October 28, 2008

अफूची गोळी

बेस्टची बस आणी त्यातील प्रवाश्यांना ओलिस धरु पाहणारया राहुल राज ह्याला मुंबई पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले.

होय , मुंबई पोलिसांनी जे केले , ते योग्यच आहे. ह्यामुळे मुंबई/ महाराष्ट्रात बिहारसारखे वागू पाहणारा प्रत्येक बिहारयाच्या मनात भय निर्माण होईल. मुंबई आणी बिहार पोलिसात फार फरक आहे. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जाते. त्या तरुणाला वाटले होते की, बिहारसारखे आपण मुंबईत वाट्टेल ते करु शकतो. त्याला इनोसंट म्हणणारया बिहारी नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, नोकरी शोधायला आलेल्या गरीब बिचारया तरुणाकडे पिस्तूल कसे आले?

आजपर्यंत सर्वात जास्त रेलवे मंत्री बिहारी झाले आहेत. बिहार मधून मुंबईला जाणारया तरुणांना, बिहारात रोजगाराच्या संधी उपल्ब्ध झालेल्या नाहीत. मिळाल्या त्या फक्त बिहारी रेल्वेमंत्र्यांनी सुरु केलेल्या, मुंबईला घेउन जाणरया रेल्वेगाड्या.

बिहारमध्ये अशी हत्यारे खुलेआम विकली जातात. अश्या राज्यातील नेत्यांनी महाराष्ट्राबद्दल तोंडातून ब्र काढू नये. गेल्या ५०- ६० वर्षांत ह्या बिहारी नेत्यांनी, बिहारची वाट लावली नसती, तर त्या राहुल राजवर आज नोकरीसाठी,मुंबई गाठायची वेळ आली असती का?

आबा पाटील, मुंबई पोलिसांच्या पाठीशी ठाम उभे आहेत , हे चांगलेच आहेत. विलासरावांनी ही संधी साधून लगेच चौकशी सामिती स्थापन केली आहे. कारण गॄह खाते राष्ट्र्वादीकडे आहे. तिकडे शिवसेनेने, मनसेला ह्या मुद्दयावर सुद्धा बरोबर घेउन जाण्याचे नाकारले आहे.

राजने उभ्या केलेल्या आंदोलनामुळे मराठी मनाची त्याला सहानुभुती निर्माण झाली होती. त्याची दखल सर्वच पक्षांना घ्यावी लागली आहे. फक्त नारायण राणे आणी छगन भुजबळ ह्यांनी त्यावेळी सरकारला, रेल्वे भरतीबाबत महाराष्ट्र सरकार, रेल्वे खात्याला तसेच रेल्वे मंत्र्यांना जाब विचारणार आहे का, असे ठणकाउन विचारले होते.

पण आता ज्याप्रकारे बिहारी नेते एकत्र आले आहेत. काही वॄत्तपत्रे आणी सबसे तेज चॅनेल्सना हाताशी धरुन, ज्याप्रकारे हिंदी मिडीयात गरळ ओकली जात आहे, तेव्हा आता ह्या मुद्द्यावर समस्त मराठी नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र आले पाहिजे. इस्त्रीचे कपडे दिवसाला तीन वेळ बदलणारे, चापून चोपून भांग काढून फिरणारे, दिल्लीतील, मराठी गॄहमंत्री आता काय भूमिका घेतात हे पहायला हवे.

मुंबई पोलिसांना ह्या बाबतीत पाठिंबा असला तरी, आर आर आबांची वक्तव्ये ही, राज ठाकरेंनी निर्माण केलेल्या, मराठी लाटेवर स्वार होऊन, त्याच्याकडे झुकणारी मते आपल्यापक्षाकडे वळवण्याचा प्रयत्नांचा एक भाग वाटतात.

अशी वक्तव्ये करुन , त्यांनी बिहारी नेत्यांना एक अफूची गोळी रेडीमेड उपलब्ध करुन दिली आहे. ही अफूची गोळी, हे बिहारी नेते येत्या निवडणूकीत वापरतील आणी आधीच विकासापासून वंचित आणी सुन्न असलेली बिहारी जनता अजून बेशुद्ध पडेल.

उद्या, एखादा मराठी कामानिमित्त कोलकात्याला जाताना, त्याला मध्येच बिहारमध्ये, बिहार पोलिसांनी हकनाक उडवला तर?

October 24, 2008

लवकरच येत आहे

लवकरच येत आहे.... Coming Up Next ....

मित्रहो, अमेरिकेतील डीयर हंटींग सिझन तसंच बरेच दिवस मनात अडकून बसलेली लंच टाईम आणि डब्बा ग्रूपची पोस्ट आता पूर्ण केली आहे. दुसरा भागही इथे आता वाचायला मिळेल.
अजून पुढच्या आठवडयात


१. अजून अमेरिकन पाटया बाकी आहेत. त्या येतील पुढच्या वीकांतात.
२. ऑफिस ऑफिस! हा इथल्या ऑफिस कल्चरबद्दलचा लेख मॅड मॅड अमेरिका ह्या सदरात टाकेन.

तुमच्या प्रतिसादाने माझा हुरुप वाढला आहे. तुमच्या अभिप्रायांचे मी स्वागत करतो. असाच वाचत रहा.. नियमीत .. माझा ब्लॉग !!

दिवाळीचा फराळ तुम्ही पोटभर खाल्लाच असेल. कुठे कुठे फिरायल गेला होता ते नक्की कळवा मेलवर.

अमेरिका उलटी..




Coming Up Next मध्ये उलटेपणावर लेख लिहिणार असं वाचून अनेक मित्रांनी त्यातील योग्य शब्द कोणता- उरफाटी की उफराटी असा बराच काथ्याकूट घातला. शेवटी हे दोन्ही शब्द वगळून उलटी असा शब्द वापरायचा ठरवलं!


इथे येइपर्यंत अमेरिकेत सगळंच उलट असतं असं ऐकून होतो. तसा, मस्कत आणि दुबईत अनुभव घेतला होता, पण आता इथे हा उलटा अनुभव घेऊन बरेच दिवस झाले. पहिल्याच दिवशी न्यूयॉर्क ला हॉटेलच्या बसमधून एअरपोर्ट्वरुन हॉटेलकडे निघालो होतो. ड्रायव्हरला एका चौकात उजवीकडे वळायचे होते. मी त्यच्या पाठीमागेच बसलो होतो. समोर रस्ता दिसत होता. त्यामुळे मी माझ्या मनात टर्न घेतला तो लाँग घेतला. मला भारतात ड्राइव्ह करायची सवय. आपल्याकडे उजवे टर्न लाँग तर डावे टर्न शॉर्ट असतात. पण इथे बघतो तर काय? ड्रायव्हर चक्क शॉर्ट टर्न मारुन निघाला होता. बाप रे!! ह्या उलट्या अमेरिकेचा पहिला धक्का बसला होता.!!


पुढे अपार्टमेंटचे कुलुप, आलो तेव्हा बरोबर आलेल्या माईकने उघडून दिले. पण दुसरया दिवशी ऑफिसला जाताना दार लॉक करता येइना. मला लॉक म्हणजे क्लॉकवाईज माहिती हो, बराच वेळ खटपट करुन लक्षात आलं, उलट फिरवून बघूया, म्हणून पाहिलं तर काय, झालं की लॉक!! पुन्हा घरी आलो तेव्हा असाच घोळ. तेव्हा पण थोडया वेळाने उलट फिरवून पाहिल्यावर खुल जा सिम सिम झालं. लाईटची बटणं तर असतातच उलटी, त्याची झाली सवय, पण किचन कॅबिनेटच्या दारं , किंवा कोणताही एका झडपेचा दरवाजा, आपल्या भारतीय पद्धतीपेक्षा उलटाच असणार. म्हणजेच त्याला डावीकडे बिजागरी( हिंजेस) आणि उजवीकडे हँडल असणार. अजूनही किचन कॅबिनेटस उघडताना हात डावीकडे जातो, पण तिथे हिंजेस असतात!! मॉल्स मधली, दूध, दही, आईस्क्रीम, फ्रोजन फूड्सची कपाटंसुद्धा उलटी. आता ती सगळी एकमेकाला चिकटून ठेवलेली असतात. त्यामुळे काचेतून दिसणारया,आपल्याला हव्या असलेल्या वस्तूसमोरचा दरवाजा उघडला की समोर भलतीच वस्तू असते. कारण आपण पुढच्या कपाटाचा दरवाजा उघडलेला असतो!! इथे टाकलेले फोटो पहा. त्या फोटोंवर क्लिक केल्यावर ते मोठे दिसतील.

इथल्या जाहिरातीत दिसणारे कॉल सेंटर्सचे नंबर्स. ते नंबर म्हणजे आकडे नसतात, तर इंग्रजी अल्फाबेट्स असतात. म्हणजे इथेही उलटेपणाच की? मी आलो तेव्हा एअरलाईनच्या बॅगेज क्लेमचा नंबर दिला होता. तो असा 1-800-2235-BAGS. आता ही BAGS ही काय भानगड? हा नंबर डायल तरी कसा करायचा हो? तेव्हा समजलं की फोनच्या डायलपॅडवर जी इंग्रजी अल्फाबेट्स प्रत्येक आकडयाच्या खाली असतात, ते आकडे डायल करायचे, म्हणजे, BAGS साठी 2247 डायल करायचं. इथल्या लोकांच्या मेमरीला नंबर ध्यानात ठेवायचा जास्त ताण पडू नये म्हणून ही युक्ती. तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर डायल करा BOOK म्हणजे 2665 वगैरे वगैरे..


इथे एक गोष्ट मात्र सुलटी बघितली. ती म्हणजे पोस्टाची डिलीव्हरी व्हॅन. ती मात्र आपल्यासारखी राइट हॅन्ड ड्रीव्हन. (पण इथल्या लोकांसाठी उलटीच नाही का?) का असे? म्हणून बघितलं तर प्रत्येक घरासमोर लावलेल्या पेटीत पत्र टाकणे डिलीव्हरीचालकाला न उतरता सुलभ व्हावे यासाठी! हो, पत्र पेटी रस्त्याकडेला घराच्या समोर असते. आता जर नेहमीसारखी लेफ्टहॅन्ड ड्रीव्हन गाडी असेल तर तो पत्र काय खाली उतरून टाकणार पेटीत? कल्पना करा लेफ्टहॅन्ड ड्रीव्हन गाडी रस्त्याच्या उजवीकडून जातेय , तर तो तुमचे पत्र रस्त्याकडेच्या पेटीत कसे टाकणार? व्हॅनमधे बसल्या- बसल्या त्याला तुमच्या पेटीत पत्र टाकता यावे म्हणून डिलीव्हरी व्हॅन राइट हॅन्ड ड्रीव्हन. आता बघा राइट हॅन्ड ड्रीव्हन गाडी रस्त्याच्या उजवीकडून जातेय तर तो चालक व्हॅनमधे बसल्या- बसल्या तुमच्या पेटीत पत्र टाकू शकतो की नाही?

ह्या उलटेपणाचा कहर म्हणजे घरात इस्त्री, टी.व्ही, टोस्टर आदी उपकरणांच्या टू-पिना. दिसायला अगदी साध्या. पण आता ह्यात काय उलटेपणा? सांगतो- आपल्याकड्च्या टू-पिनेला कसे गोल पाय असतात. इथे टू-पिनेला चपटे पाय असतात. हे कमी म्हणून की काय. ह्या चपटया पायांपैकी एकाची जाडी दुसरयापेक्षा जास्त असते. आणि हो, त्यामुळे ही टू-पिन अडकवण्याच्या सॉकेटला सुद्धा ज्या खाचा असतात ना, त्यातील एक जरा जास्त रुंद असते. त्यामुळे होतं काय ही टू-पिन कशीही घातली तर नाही जात सॉकेटमध्ये. ती एका ठराविक प्रकारेच जाते. जर तुम्ही टू-पिनचा जाड पाय सॉकेटच्या रुंद खाचेत घातला तरच!!


इथे एका विकांताला(हा शब्द मी माझा मित्र प्रशांतकडून उसना घेतला आहे, वीकेंड्साठी त्याने कॉईन केलेला हा शब्द!!) कारमधून भटकूया म्हणालो. माझ्याकडे आन्तरराष्ट्रीय चालक अनुमती ( ईन्टरनॅशनल ड्रायव्हींग परमीट) आहे, आणि मी रहातो तिथे विशेष ट्राफीक नाही त्यामुळे, म्ह्टलं की बघू चलवून गाडी इथे. न्यूयॉर्कचा अनुभव होताच, तसेच मी इथल्या कलिगच्या गाडीत त्यांच्या शेजारी बसलो होतो, त्यामुळे भीड चेपली होती. पहिल्यांदा अपार्टमेंट्च्या आसपास चालवली. काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे मेन रोडवर गेलो. हो जाताना उजवीकडे व्यवस्थित शॉर्ट टर्न न चुकता मारला. स्वतःलाच शाबसकी दिली.पुढे गेलो, आता सिग्नल होता. केला की घोळ भाउ, मी तिथे!! वळल्यावर पाठीमागून सायरन वाजवत कॉप हजर. समोर ट्राफिक नव्हतं त्यामुळे काही झालं नाही, पण मी चक्क राँग साईडला घुसलो होतो!! कॉपने परिस्थिती समजवून घेऊन, मोठया उदारपणे सोडून दिले!! वरती विचारले की, सोडू का घरी परत नेऊन? तेव्हापासून कार, स्वतःच चालवत कुठेही जात नाही!!

आता मीसुद्धा उजवीकडून एंटर आणि डावीकडून एक्झिटला सरावलो आहे.!
पण ह्या अमेरिकनांना,उलटेपणाची एव्हढी सवय झाली आहे, की ते ऑफिसच्या कॉरिडॉरमधून सुद्धा उजवीकडून चालतात, कार रस्त्यावरुन उजवीकडून चालवल्याप्रमाणे!!

घरोघरी मातीच्या चुली.. अमेरिकेतील निवडणूक प्रचार

सध्या इथे निवडणूकांचे दिवस आहेत. अगदी आपल्याकडच्यासारखा नसला तरी थोडाफार तसाच प्रचार सुरु आहे. ऑफिसमधे तीच चर्चा सुरु असते.

डेमोक्रॅटीक पक्षाचे बराक ओबामा हे रिपब्लिकन जॉन मॅक्-केन यांच्याविरुद्ध उभे ठाकले आहेत.बराक ओबामांचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे. आजपर्यन्त झालेल्या तिन्ही आमने-सामने डिबेट्समध्ये तर ओबामा भाव खाउन गेले. उपहास, नर्म्-विनोद,वेळोवेळी वस्तुस्थितीची जाणिव करुन देणे आणि समोरच्यावर चिखलफेक न करता आपले मुद्दे ठाशीवपणे मांडण्याच्या त्यांच्या शैलीमुळे, मॅक्-केन हे पुरते बॅक-फूटवर गेलेले आढळले. गेल्या ८-९ वर्षातील रिपब्लिकन बुश शासनाचा कारभार, आणि सध्याची मंदीसादॄश्य परिस्थिती मॅक्-केन यांच्या काळजीत भर घालत आहेत. त्यांच्याकडे मुद्द्यांचा अभाव दिसतो आणि ओबामांएव्हढा कोणत्याही प्रश्नाचा अभ्यासही दिसत नाही.


डेमोक्रॅट पक्षाचे तिकिट मिळवण्यासाठी हिलरी आणि ओबामा यांच्यातील लढत, ओबामांनी जिंकून इतिहास घडवला. प्रथमच एक आफ्रो-अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या इतका जवळ आला आहे. त्या दोघांपैकी कोणीही जिंकले असते तरी तो इतिहासच होता कारण तर दुसरी महिला होती. पण एक झालं, डेमोक्रॅट पक्षाने त्या दोघांना उमेदवारी देऊन आपली प्रतिमा पुरोगामी बनवली.

आंतरराष्ट्रीय राजकारणाचा कमी अनुभव असलेल्या ओबामांनी त्या विषयातील महारथी जो बिडेन यांना आपला उपाध्यक्षपदाचा उमेदवार बनवले तर हिलरींना मिळणारा महिलांचा पाठिंबा लक्षात घेऊन, राजकारणात मुरलेल्या धूर्त मॅक्-केन यांनी अलास्काच्या गव्हर्नर सारा पॅलिन यांना आपला उपाध्यक्षपदाचा उमेदवार बनवले. तोपर्यन्त ह्या पॅलिन बाई कुणाला ठाउकही नव्हत्या. ह्या अनपेक्षित खेळीने ओबामांची कॅम्पेन १-२ आठवडे पिछाडीवर होती.पॅलिन बाई, त्यांचे फॅशनेबल कपडे,त्यांची धर्म श्रद्धा, त्यापोटी त्यांना झालेली पाच मुलं, त्यापैकी सगळ्यात मोठया षोडशवरशा मुलीला तिच्या बॉय-फ्रेंडपासून गेलेले दिवस (ज्यूली आठवतोय का?), पॅलीन बाईंचे फॅशनेबल ड्रेस ह्याने जणू काही अमेरिकेच्या समाजमनावर मोहिनी घातली. बाई आपल्या कुटुंब-कबिल्यासह प्रचारासाठी दिसू लागल्या. त्यांची ५ महिन्याची पोटुशी मुलगी, त्यांच्या प्रचाराचे जणू साधन बनली. धर्मनिष्ठेपोटी आपण मुलीचा, गर्भपात न करता तिचे, तिच्या बॉय-फ्रेंडबरोबर कसे लग्न लावून देणार आहोत, त्याच्या सुरस कथा साक्षात पॅलीन बाईंकडूनच ऐकाव्यात. त्या ऐकून इथल्या कॅथॉलिक सनातन्यांचे आपल्या बाजूने ध्रुवीकरण होइल अशी अपेक्षा असणारे रिपब्लिकन काही दिवसातच जमिनीवर आले. कारण ह्या सगळ्याला कंटाळलेली अमेरिकन जनता शेवटी, ओबामांकडे झुकती झाली. (आपल्याकडे त्यांना पालिन असे म्हटले जाते, इथे उच्चार पॅलिन असा करतात.बराक ओबामांना बर्राकोबामा, तर मॅक-केन ह्यांचा उच्चार जॉनकेन असा केला जातो.)


ओबामांनी छोटे उद्योगधंद्याना, तसेच मध्यम वर्गीयांना करसवलती देण्याचे घोषित केले आहे. इथे हेल्थ-इन्शुरन्स फार महाग आहे. त्यामुळे आम्ही तो स्वस्त कसा करु हे, ओबामा प्रत्येक डिबेटमधे मांडताना दिसतात. शिक्षणव्यवस्थेतही महत्त्वाचे बदल घडवून आणण्याचे त्यांचे मनसुबे त्यांनी जाहीर केले आहेत. इराकपेक्षा , अफगाणीस्तान- पाकिस्तानात सैनिकी कारवाईची गरज असल्याचे ओबामांचे मत आहे. इराक युद्धात किती मिलियन डॉलर्स फुकट चालले आहेत त्याची ते आकडेवारी देतात. आपला हेल्थ-इन्शुरन्सचा मुद्दा पटवून देताना, आपल्या आईच्या आजारपणाच्यावेळी इन्शुरन्स कंपनीबरोबर आपल्याला किती भांडावे लागले होते ह्याची ते भावनाविवश होऊन आठवण करुन देताना पाहून, आपल्या देशातील राजकारण्यांची आठवण येते. कोणत्याही फोरममध्ये, आम्हा पोलिटीशीयन्सना असलेल्या सुविधा, सामान्य माणसाला मिळत नाहीत, ह्याची आपल्याला किती खंत वाटते, ह्याची ओबामा वारंवार आठवण करून देतात असे म्हणण्यापेक्षा,संभाषणाची गाडी ह्याच मुद्द्यावर आणण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. ते बघून आपल्या देशातील आम आदमीचा नारा लावणार्या राजकारण्यांची आठवण येते.
बेल आउट पॅकेजचे श्रेय दोन्ही उमेदवार घेताना दिसतात.


परंतु मॅक्-केन यांच्याकडे मुद्द्याची कमतरता जाणवते. नवीन मुद्दे मांडण्यापेक्षा ओबामांचे मुद्दे खोडण्यावरच त्यांचा भर दिसतो. इराक युद्ध हे देवाने सोपवलेली जबाबदारी आहे, आणि खर्च होतोय म्हणून माघार घेणे म्हणजे आतापर्यन्त सांडलेल्या रक्ताचा अपमान आहे,असे सनातन्यांच्या हृदयाला हात घालणारे,टाळीखाउ मुद्दे ते मांडतात.त्यांच्या घरातील, आजोबांपासून चालत आलेल्या, सैन्यात सेवा करण्याच्या परंपरेचे ते भांडवल करायचा प्रयत्न करतात. भारताशी केलेया अणु- करारामुळे, अमेरिकेला किती बिलियन डॉलर्स धंदयाची संधी उपलब्ध झाली आहे, ह्याचा मॅक्-केन यांच्या वाद सभेतील उल्लेखाखेरीज, भारताचा कुठेही उल्लेख होत नाही.


मी सध्या आहे त्या लुईझिआनाच्या सिनेटर डेमोक्रॅट मेरी लँन्ड्रू आहेत. त्यांचे विरोधक रिप. जॉन केनेडी त्यांच्या विरोधात जोरात जाहिरात करतात. ह्या बाईंची भ्रष्ट्राचाराची प्रकरणे तसेच त्यांनी किती वेळा, कोणत्या विधेयकाच्या बाजूने अथवा विरोधात मतदान केले आहे त्याची आकडेवारी केनेडी आपल्या जाहिरातींमध्ये दाखवतात. त्यांच्या विरोधात लँन्ड्रू बाई, केनेडींनी कितीवेळा पक्ष बदललेला आहे त्याची जंत्री देतात. त्यांच्या जाहिरातीत केनेडींच्या फोटोबरोबर एक रंग बदलणारा शॅमेलियॉन दाखवला आहे.ओबामा-मॅक्-केन ह्यांच्या जाहीराती अश्याच एकमेकांवर चिखलफेक करतात. जाहीरात संपता संपता ही जाहीरात कोण करत आहे हे दिसते , तसेच घाईघाईने सांगितले जाते.( म्युचुअल फंडाच्या जाहीरातीच्या शेवटच्या डिस-क्लेमर प्रमाणे!)


असे असले तरी ह्या आठवडयाअखेरीस ओबामांनी ५०% मतदारांची पसंती मिळवली आहे. मॅक्-केन ह्यांना ३९% पसंती आहे. प्री एलेक्शन ओपिनिअन पोलचे फॅड फार आहे. त्यातील निकालांच्या विश्लेषणाचे दळण मिडीया करत असतो. तसेच त्यावर उमेदवारांचाही विश्वास दिसत आहे. "मॅक्-केन इज अ फायटर, फायटर आल्वेज कम्स बॅक" हे खुद्द मॅक्-केन यांचे ताजे उद्गार ह्याच गोष्टीचे द्योतक आहेत. आघाडीच्या सर्व वृतपत्रांच्या ओपिनिअन पोलमध्ये ओबामाच आघाडीवर आहेत.


आर्थिक मंदीच्या गाळात , रिपब्लीकन पक्षाचे जहाज खोल रुतले आहे. त्यामुळे त्यातून उडया ठोकून तीर गाठणारयांची चढाओढ लागली आहे. अशीच उडी ठोकून, बुशप्रशासनातील माजी परराष्ट्रमंत्री जनरल कॉलिन पॉवेल ह्यांनी सरळ ओबामांचा तीर गाठला आहे. ओबांमाची कँपेन त्यांना "फिनॉमेनल" वाटायला लागली आहे. ते काही असले तरी ओबामांनी कँपेनच्या खर्चासाठी ह्या एका आठवडयात १५ कोटी डॉलर्स मिळवले आहेत.

मॅक्-केन ह्यांनी नुकतीच केलेली, बुशप्रशासनावरची जाहीर टीका, आणि प्रेसिडेंट बुश ह्यांना त्यांनी आपला प्रचार करण्यासाठी नाकारलेली अनुमती दोन गोष्टी पुरेशा बोलक्या आहेत असे मला वाटते. असे असले तरी, इथल्या अनेक विचारवंतांना ओबामांचा ब्रॅडली होणार की काय? अशी भिती वाटते. ब्रॅडली हे लॉस-एंजलिसचे अत्यंत लोकप्रिय, पण कृष्णवर्णीय मेयर होते. ते कॅलिफोर्निआच्या गव्हर्नरपदाच्या निवडणूकीला उभे राहिले होते, तेव्हा त्यांना मतदानपूर्व भरघोस पाठिंबा मिळत होता. तेच जिंकणार अशी परिस्थिती असताना ऐन मतदानाच्यावेळी वर्णभेद उफाळून आल्यामुळे, ते निवडणूक हरले. ही साधारण ३० वर्षांपूर्वीची घटना आता इथे सर्वांना आठवू लगली आहे.

इथला निवडणूक प्रचार पाहून,त्याची भारतातील प्रचाराशी तुलना केली तर, घरोघरी मातीच्याच चुली, ह्या म्हणीची सार्थता पटल्यावाचून रहात नाही.

October 23, 2008

नमनाला तेल !!

अमेरिकेबद्दल अनेकांनी लिहीलं आहे. अनेकांची प्रवासवर्णने आत्तापर्यंत वाचायला उपलब्ध आहेत. असं आसताना मी परत काय लिहू त्याच्या वर ? असा विचार आला मनात.

पण नंतर म्ह्टलं की इथली प्रगती तर माहीत आहेच मग त्याच्याबद्दल, हाय्-स्पीड रेल्वे बद्दल, गुळगुळीत रुंद रस्त्यांबद्दल आणि ऐहिक सुखांबद्दल, परत परत न लिहिता जरा आपण ही अमेरिका थोडी वेगळ्या नजरेतून पाहू, आणि लिहूया जशी दिसली, थोडी ह्टके!!

आजपर्यन्त खादाडीवरचा लेख तुम्ही वाचला असेलच. अमेरिकन व्हॅल्यूजवरचा लेख तर सकाळमधेच वाचला आहे तुम्ही सगळ्यांनी, तो ही टाकलाय इथे.

ह्यापुढे मी ह्या लेखमालेचे ६-७ भाग माझ्या ब्लॉगवर प्रकाशित करेन. मॅड,मॅड अमेरिका ह्या सदरात तुम्ही माझी ही लेखमाला वाचू शकता.आपण ते वाचून मला नक्की प्रतिक्रिया दया!

मराठी अस्मितेबद्दलचा लेख, रोखठोक ह्या सदरात वाचायला मिळेल. माझ्या गावच्या आणि माझ्या लहानपणीच्या आठवणी तुम्ही वाचू शकता, आठवणी दाटतात ह्या सदरात.

लवकरच येत आहे मध्ये ३ विषयांची झलक आहेच, ते मिळतील वाचायला पुढच्या आठवडयात,मॅड,मॅड अमेरिका ह्या लेखमालेत!!

मनोगत

आता हे अभि-ललित म्हणजे काय? तर साधं-सोपं आहे उत्तर. मी एक अभियंता आहे. आता गेली बारा वर्षे काम करतोय, कामानिमित्त भारतात इशान्य भारत वगळता बाकी सगळा भारत फिरुन झाला.परदेशातही फिरून झालं. इतकी वर्षे काम करताना, भटकताना अनेक अनुभव आले, अनेक घटना जवळून पाहिल्या. साठवत गेलो ते सारं मनात. तशी ललितलेखनाची पहिल्यापासून आवड. पण अजून काही म्हणावं तसं लेखन झालं नाही हातून. कधीतरी पेपरात एखादा लेख,ऑर्कुटवरचं काही,किंवा कंपनीच्या हाउस मॅगझीनमध्ये केलेलं लिखाण यापालीकडे गाडी जात नव्हती.

पण आता घरापासून दूर आहे. एकटाच आहे. वेळ असतो. त्यामुळे म्ह्टलं , ही संधी नाही सोडायची, एकदा लिहायची सवय लागली की, होईल आपोआप हातून नंतर.म्हणून हे एका अभियंत्याने केलेलं ललित लेखन. अभि-ललित.

इथे जास्त ललितच असेल. पण एखादा रोख-ठोक लेखही असेल. एखादी कविताही देइन कधी. मी मुदाम लिहायचं म्हणून लिहित नाही.अगदी उर्मी अनावर झाली की लिहितो. त्यामुळे लिखाणाचा दर्जा कायम राहतो, असं मला वाटतं. तरीही मी सातत्य राखायचा प्रयत्न करीन.

सकाळमधे दुसरा लेख प्रकाशित झाला. अनेक मित्र्-मैत्रिणींनी आवडल्याचं सांगितलं. अजून लिही, थांबू नकोस इथेच, अशा प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे निश्चय अजून दॄढ झाला. अशाच विचारमग्न अवस्थेत मराठी अस्मितेचा लेख लिहून झाला. माझ्या गावाबद्दलही लिहून झालं.

दिवाळी आता येत आहे. अशा आनंदाच्या सणाला माझा ब्लॉग तुमच्यासमोर मांडायला विशेष आनंद होतोय.

दीपावलीप्रीत्यर्थ आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना हार्दिक शुभकामना. ही दिपावली आपल्याला, भरभराटीची, सुखसमॄद्धीची, समाधानाची आणि उत्तम आरोग्याची जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!!

पुढे सुद्धा असं लेखन माझ्या हातून नियमीत होत राहो!! अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. तुम्हा सगळ्यांच्या शुभेछा आणि आशीर्वादांची गरज आहे. ते तुम्ही द्यालच अशी मला खात्री आहे.

मराठी अस्मिता

दोन महिन्यापूर्वी मी भारतात- पुण्यात असताना घडलेला हा प्रसंग..
तांदुळ आण असे घरुन सांगितले म्हणून गेलो होतो दुकानात, त्याला म्ह्टलं कि ३-४ नमुने दे पाव पाव किलोचे, करुन बघतो, जो चांगला वाटेल तो २ दिवसांनी घेऊन जाईन पोतंभर.
दुकानदार म्हणाला " नही साह्ब, कमसे कम १ किलो लेना ही पडेगा"
मी (मराठीतच) " पाव किलो देतोस का , तरच घेतो'
"नही साहब. १किलो"
मी " नाही घेत जा"
"ठीक है साहब"
डोकं सणकंल होतं. अजून काही औषधे घ्यायची होती.
समोर " ग्रेवाल मेडिकल" मध्ये गेलो.
तो पण गुर्मीत म्हणाला " वैट करना होगा" मी काही बोलायच्या आधीच, त्याची मस्ती सुरु झाली होती.
मी म्हणालो ( मराठीतच) " अरे हो बाबा , मला दिसतंय तू बिझी आहेस ते, मी थांबतो थोडावेळ"
तर मस्तवाल ग्रेवाल म्हणतो कसा " हिन्दी मे बात करिये, मराठी नही समझती"

तांदुळाच्या एपिसोडावरुन टाळकं फीरल होतं त्याला म्हणालो " हरामखोर, भोसडयात गेलास. जरा पुढे गेलो की चव्हाणांचं दुकान आहे, तिथे घेतो"

मी तर निघालो तिथून, पण माझ्या रुद्रावताराचा परिणाम म्हणून कि काय माझ्या आधी आलेल्या ५ कस्टमरांनी त्या ग्रेवालकडून आप्-आपली प्रिस्र्क्रिप्शन काढून घेतली आणि ते ही माझ्या बरोबर चव्हाणांच्या दुकानात आले.

सध्या मराठी अस्मितेचा मुद्दा जोरात आहे, राज ठाकरे त्यांचे विचार आणि इतर घडामोडीनी महाराष्ट्र ढवळून निघालाय. तिकडे असताना काही वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टींचं पण इकडे इतक्या दूर मात्र बरंच काही जाणवत रहातं.


अश्या मनस्थितीत बरेच विचार येऊन गेले मनात.

तिकडे तामिळी लोक बघा. श्रीलंकेत हे तामिळी दहशतवादी कारवाया करतात. आपले एक पंतप्रधान - त्यांची हत्या केली. आता त्या अतिरेक्यांच्या मुसक्या आवळत आणल्या श्रीलंकेच्या लष्कराने, तर हे सगळे तामिळी एकासुरात गळा काढू लागले. मलेशियात ह्यान्च्या वंशीयावर थोडी कारवाई केली तरी ह्याना इथे भारतात कळा येतात.

आणी आपण मराठी माणसे, आपल्या अस्मितेबद्दल एव्ह्ढे उदासीन का? असेल राजचे एक्झेक्युशन चुकीचे, पण विचार तरी धगधगतायत ना? उद्या हे बिहारी आपल्याकडे येऊन आपली डेमोग्राफी बदलून टाकतील.

अमरनाथ ट्र्स्ट्ला जमीन दिली तर तो ओमार अब्दुल्ला काश्मीरियतचे गळे काढू लागला, त्यात त्याला काश्मीरची डेमोग्राफी बदलण्याचे डावपेच दिसू लागले.

आसामी लोकांनी, आसामात परीक्षेला आलेल्या, बिहारी आणी बंगाली उमेदवारांना हाकलून दिले, तेव्हा सगळे कसे गप्प बसले होते?

मग आता राजने काही केलं ,( त्यामागचा त्याचा उद्देश काही असो) तर आपण मराठीच का ओरड करतो?
इथे महाराष्ट्रात हे भय्ये येऊन त्यांचे काय काय धंदे चालतात ते पहा.

तिकडे आमच्या कोकणात, मल्याळी येऊन शेती करतात- अननसाची आणि माशांची. अननसाची शेती कसली हो? अननसाच्या कोवळ्या कोंबाच्या गंधाने तिकडे नाग आकर्षित होतात, त्यांना पकडून , विषाची आणि कातड्याची तस्करी करतात हे.

ह्या सगळ्यांना महाराष्ट्रच का हवा? तुमचे राज्य विकसीत करा ना?


परप्रान्तीय आय्.ए.एस्.अधिकारी मुंबईत मंत्रालयात बसून , आपल्याकडे मंजुरीला आलेले उद्योग बंगाल आणि कर्नाटकात कसे जाईल ते पाह्तो. हे सगळं बंद व्ह्यायला हवं.

बॅळगाव, निपाणी, गुलबर्गाच्या सरकारी एस्.टी डेपोत जाऊन बघितलेय कधी? बघा महाराष्ट्राच्या एस्.टी गाड्या आणि त्यांच्या चालक- वाहकाला मिळणारी वागणूक. महाराष्ट्राच्याबॉर्डरपर्यन्त गाडी रिकामी येते. कर्नाटकाच्या डेपोच्या फलाटाला लावू दिली जात नाही. विरोधाभास म्हणजे नाशीकपासून कोकणात राजापुरपर्यन्त आणि शिर्डीपासून लातुरपर्यन्त त्यान्च्या कानडी बोर्ड लावलेल्या एस्ट्या मात्र बिन्दिक्कत् फिरत असतात.

अमेरिकेत आणि इंग्लडात इतके परकिय नागरिक आहेत, सरकारी नोकर्या करताहेत, पण म्हणून विमानतळावर इमिग्रेशन ऑफिसर "बाहेरचे" नसतात. ते मात्र नेटीव्ह्च असतात कि नाही?

मग आपण सगळ्याचे महाराष्ट्रात स्वागत का करतो? त्याना मोक्याच्या नोकर्या का देतो?

परवाच्या पुणे सकाळ मधील फॅमिली डॉक्टर ह्या पुरवणीसाठी एक पाककृती स्पर्धा झाली होती त्यात १, २ आणी ३ हे क्रमांक कुणाला मिळाले असतील बरं? सौ. गुप्ता,सौ ओस्वाल आणि सौ.गुजराथी. सकाळने तिन्ही भगिनींच्या पाककृती जश्याच्या तश्या छापल्या आहेत. त्यातील मराठी वाचवत नाही. पुणे सकाळच्या स्पर्धेचा हा निकाल आपल्याला काय सांगतो?

महाराष्ट्राची डेमोग्राफी बदलतेय ती ह्या लोंढ्यामुळेच!!

बघा हे असेच चालू राहिले तर मुंबई- पुण्यात महापालिकेचे व्यवहार हिंदीत होऊ लागतील, आपल्या मुलाना शिकवायला एखादा बिहारी असेल, रेलेवेच्या घोषणा भोजपूरीत होऊ लागतील, सरसोच्या तेलातील बटाटेवडे स्टेशन च्या बाहेर गाडीवर मिळतील, नाष्ट्याला फाफडा अने कढी किंवा जलेबी - दही मिळू लागेल. स्टैट बैंकेत जाऊन आपल्याला धनाचे आवंटन करावे लागेल, घरी गैसचा सिलिंडर घेऊन भैय्या येइल, वैभव आणी विजयचे बैभब आणि बिजय होतील, तसे झाले तरी कुमार केतकरप्रभॄती वसुधैव कुटुंबकम चे नारे देतील!!

मराठी संस्कृती वरचे हे आक्रमण आपणच थांबवू शकतो.

बघा पटतंय का? म्हणून सांगतो..असेल राजचे एक्झेक्युशन चुकीचे, पण विचार तरी धगधगतायत ना? मग आता राजने काही केलं,( त्यामागचा त्याचा उद्देश काही असो) तर आपण मराठीच का ओरड करतो
?

अमेरिका म्हणजे फक्त पिझ्झा आणि कोक नव्हे

सध्या अमेरिकेत कामानिमित्त तीन महिने वास्तव्य आहे. इथं आलो तेव्हा अमेरिकेबद्दल एक वेगळंच चित्र होतं. भांडवलशाही, प्रगत सोसायटी, एकमेकांशी कामापुरता संबंध ठेवणारे सहकारी, असं काहीसं चित्र मनात होतं; पण जसे दिवस गेले, तसं मनातलं हे चित्र हळूहळू धूसर होत गेलं.


मी आलो तेव्हा अमेरिकेला नुकताच हरिकेन "आयके'चा तडाखा बसला होता. मला न्यूयॉर्कला उतरून पुढे ह्यूस्टनला जायचं होतं. मुंबईला बोर्डिंगच्या वेळीच सांगितलं होतं, की हवामान खराब असल्याने ह्यूस्टनचं उड्डाण रद्द झाल्यास एअरलाइनतर्फे कोणतीही सोय केली जाणार नाही. न्यूयॉर्कला उतरल्यावर समजलं, की हरिकेनमुळे ह्यूस्टन विमानतळ बंद आहे. लगेच मुंबईतील घोषणा आठवली. मनाशी विचार केला, आठवड्यानंतर आलो तरी चालणार होतं. मुंबईत हे समजल्यावर तरी तिकीट पुढं ढकलायला हवं होतं. असू दे. आता आलोच आहे तर बघू काय होतंय ते, म्हणून एअरलाइनच्या काऊंटरवर चौकशी केली. पहिला धक्का इथंच बसला. एअरलाइनने चक्क न्यूयॉर्कमध्ये दोन दिवस चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली होती! खरं तर तांत्रिक किंवा तत्सम कारणास्तव उड्डाण रद्द झाल्यास एअरलाइनतर्फे सोय केली जाते. पण इथ ते "ग्राहक देवो भव' या उक्तीला जागले. ग्राहक हा राजा असतो, त्याचा अनुभव आला.
दुसऱ्या दिवशी ह्यूस्टन विमानतळ सुरू झाल्याचं समजलं, म्हणून न्यूयॉर्क विमानतळावर गेलो. पाऊण तासानंतर फ्लाइट होती. त्यामुळे बोर्डिंग गेटजवळ गेलो. तिथं घोषणा होत होती, "हरिकेनमुळे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी आयोजित केलेलं हे विशेष उड्डाण असून, ते कॉंटिनेंटलच्या नेहमीच्या वेळापत्रकात समाविष्ट नाही. त्याचप्रमाणे हरिकेनमुळे ह्यूस्टन विमानतळावरील आमचा स्टाफ न्यूयॉर्कला येऊ न शकल्यामुळे हे उड्डाण घेऊन जाण्यासाठी पायलट, को-पायलट, तसेच केबिन क्रू उपलब्ध नाहीत. त्यामुळे उड्डाणाला उशीर होत आहे. आम्ही प्रयत्न करतच आहोत. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व."


मला कॉंटिनेंटल एअरलाइनचा सच्चेपणा आवडला. जे आहे ते सत्य सांगितल्यामुळे तेथे उपस्थित २००-३०० प्रवाशांपैकी कोणीही तक्रारीचा सूर काढला नाही.


पुढे ह्यूस्टनमार्गे लुईझिआनामधील रस्टन येथे आलो. उतरल्यावर पाहिलं तर काय, माझं लगेज आलंच नव्हतं. कॉंटिनेंटलच्या काऊंटरवर क्‍लेमफॉर्म भरला. तेथील सुंदरीने बऱ्याच वेळा "सॉरी, सॉरी' म्हणत सांगितलं, की हरिकेनमुळे त्यांच्या सेवेवर परिणाम झाला असून, बराच स्टाफ ह्यूस्टनला कामावर येऊ शकलेला नाही. त्यामुळे ह्यूस्टनहून जे विमान मला घेऊन निघालं, त्यात माझं लगेज चढवलं गेलं नाही. सुंदरीने सांगितलं, की लगेज मिळण्यास २-३ दिवस तरी लागतील. तसं बघितलं तर सर्व कपड्यांचा एक संच हातातल्या बॅगेत ठेवला होता. त्यामुळे दोन-तीन दिवस काढायला हरकत नव्हती; पण एअरलाइनतर्फे मला एक नित्योपयोगी वस्तूंचे किट दिल्यावरच तिचं समाधान झालं.

तिने दोन-तीन दिवस म्हणून सांगितलं खरं, पण खरोखरच दोन दिवसांनंतर लगेज घेऊन कुरिअरचा माणूस घरी हजर! आल्यावर एकच प्रश्‍न, ""यू, कॅपिल?'' मी हो म्हणताच कोणतेही ओळखपत्राचे सोपस्कार न करता लगेज माझ्या हवाली! समोरच्यावर विश्‍वास दाखवला, तर सगळ्याच गोष्टी सोप्या होतात त्या अशा. पण एवढाही विश्‍वास बरा नाही, असं मनाशी म्हणत लगेज ताब्यात घेतलं.
आता काम सुरू करून तीन आठवडे झाले. थोडासा उष्णतेचा त्रास सुरू झाला. अंगावर फोड आले. ऑफिसमध्येच ताप आला. त्यामुळे डॉक्‍टरचा शोध सुरू केला. जवळच्या डॉक्‍टरकडे दोन आठवडे बुकिंग म्हणून "वॉक-इन' क्‍लिनिक (वॉक-इन क्‍लिनिकमध्ये अपॉइंटमेंटची गरज नसते. नावाप्रमाणे जस्ट वॉक-इन!)ची चौकशी केली. आता ही बातमी कानावर जाऊन कंपनीची एच.आर. हेड ब्रेंडा रॉबिन्सन माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, ""माझ्याकडेच का नाही आलास थेट? आता चल, मी तुला घेऊन जाते वॉक-इन क्‍लिनिकमध्ये.'' असं म्हणून ती मला स्वतःच्या गाडीत घालून घेऊनसुद्धा गेली.


क्‍लिनिकमध्ये ती माझ्यासोबत माझा नंबर लागेपर्यंत तासभर आपलं काम सोडून बसली. हे कमी म्हणून की काय, डॉक्‍टरनी लिहून दिलेली औषधं जाता जाता वॉल-मार्टमधून घेऊन जाण्याचा आग्रहसुद्धा तिने केला. वॉल-मार्टमध्ये प्रिस्क्रिप्शन "ड्रॉप' केल्यापासून औषधं मिळेपर्यंत अर्धा तास गेला. तोपर्यंत ब्रेंडा माझ्याबरोबरच! औषधं घेऊन मला घरी सोडेपर्यंत संध्याकाळचे साडेसात वाजले. आता हिला "थॅंक्‍यू' तरी कसं म्हणावं, या विचारात मी असताना ब्रेंडा मला म्हणते कशी, ""तू आता औषधं घे आणि दोन दिवसांत नेहमीप्रमाणे उत्साहात कामावर ये पाहू. तुझ्या "थॅंक्‍यू'पेक्षा तू बरा होणं हेच माझ्यासाठी मोठं आहे, माय सन! तुझी आई नसती का आली तुझ्याबरोबर?''

कंपनीची एच.आर. हेड हजारो मैलांवरून आलेल्या एक नवीन, अनोळखी स्टाफसाठी आपला एवढा वेळ खर्च करते, याचं मला कितीतरी कौतुक वाटत राहिलं.
हा देश प्रगत असण्याचं कारण तांत्रिक प्रगती तर आहेच, पण इथल्या माणसांची मानसिकता, त्यांचा सच्चेपणा आणि दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्तीसुद्धा आहे. हा समाज परस्परांवरच्या विश्‍वासावर चालतो.
आता मला आलेल्या अनुभवांकडे दुसऱ्या नजरेतूनही पाहता येईल; पण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. असं म्हणतात ना, की "द वर्ल्ड इज द मिरर फॉर यू. द वर्ल्ड लुक्‍स ऍट यू, इन द सेम वे, यू लुक ऍट द वर्ल्ड.' माझ्या आधीच्या कंपनीतील बॉस म्हणायचा, ""हॅप्पी पीपल गेट हॅप्पी एक्‍स्पिरिअन्सेस.''
काही वर्षांपूर्वी अंतर्नाद चे संपादक भानू काळे यांनी एका लेखात एक अमेरिकन कोट्याधीश एका बेकार तरुणाला मदत करुन, त्याला आपला धंदा सुरु करण्यास कशी मदत करतो, ते सांगून, अमेरिकन व्हॅल्यूज ची चर्चा केली होती. लेख संपवताना त्यांनी म्हटलं होतं की, "अमेरिका म्हणजे फक्त पिझ्झा आणि कोक नव्हे." त्या वेळी ते काही तितकंसं पटलं नव्हतं मनाला.
पण आज ग्राहकाप्रती सच्ची, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारी, परस्परांवर विश्‍वास ठेवणारी अमेरिकन माणसं अनुभवल्यानंतर मीसुद्धा म्हणेन!
अमेरिका म्हणजे फक्त पिझ्झा आणि कोक नव्हे."

अमेरिकेतील खादययात्रा!! भाग-१







इथे आल्यावर, आजूबाजूला बघितल्यावर अमेरिकन लोकांची खादाडी जाणवतेच. आल्यावर पिझ्झाह्टमधे गेलो होतो. तिथे वेजी असा एक पिझ्झा उपलब्ध असतो. तो मेडीयम ऑर्डर केला. इथे कोणत्याही रेस्टारंटात सॉफ्ट ड्रींक भरपूर मिळतात. आणि त्याचा ग्लास साधारण अर्धा लिटरचा असतो. त्यात निम्मा ग्लास आईसक्युब्ज घालून उरलेल्या जागेत सॉफ्ट ड्रींक भरले जाते. पहिला ग्लास संपत आला की दुसरा भरून मिळतो, दुसरा संपला की तिसरा. त्याला काही लिमिट नाही. पण निम्मा ग्लास आईसक्युब्ज घातलेले ते पाणचट सॉफ्ट ड्रींक एक ग्लास सुद्धा संपत नाही. हे लोक मात्र, म्हणजे, आबालवॄद्ध सगळे, ते आईसक्युब्ज कुरुम, कुरुम, असे चावून खात, सॉफ्ट ड्रींकचे ग्लासवर ग्लास रिचवत असतात. पाणी सहसा कोणी पिताना मी तरी नाही बघितला!! पेप्सी, कोक, किंवा फ्रूट ज्युस! आणि त्याबरोबर निम्मा ग्लास आईसक्युब्ज हवेतच. माझ्या ऑफिसमध्ये शेजारच्या क्युबीकलमधून वेळी-अवेळी कुरुम, कुरुम आवाज कसला येतो त्याचा उलगडा मला पिझ्झाह्ट मधे झाला!!


तर असो! मी काय सांगत होतो, मेडीयम वेजीपिझ्झा ऑर्डर केला. त्याच्याबरोबर गार्लिक ब्रेड, चीज डीप आणि सलाड. ऑर्डर सर्व्ह होईपर्यन्त माउंटन ड्यू घेतले. ते वर सांगितल्याप्रमाणे आले-निम्मा ग्लास आईसक्युब्ज घालून! मित्राशी गप्पा मारताना पहिला ग्लास संपवला. म्हणून दुसरा ग्लास आणू का, असं विचारयला आलेल्या वेट्रेसला म्हटलं की "येस, प्लीज रीफील, बट विदाउट आईसक्युब्ज" कुठ्च्या परग्रहावरुन आलाय हा प्राणी, असे भाव चेहर्यावर आणत तिने दुसरं ग्लास आणून ठेवला.सॉफ्ट ड्रींक विदाउट आईसक्युब्ज हे काही तिला पचनी पडलेलं दिसलेलं नव्हतं.

पण आता आलेला मेडीयम वेजीपिझ्झा पाहून आम्ही दोघेही हादरलो, त्या सहा तुकड्यांपैकी दोघात कसेबसे चार संपले. बहुतेक दोन ग्लास माउंटन डयू चा परिणाम असावा.त्या स्मॉल पोर्शन गार्लिक ब्रेडकडे पाहून वाटलं की हा स्मॉल तर लार्ज केव्हढा असेल? त्त्याच्यासोबत असेलेले चीज हे डीप करण्यासाठी होतं की चमच्याने खाण्यासाठी ते कळेना! दोन माणसांसाठीचे सलाड म्हणजे आम्हा दोघांना आठवडयाची पालेभाजी झाली असती.

शेवटी होईल तेव्हढे संपवून बाकीचे पॅक करुन घेऊन आम्ही निघालो.पण बाकी सर्व टेबलांवर यथेछ खादाडी सुरु होती. ग्लासावर ग्लास सॉफ्ट ड्रींक कुरुम, कुरुम आवाज करत रिचवली जात होती. चिकन सलाड, टुना आणि सलमॉन माश्याचे सलाड, टर्कीब्रेस्ट, बीफस्टीक, लार्ज पिझ्झे, लार्ज गार्लिक ब्रेड विथ चीज डीप आरामात संपत होते. आसपासची अमेरिकन माणस डीनरांनंदात तल्लीन झाली होती!!

इथे खाण्याचे सगळेच प्रकार किंगसाईझ!! तयार फ्रोझन फूड असूदे, किंवा दही , दूध चीज असूदे. सगळ्याचं पॅकिंग मोठं मिळणार. दूध लिटरमधे नाही मिळत, एक किंवा अर्धा गॅलन मिळतो ( १ गॅलन= ३.७८ लिटर!!) दह्याचा, सँडविच स्प्रेडचा, पी-नट किंवा आलमंड बटरचा, चीजचा,पॅक कमीतकमी २ पौंडी( म्हणजे साधारण १ किलो). ब्रेडचा लोफ सुद्धा दिड पौंडी. सफरचंद, पीचेस, प्लम फ्रूट्स,पीअर,वाटरमेलन,पम्प्कीन काहीही घ्या ३पौंडी आकर्षक भरलेल्या पिशव्या मिळतील, लूजपण मिळतात. छोटया भोपळ्याएव्हढा टोमॅटो बघायला मिळेल. कांदे- बटाटे बचक्यात बसणार नाहीत-एकाचं वजन असेल अर्धा पौंड! वेफर्सची पाकीटं सुद्धा अशीच प्रचंड. कॉर्न ऑइलची, ऑलिव्ह ऑइलची बाटली कपाटात सहसा न मावणारी! महात्मा ब्रॅन्ड तांदूळ मिळेल १०पौंडी पॅकमधे. विश्वास बसत नाही . फोटो पहा.

आटयाचे कितीप्रकार सांगू? ब्लीच्ड आटा, स्टोन ग्राउंड आटा( म्हणजे काही प्रक्रिया न- करता, आपल्या चक्कीवर मिळतो तसा!!) ऑल्-परपज आटा,कॉर्न्-मील( मक्याचा प्रकार) ओट-मील घ्याल तेव्ह्ढे !!


मांसाहारींसाठी तर इथे स्वर्ग आहे. पोर्क,मटण, लॅम्ब, बीफ, चिकन, बेकन, टर्की ( बदक?) , कोळंबी, लॉबस्टर, टुना आणि सलमान फीश (खान नव्हे) चे विविध प्रकार दिसतील, किसलेले लांब शेवयांसारखे बीफ, कणकीच्या गोळ्यासारखे बीफ, जाडसर काप काढून ठेवलेले बीफ मिळेल, पापडाची लाटी करायच्या आधी आपण जशी लांब गुडाळी करतो तशी लांब गुंडाळी केलेले बीफ तर फूटावर मिळते. म्हणजे पॅकच्या बाहेर किती फूट लांब गुंडाळी ते लिहिलेले असते. बहुधा अश्या गुंडाळ्यांचे डायमीटर सगळीकडे सारखे असावेत!!


पोर्कच्या चरबीत तळलेल्या वेफर्स आणि चिकनच्या चरबीतील बिस्किटे हा इथला हीट आयटेम आहे. बहूतेक वेळा हे दोन्ही पदार्थ आउट ऑफ स्टॉक असल्याचे बोर्ड लागलेले दिसतात.
हे सगळं वाचून ह्या पॄथ्वीतलावर चार पायांवर चालणारे कोणतेही प्राणी इथे खायला उपलब्ध असतात की काय अशी शंका आल्यास ते वावगे नाही.


असं असेल तर शाकाहारींनी खायचं तरी काय?... नाराज नका होऊ, वाचा भाग-२ नमुन्यादाखल फोटो इथे दिले आहेतच. अजून फोटो बघण्यासाठी भेट द्या माझ्या पिकासा वेब अल्बमला.






http://picasaweb.google.com/kapilkale75/JHLKxF#



अमेरिकेतील खादययात्रा!! भाग-२











वरती सांगितल्याप्रमाणे सफरचंद, पीचेस, प्लम फ्रूट्स,पीअर,वाटरमेलन,टरबूज,स्ट्रॉबेरी अशी विविध फळं तर आहेतच, पण त्याच्या जोडीला लेट्यूस चे नानाविध प्रकार असतात, बीटाच्या रंगाचा कोबी, प्रचंड भोपळे, एक मिरची पसाभर सहज होईल अश्या लाल, पिवळ्या, हिरव्या ढोबळी मिरच्या, ब्रोकोली, २ पौंडी कॉलीफ्लावर, फूटभर लांब, आणि बोटभर लांब गाजरं, कांदापात, मोहरीचा पाला, रताळी, काटे-कणगरं, ऑलिव्ह- ताजे आणि खारवलेले, अस्पारागसच्या मुळ्या, रताळी, कांदे- बटाटे, अर्धा फूट लांब केळी, आणि एव्हढं कमी म्हणून की काय, चहाची पात सुद्धा आहे उपलब्ध. वाटाणे, हरभरे, मटार, राजमा अशी कडधान्य नका घ्यायला विसरू, हो. ओला नारळपण मिळतो. अगदी खोबरं खरवडून!


मग हे सगळं घेऊन स्वयंपाक करायचा तर कांदा- लसूण पेस्ट? ती सुद्धा आहे. त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. लसणीची बारीक पूड मिळेल, तसेच लसणीचे क्युब्ज मिळतील( क्यूब्ज करण्याइतपत जाड पाकळी असते लसणीची!!) कांदयाचे ग्रॅन्यूल्स आवडतात की पावडर? ते ही आहेत. कांदा- लसूण पेस्ट बरोबर, आलं घालून मिळालं तर काय बहार येइल ? नाराज नका होऊ ते ही मिळेल. टोमॅटोचे किती प्रकार? डाईस्ड(काप केलेला),मिन्स्ड(छोटे गोळे केलेला),बॉईल्डपील्ड-व्होल,( उकडून सोललेला पण अख्खा!!) प्युरी आणि पेस्ट. एक ना अनेक, दम लागेल, बेताने वाचा.


आणि मग मसाल्यांचं काय हो? प्रवीणचे मसाले आहेत ( पण किंमत बघून, ५० ने गुणून झालं की पाकीट परत कपाटात आपसूकच जाईल) पण म्हणून काय झालं? वेस्ट इंडीज आणि मेक्सिकोहून आलेले मसाले घ्या ना.!! दालचिनी, तमालपत्र, पांढरी मिरी, काळी मिरी, धने,जिरं,मोहरी, मेथी संकेश्वरी मिरचीच्या तोडीसतोड लाल मिरची एव्हढं कमी म्हणून की काय दगडफूल सुद्धा आहे.


आता एव्हढं सगळं चांगलं-चुंगलं हादडल्यावर स्वीट डीश हवी ना? का नाही? विविध आईस्क्रीम्स आहेत. त्यातही ब्लॅक फॉरेस्ट, वालनट- आलमंड, ड्राय्-फ्रूट, फ्रेश- फ्रूट असे तोंडाला पाणी सोडणारे प्रकार आहेत. अट एव्हढीच की कमीत कमी २पौंडी पॅक मिळेल, जास्तीत जास्त १०पौंडापर्यंत. इथे पहिल्यांदा आईस्क्रीम्स टब असे का म्हणतात असा प्रश्न पडला होता. पण ते आपल्याकडच्या ऑईलपेंट्च्या प्लॅस्टीकच्या डब्यांएवढे आईस्क्रीम्सचे कंटेनर पाहून टब ह्या नावाव्यतिरिक्त दुसरं कोणतंही नाव त्याला शोभून दिसणार नाही याची खात्री होते.

इथल्या चॉकलेट्सबद्दल मी काय सांगावं? केक आणि पेस्ट्रीजची रेलचेल असते. हलोविनसाठी भोपळ्याचा केक मला आपल्या दसर्याच्या भोपळ्याच्या घारग्यांची आठवण करुन गेला. आगेमागे येणारे दोन्ही सण भोपळ्याशिवाय साजरे नाही होत. चॉकलेट फज केक,चीज केक, प्लम फ्रूट् केक, ब्लॅक फॉरेस्ट,स्ट्रॉबेरी, रास्पेरी केक, ऑरेंज्-ब्लॅक ग्रेप केक, अशा नानाविध प्रकारांबरोबरच तेव्ह्ढीच नवलाईची मूज मिळतात- मॅगो, पायनापल चॉकलेट ह्या आपल्याकडे उपलब्ध असणार्या मूजबरोबरच, मी इथे किवी, ग्रेप आणि क्रॅनबेरीचे मूज अवश्य खातो. मूज म्हणजे आईस्क्रीमही नाही आणि केकही नाही असा अर्धवट प्रकार. पण तो मूज केक नको हं फक्त मूज आहे का ते पहा.

विविध प्रकारच्या फळांचे रस मिळतील अगदी आपल्या आंबा, संत्र्यापासून ते किवी, लिची, स्ट्रॉबेरी, रास्पेरी,क्रॅनबेरीच्या रसापर्यन्त. ही सगळी फळं- डाईस्ड( काप काढलेली) मिळतील, टीनपॅक करुन. फोडून खाल्ला की दिला फेकून. तशी नकोत तर फ्रेशली कट ह्या प्रकारात घ्या की!!

अमेरिकेत खादाडीला फुल्ल स्कोप आहे बरं का भाऊ, फक्त तुमची नजर हवी आणि काही दिवस आपल्या नेहमीच्या डायेटमधे बदल करुन हे सगळं एक-एकदा तरी ट्राय करुन बघायची हौस!!
(नमुन्यादाखल फोटो इथे दिले आहेतच. अजून फोटो बघण्यासाठी भेट द्या माझ्या पिकासा वेब अल्बमला)




http://picasaweb.google.com/kapilkale75/JHLKxF#

October 22, 2008

माझा गाव आणि माझे लहानपण-भाग-१

मुंबई- गोवा हायवेशेजारी वसलेलं माझं गाव- खारेपाटण(Kharepatan). रत्नागिरी- सिंधुदुर्गजिल्ह्यांच्या सीमे वर वसलेलं. हायवे वरून पाहीलं तर गाव खाली रहातो. असेल एक १०० फूट खाली नदीच्या किनारी. पण वरून छान दिसतं चित्र. गावातल्या घरांची कौलारु छपरं,भातशेती, माड, कलमं असं अगदी टीपीकल कोकणी गाव वाटतं, पण मला दिसलेलं, लहानाचा मोठा होईपर्यंत अनुभवलेलं गाव-- ते तर वेगळेच आहे.

हायवे वरून झोकदार वळण घेऊन गाडी खाली उताराला लागली की समोर आमची शाळा लागते. आणि तेव्हा आमचं गाव सुरु होतं- खारेपाटण. शाळेजवळून पुढे गेलात तर "राऊतांची विहिर" दिसते. आमच्या लहानपणी तिथे एक विचित्रपणे वाढलेला माड होता. विचित्र अशासाठी की सरळसोट वाढून तो अचानक वळण घेता झाला होता. त्यामुले तो एखादा विळा/कोयता उभा करुन ठेवल्यासारखा दिसे! ती आमच्या शाळेजवळची राऊतवाडी, विहिरीवर पाणी भरणार्या बायका, त्यांच्या गप्पा,त्यांचे कपडे धुताना येणारे फट- फट असे लयबद्ध आवाज, काढण्याने पाणी काढून, कळशीत ओतताना होणारा तो विशिष्ट नाद, आणि ह्या सगळ्याचा एकत्रित होणारा परिणाम , मी अजूनही तसाच जपून ठेवला आहे मनाच्या तळाशी!

विहीरीकडून पुढे गावात निघालो की डाव्या हाताला थोडं लांबवर राणे डॉक्टरांच्या दवाखान्याकडे नजर जाते. . लहान असताना त्यांच्या दवाखान्यात बघितलेले त्यांचे पदवीदानाचे फोटो, त्यांच्या बॅचचे फोटो अजून आठवतात. तेव्हा तर त्यांच्या दवाखान्यातील, पेशंटाना बसण्याच्या खोलीत भिंतीवर लावलेले शरीराच्या विविध भागांचे क्रॉस्-सेक्शन्स, विशेषतः मानवी जबड्याचा कुण्या फिरंगी चित्रकाराने काढलेला सेक्शन,त्यातील ती पिंग्या-सोनेरी केसांची मुलगी, आयुष्यात पहिल्यांदाच बघितलेली ती फिरंगी रंगसंगती, जुनी शिसवी लाकडाची,हात ठेवण्याची जागा गोल केलेली बाकं, काचेच्या बाटलीतून, बाहेर मापाची कागदी पट्टी लावून मिळणारं लाल औषध, आणि " काय गे, आपली बाटली येताना घेऊन येवक काय झाला?" असे लटकेच राग भरणारा कंपाऊंडर,- सगळं अजून जसच्या तसं आठवतं. विशेष म्हणजे आजही त्यांचा दवाखाना आहे तसा , त्यांच्या पुढील पिढीने जपलाय!!


रस्त्याच्या दुतर्फा असणारे भाताचे मळे आणि उजव्या अंगाला दिसते ती खडकवाडी, इथल्या देवस्थळींच आमच्या गावात मेडिकल दुकान आहे. तेव्हा त्यांच्याकडे कधीही गेलं तरी आल्याची गोळी हातावर मिळायचीच. आपल्याकडे एखादे औषध नसल्यावर ते आजोबा, थोडं इकडे-तिकडे बघून म्हणायचे " अमॄतांजन,?अमॄतांजन,अमॄतांजन,अमॄतांजन नाsssहीsss. म्हणजे कसं गिर्हाईकलाही समाधान वाटायचं की एवढं शोधून देखील आपल्याला हवंय ते औषध नाही बुवा मिळत. "लर्न द आर्ट ऑफ सेयीन्ग नो" चे धडे मी आज शिकतो, पण ती कला त्या देवस्थळीआजोबांना तेव्हाच अवगत होती!!


केदारेश्वराच्या मंदिराजवळून पुढे गेल्यावर एस्.टी स्टँड. तिथला आमचा अकबर पेपरवाला, त्याची त्याच्या भावाबरोबर पेपरविक्रीवरुन होणारी भाडणं आणि आजूबाजूच्या स्टाँल्सवरून येणारा कांदाभज्यांचा घमघमाट हे दोन गोष्टीं अजूनही आहेत. स्टँडशेजारच्या तॄप्ती कोल्ड्रींक हाऊसमधे तेव्हा मिळणार्या लस्सीची चव आणि दर्जा अजूनही आहे तसाच. पण तिथला तो गोटी सोडा फोडताना येणारा आवाज आता मात्र येत नाही कारण गोटी सोड्याची जागा आता आधुनिक कोला आणि पेप्सीने घेतली आहे.


इथून गावाची बाजारपेठ सुरु होते. बाजरपेठेतील लाल मातीच्या रस्त्यावर, धूळ उडू नये म्हणून , सपासप पाणी मारणारे व्यापारी बघत पुढे निघालं की, डाव्या बाजूला एक चप्पलांचं दुकान दिसतं. मी लहान असताना म्हणजे १९८०-८२ साली ते दुकान, भारत-पाकिस्तान फाळणीतून आमच्या गावी आलेल्या एका सिंधी कुटुंबाने सुरु केलं. त्यांच्यासमोर तळगांवकरांचं दुकान, पानाच्या करंडीवर पाणी मारत, एका हाताने ते देठाच्या बाजुने खायची पाने अशी सफाईने मोजत. त्यानंतर त्या पानांची उभी गुंडाळी करून त्याला बारीक धागा बांधून देत असत. इतका वेळ त्यांच्या दुकानासमोर उभे राहिलात की तंबाखूचा उग्र नी तिखट गंध तुमचा नाकात घुसलाच समजा!! असोली सुपारी, सुपारी खंड आणी पूजेला लागणारी अख्खी सुपारी त्यांच्याचकडे मिळायची.

माझा गाव आणि माझे लहानपण- भाग-२

थोडं पुढे गेल्यावर भाजीची दुकानं. त्याच्या पलीकडे दिसणारे कौलाचे डेपो, सॉ-मिल ( म्हणजे लाकडे चिरुन त्याच्या फळ्या, वासे बनवणारी मिल), तिथे कामाला आलेल्या, लाकूड, कौले घेऊन जाण्यासाठी उभ्या असलेल्या बैलगाडया. ह्या सॉ-मिलवर मात्र मी जायचो. तिथे दोन रेल टाकून, त्यावर एक ट्रॉली असायची, ट्रॉलीवर कापायचे लाकूड/ ओंडका ठेवून, ती ट्रॉली बटण दाबल्यावर पुढे यायची. इकडे गोल फिरणारं पातं तयार असायचं. पण त्या पात्याचा स्पीड बदलून, ओंडक्याची स्थिती बदलून वेगवेगळ्या प्रकारचे आकार तयार होत. ते बघायला मजा वाटायची. ती करवत चालवणरा आणि ओंडक्याची स्थिती बदलणारा , दोघांनीही एक जाड चामडयाचे जॅकेट घातलेले असायचे, काही इजा होऊ नये म्हणून. आजुबाजूला उडणारा लाकडाच्या भुश्शात खेळताना मजा यायची.

बाजारपेठेत विष्णूमंदिराच्या आसपास सगळी, कावळे, ब्रम्हदंडे, उन्हाळकर ह्या जैन मंडळींची दुकानं. तिथे असणार्या तिरफळ आणि काजू बियांच्या दरवळातून पोस्टापर्यंत जातोय न जातोय तर आपली तंद्री भंग पावायची ती तालबद्ध ठोक्यांच्या आवाजाने. कुठून यायचा बरं हा आवाज?

जरासं पुढे , माझा मित्र समीरच्या वडिलांचं भांडयांचं दुकान होतं. स्टेनलेस स्टील, पितळ, तांब्याची विविध भांडी आकर्षकपणे मांडून ठेवलेली असत. आता भांडी- पातेली आकाराने मोठी , म्हणून ती मावतील असा लाकडी फळ्या व साखळ्यांचा बनवलेला, एक तागडी २ फूट बाय २ फूट असेल, असा तराजू लक्ष वेधून घ्यायचा. त्यांच्या दुकानात पाठीमागे एक कारागीर बसायचा. त्याच्यासमोर एक लोखंडी खुंटा असायचा, त्या खुंट्यावर एखादा पितळी,किंवा तांब्याचा हंडा उपडा ( म्हणजे त्याचे तोंड खाली) करून , त्या हंड्यावर ठोक्याची नक्षी काढायचे काम तो कारागीर अगदी तल्लीन होऊन करायचा. त्याच ठोक्यांचा तो नाद, एखाद्या तबलजीने तबला वाजवावा तसा आसमंतात भरून राही.दुसरं महत्वाचं आकर्षण म्हणजे खरेदी केलेल्या भांड्यावर मशीनने नांव घालतानाचा आवाज!! ण्टर्र्,ण्ट्र,ण्टर्र्,ण्ट्रण्टर्र्,ण्ट्र आणि शेवाटी थांबताना एक दीर्घ ण्टर्रर्रर्रर्र.

समीरच्या दुकानासमोर, डॉ. सोमणांचे घर. माझे वडिल त्यांच्याकडे रहयला होते, शिकताना. त्यामुळे बाजारात गेलो कि सोमणांकडे गेल्याशिवाय काही आम्ही परत जात नसू. ते होते मिलिट्रीत कर्नल, तिकडून रिटायर होऊन गावाला आलेले. त्यामुळे सोमणआज्जींकडे विविध पदार्थ असायचे. माईन मुळ्याचं लोणचं, दाल-बाटी आणि पॅशन्-फ्रूटचे सरबत (त्यांनी पॅशन्-फ्रूटचे एक झाड लावलं होतं) असे त्यवेळी अनवट असलेले पदार्थ सोमणआज्जींकडे चाखायला मिळायचे.अजून थोडं चालल्यावर, धाक्रसांचा वाडा लागायचा, त्याला भव्य दिंडी दरवाजा होता.

तिथून पुढे सुरु व्हायची ती, ढेकणे, पिसे आणि गाठे ह्यांची कापड दुकाने. "घ्या हो, अगदी ब्राम्हणी वाण आहे हो, तुम्हाला छान दिसेल"असं मिठ्ठास बोलत आपण आत गेल्यागेल्या विविध लाईट्स सुरु करणरे विनायकराव पिसे म्हणयचे कि "बघा , एकच वाण आहे हो, असा दुसरा नग नाही, जणू काही तुमच्या साठीच आणला आहे' एव्हढं गोड बोलल्यावर तुम्ही नाही म्हणूच कसे शकता?

तिथून वरती घाटी चढून गेल्यावर आपण पोचतो ते किल्ल्यावर. इथे शिवाजी राजांनी राजापूरच्या दोन डचांना पकडून कैदेत ठेवलं होतं. किल्ल्यावर शिवकालीन भवानी मंदिर आहे. तिथे दसर्याला, गाव पारध झाली की मारलेल्या रान डुक्कराच नेवैद्य दाखवला जातो. गाव पारध म्हणजे दसर्याच्या दरम्यान कापणीला आलेल्या भातशेतीची नासडी करणार्या रान डुक्करांना मारणे. दसर्याला किल्ल्यावर पतंग उडावण्याचा कार्यक्रम असे. किल्ल्यावर उभं राहून समोर साजराबाईची त्रिकोणी टेकडी दिसायची. आपला पतंग अगदी त्या टेकडीपर्यंत जावा असं वाटायचं. दसर्याला गुरवाने आपट्याची पाने खड्सून ( झाडावर चढून फांद्या खाली कापून टाकणे) टाकली की त्यातील सोने लुटायला ही झुंबड उडायची.

माझा गाव आणि माझे लहानपण-भाग-३

समुद्राच्या भरतीचं पाणी खारेपाटणपर्यंत येतं.खारेपाटण हे इतिहासात एक व्यापारी बंदर होतं. तिथून मीठ आणि कौलांचा व्यापार चालायचा. गावातून वाहणारी शुक नदी सह्याद्रीत उगम पावते आणि खाली ५०- ६० किमीवर समुद्राला मिळते. त्यामुळे तेव्हा खारेपाटणच्या डाउनस्ट्रीमचे लोक बाजाराला इथे यायचे ते भरती सुरु झाली की. म्हणजे समुद्राच्या भरतीच्या पाण्याबरोबर होडी आपोआप यायची. ओहोटी सुरु झाली की ओहोटीच्या पाण्याबरोबर घरी परत जायचं. खारेपाटणला खूप जुना इतिहास आहे. तश्या इथे खूप खूणा सापडतात. फारसे कुठे न आढळणारे सूर्यमंदीर आणि सूर्यमूर्ती इथे आहे.

साजराबाईच्या टेकडीच्या पायथ्याला आमची कॉलनी आहे. ते एक २५-३० घरांचं कुटुंबच!!. गावात, बाजारपेठेत पावसाळ्यात पूर यायचे हमखास. त्यामुळे, गावापासून थोडं दूर, उंचावर, मुंबई- गोवा हायवेच्या कडेला आमची कॉलनी झाली. जेव्हा ही कॉलनी बांधली तेव्हा तिथूनच दगड काढले गेले, त्यामुळे एक मोठ्ठ तळं निर्माण झाल आहे.विशेष महत्त्वाचं म्हणजे आमची कॉलनीच्या जागेवर एक पुरातन विहीर होती. अजूनही आहे. ही काही साधी नेहमीची विहीर नाही. ही विहीर अती-प्राचीन असून तीला नऊ बाजू आहेत. म्हणजे जसं चौकोनी किंवा गोल बांधकाम असतं तसं हे नऊकोनी . कुण्या अनामिकाने प्राचीनकाळी हे नऊकोनी बांधकाम का केल ते नाही कळत.

हायवेच्या कडेने दुतर्फा वडाची झाडं छान सावली देतात. ह्या वडांच्या झाडाखाली हायवेच्या कामासाठी सिमेंटचे मोठे पाईप टाकले होते. तेव्हा आम्ही मित्रमंडळी त्या पाईपांवर चढून वरती वडाच्या पारंब्या धरून, खाली पायाने पाईप पुढे ढकलण्याचे अचाट खेळ खेळायचो. पावसाळ्यानंतर टाकळे माजले की त्यावर येणार्या पिवळ्या- करड्या फुलपाखरांच्या मागे बेभान होऊन धावायचं आणी आपली फुलपाखरांची शिकार एकमेकाला दाखवण्यात काय थ्रील वाटायचं राव. पण आता त्याला क्रूरपणा, निसर्गाचा ह्रास असे काही काही म्हणतात!

तसाच क्रूरपणा म्हणजे खैराच्या झाडावर कोवळे कोंब खायला आलेले भुंगे पकडून, त्यांना करवंदीचा काटा आणी पानात टोचून , तो कसा काटयाभोवती सुटकेसाठी फिरतो ते पाहणे. पुढे फिजिक्सच्या प्रोफ नी सेंट्रीफ्युगल फोर्सचा कन्सेप्ट शिकवताना, मला तो करवंदीच्या काट्याभोवती फिरणरा भुंगा आठवला!!मग पुढे -पुढे क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी सुरु झाल्यावर असले खेळ बंद झाले.

पण आमच्या कॉलनीत खूप धमाल यायची. समोर रामेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागे डोंगरावर आकाश टेकल्यासारखे वाटायचं. त्याला आम्ही क्षितीज-रेषा म्हणत असू. त्या डोंगरावरून पावसाळ्यात आम्ही नैसर्गिक घसरगुंडी करायचो. म्हणजे चक्क उतार पावसाने निसरडा झाला की बसून घसरत यायचं खाली. दर पावसाळ्यात एक तरी चड्डी घासून फाटायचीच!!

माझा गाव आणि माझे लहानपण-भाग-४

साजराबाईच्या टेकडीवर पाणी योजनेची टाकी आहे. टेकडीच्या टॉपवर गेल्यावर, फणफण वारा अंगावर घ्यायला जाम मजा यायची. तिथून खाली बघितल्यावर वळणं घेत जाणारी आमची शुक नदी दिसायची. तिच्यावरचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे जोडणारा पूल दिसायचा. ह्या नदीवरचा हा एकमात्र पूल. काळ्या दगडांच्या कमानींचे देखणे ब्रिटीशकालीन बांधकाम आहे. समोर पाहिल्यावर दूर वळणं घेत जाणारा हाय वे दिसायचा. तिकडे लांबवर एखादी गाडी दिसली की आम्ही आकडे मोजायला सुरुवात करायचो. गाडी किती आकडयात टेकडीच्या पायथ्याशी आली ते बघणे ह्यात पण मजा यायची.


गणपतीत एकमेकाच्या घरी जाऊन आरती करणे, उद्याच्या आरतीला प्रसाद काय पाहिजे ह्याची हक्काने फर्माईश करणे, कुणाची आरास कशी आहे त्यावर चर्चा करणे ह्यात गणपती कधी आले आणी कधी गेले तेच कळायचे नाहीत.दसर्याला घरोघर जाउन आपट्याची पाने वाटणे आणि संक्रांतीला तीळगूळ वाटणे हे ओघानेच आले.


दसर्याच्या दरम्यान रामेश्वराची समाराधना असायची. सगळ्यांनी एकत्र येऊन, एकत्र मेहनत , साफ सफाई करून, देवाची आराधना करून ,एकत्र स्वयंपाक करून, एकत्रच जेवायचे असा तो कार्यक्रम असायचा. समाराधनेचा साधा सोपा मेनू म्हणजे केळीच्या पानावर लाल भोपळ्याची, लाल मिरच्या घातलेली भाजी, भरीत आणि तांदुळाची खीर. जमल्यास भात खायचा!! आहाहा!! हाताला लागलेला भाजीचा वास कितीवेळ जायचा नाही.

कोजागिरीला तर सगळा गाव रात्री वरती हायवे वर जमा होतो. आटीव दूध आणि भेळीच्या साथीला, गाणी, गप्पा आणि भेंड्याना उत येतो.आसपासच्या सर्वांगी फुललेल्या सात्वीणीच्या सुगंधाने मन मोहून जाते!!

कॉलनीत दिवाळीला तर मजाच असायची.घरांच्या दोन-दोन ओळी आणि मधे रस्ता अशी छान रचना होती. तो रस्ता झाडून साफ करून, नंतर आम्ही दिवाळीला प्रत्येकाने आपल्या कंपाउंडवरती मेणबत्त्या लावल्या की एक नयनरम्य दॄश्य दिसायचे. त्यात परत पहाटे पहिला फटाका कोणी लावला ह्याची स्पर्धा असायची.

दिवाळीनंतर गावातल्या देवळांच्या जत्रा सुरु होत. त्यात कालभैरवाची आणी दत्तजयंतीला होणारी जत्रा तर डोळ्यासमोरुन हलत नाही. ताज्या कोकणी खाज्याचा, कांदाभज्यांचा, फुग्याच्या रबराचा, मालपुव्याचा आणि त्याचवेळी बहरणार्या काजूच्या मोहोराचा संमिश्र सुवास अजूनही डिसेंबरात येतो. तो कोलाहल, गॅसबत्त्याचा उजेड, शिटट्यांचे, पिपाण्यांचे आवाज अजूनही कानात घुमतात.


वेळ काढून मी बर्याच वेळेला जातो गावाला. सगळीकडे फिरतो. गाव विकसित होत चाललंय, इथे आता मोबाइल फोन आहेत, इंटरनेट आहे, चकचकीत रस्त्यांवर, आधुनिक गाड्या आहेत, गावाकडे चाकरमान्यांनी बांधलेली,"सेकंड होम्स" सुद्धा आहेत. त्यात माझं जुनं गाव कुठे? आहे, ते आहे तसंच आहे. आजच्या युगात तिथे बदलली नाही ती तिथली संस्कॄती. अजूनही सण - समारंभ तसेच साजरे होतात, जत्रेतही तीच मजा आहे. कोजागिरी जोरात साजरी होते,समाराधना सुद्धा केली जाते.


अर्बनायझेशनच्या रेटयात माझ्या गावाने, गावपण तसंच टिकवून ठेवलं आहे. विकासाची कास धरली असली तरी, मुळं आहेत त्याहून घट्ट आहेत.म्हणून विचार केला, निदान लिहून तर काढू शकतो सगळं. जगाच्या पाठीवर जिथे जाईन तिथे घेऊन जाईन माझे गाव, माझे लहानपण आणि माझी जडणघडण!!