणून ती मला स्वतःच्या गाडीत घालून घेऊनसुद्धा गेली.


क्‍लिनिकमध्ये ती माझ्यासोबत माझा नंबर लागेपर्यंत तासभर आपलं काम सोडून बसली. हे कमी म्हणून की काय, डॉक्‍टरनी लिहून दिलेली औषधं जाता जाता वॉल-मार्टमधून घेऊन जाण्याचा आग्रहसुद्धा तिने केला. वॉल-मार्टमध्ये प्रिस्क्रिप्शन "ड्रॉप' केल्यापासून औषधं मिळेपर्यंत अर्धा तास गेला. तोपर्यंत ब्रेंडा माझ्याबरोबरच! औषधं घेऊन मला घरी सोडेपर्यंत संध्याकाळचे साडेसात वाजले. आता हिला "थॅंक्‍यू' तरी कसं म्हणावं, या विचारात मी असताना ब्रेंडा मला म्हणते कशी, ""तू आता औषधं घे आणि दोन दिवसांत नेहमीप्रमाणे उत्साहात कामावर ये पाहू. तुझ्या "थॅंक्‍यू'पेक्षा तू बरा होणं हेच माझ्यासाठी मोठं आहे, माय सन! तुझी आई नसती का आली तुझ्याबरोबर?''

कंपनीची एच.आर. हेड हजारो मैलांवरून आलेल्या एक नवीन, अनोळखी स्टाफसाठी आपला एवढा वेळ खर्च करते, याचं मला कितीतरी कौतुक वाटत राहिलं.
हा देश प्रगत असण्याचं कारण तांत्रिक प्रगती तर आहेच, पण इथल्या माणसांची मानसिकता, त्यांचा सच्चेपणा आणि दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्तीसुद्धा आहे. हा समाज परस्परांवरच्या विश्‍वासावर चालतो.
आता मला आलेल्या अनुभवांकडे दुसऱ्या नजरेतूनही पाहता येईल; पण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. असं म्हणतात ना, की "द वर्ल्ड इज द मिरर फॉर यू. द वर्ल्ड लुक्‍स ऍट यू, इन द सेम वे, यू लुक ऍट द वर्ल्ड.' माझ्या आधीच्या कंपनीतील बॉस म्हणायचा, ""हॅप्पी पीपल गेट हॅप्पी एक्‍स्पिरिअन्सेस.''
काही वर्षांपूर्वी अंतर्नाद चे संपादक भानू काळे यांनी एका लेखात एक अमेरिकन कोट्याधीश एका बेकार तरुणाला मदत करुन, त्याला आपला धंदा सुरु करण्यास कशी मदत करतो, ते सांगून, अमेरिकन व्हॅल्यूज ची चर्चा केली होती. लेख संपवताना त्यांनी म्हटलं होतं की, "अमेरिका म्हणजे फक्त पिझ्झा आणि कोक नव्हे." त्या वेळी ते काही तितकंसं पटलं नव्हतं मनाला.
पण आज ग्राहकाप्रती सच्ची, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारी, परस्परांवर विश्‍वास ठेवणारी अमेरिकन माणसं अनुभवल्यानंतर मीसुद्धा म्हणेन!
अमेरिका म्हणजे फक्त पिझ्झा आणि कोक नव्हे."

1 comment:

  1. Khupach chaan anubhav sangitlat tumhi. Mala kahi anubhav nahi pan mihi tumhi suruvatila lihilyapramane aikala hota.
    Happier people... patala manapasun.
    Asech chaan anubhav lihit raha.

    ReplyDelete