November 18, 2008

बंदपीठाचा धसका

पुण्यनगरीतील शनिवारवाड्याच्या आसपासचं एक मराठी वृत्तपत्र बरयापैकी उपक्रमशील आहे. अनेक उपक्रम चालवतात, रोज वेगळी पुरवणी काढतात.अशीच त्यांची एक साप्ताहिक पुरवणी “बंदपीठ”. ह्यात आपले अनुभव लिहून पाठवतात वाचक. गेले पाच सहा महिने बंदपीठात तर थैमान चालू आहे. समाजातील चांगले दाखवून देणारा एखादा तुरळक लेख सोडला तर बाकीचे तर वाचवत नाहीत.

एकेका लेखांचे विषय तर पहा.

कॅन्सर झाल्यावर केमोथेरपी घेताना, प्रत्येक केमोनंतर किती केस गळून पडले?
दिवाळीला फिरायला बाहेर गेलो तेव्हा दोन ट्रकांच्या मध्ये सापडून आपल्या मोटारीचा चेंदामेंदा कसा झाला?
कोणत्या नातेवाइकांचे कोणकोणते अवयव निकामी झाले?
किती तास किती मिनिटे अपघात स्थळी पोलिस कसे फिरकले नाहीत?
मॄताच्या शरीराचे देहदान करताना काय काय होते?
चोर बाइकवरुनधडक मारुन कसा पर्स पळवून गेला?
असे सगळे मन विषण्ण करणारे लेख.

आणि गंमत अशी वाटते की चांगले अनुभव देणारे वाचकच नाहीत की चांगले अनुभव ह्या जगात कुणाला येत नाहीत?

पंचाहत्तरीतले आजोबा देखील मी नोकरी धुळ्याला चालू केली तेव्हा म्हणून सुरुवात करतात आणि लिहितात काय तर त्यावेळी नोकरीवर रुजू झाल्यावर स्थानिक लोकांनी कसा त्रास दिला?
मागचे अनेक महिने तर कॅन्सर, केमोथेरपी, देहदान, मृतदेहाची विटंबना , स्पॉन्डिलाइटीस , सांधेदुखी, अपघात,इत्यादी वाचून तर बंदपीठ उघडायच नाही , बंदच ठेवायचं असं ठरवलं होतं.

हल्ली दोन महिने जरा बरे अनुभव छापून येउ लागले. मला वाटलं की आहे बुवा कुणी चांगले अनुभव येणारं जगात शिल्लक तर सध्या पुन्हा ये रेमाझ्या मागल्या. पुन्हा अपघात, हार्टएटॅक, पॅरालिसिस, वेगात ठोकरणे,सांधेदुखी सुरु.

आता तर पुण्यातील वैद्यकिय महाविदयालयात ऍनोटोमी च्या पुस्तकांएवजी “बंदपीठ” अभ्यासाला लावणार असे एकले आहे.कारण प्रत्येकाचे अनुभव, इस्पितळातील रसभरीत वर्णने, आजारांची नवनवीन नावे, शरीराच्या विविध अवयवांची आणि नीला- धमन्यांची शास्त्रीय नावे, अस्थिभंगाचे अनेक प्रकार हे सगळं फ्रेश, ताजं दर आठवड्याला दोन रुपयात मिळतं , मग कशाला ती ऍनोटोमीची जाडजूड पुस्तकं वाचा बुवा? ह्या बंदपीठाने लोकांना एवढं शिक्षीत केलंय की, हल्ली डॉक्टर लोक उपचार करायला घाबरु लागले. रुग्णाचे नातेवाइक बरोबर बंदपीठाचा ताजा अंक आणतात सोबत. त्याबरहुकुम उपचार होतायत ना हे बघायला.

चार महिन्यांपूर्वी तर कहर झाला. तेव्हा बंदपीठात देहदानाची चर्चा भलतीच रंगली होती. एका सुपुत्राने बंदपीठाच्या कार्यालयात फोन केला, देहदानाची सोय कुठे आहे? आमचे पिताश्री आता काही तासांचे सोबती आहेत. झालं त्याच्या पुढच्या बंदपीठात “ बंदपीठ इफेक्ट- असेही एक देहदान” असा लेख संपादकांनीच दिला छापून.

जागतिक चोर पाकिटमार भुरटे महासंघ देखील प्रात्यक्षिकासोबत बंदपीठ अभ्यासक्रमाला लावतो. त्यांच्या धंदयाचे विविध प्रकार एकाच जागी वाचायला मिळतात ना. मराठीतून प्रकाशित होणारं एकतरी नियतकालिक आहे का सांगा बघू जागतिक अभ्यासक्रमाला?

रोजचं वर्तमानपत्र तर चोरी, बलात्कार, खून, मारामारी, दंगल, बॉम्बस्फोट, अपघात ह्या सगळ्याने भरलेलं असतंच हो. चॅनेलवाले तर २४ X ७ दाखवायचं तरी काय म्हणून एखादी काचा फुटलेली टॅक्सी भाड्यावर घेउन तीच ठिकठिकाणी फिरवून, तिचे निरनिराळ्या एंगल्स मधून शूटींग करतात आणि अलम शहरातल्या टॅक्स्या फुटल्याच्या बातम्या देतात पसरवून, किंवा पावसात गेला बाजार एखादा नाला तुंबला की राहिले त्याच्या समोर उभे मग आलाच पूर शहरात.

त्याच्यापेक्षा प्रिंट मेडिआ बरा . पण तिथे पण हल्ली अशी विकतची फ्रस्ट्रेशन्स मिळतात. ती पण एकदम कन्साइज, क्रिस्प, खमंग आणि चुरचुरीत.

मी म्हणतो आजकाल ह्या धकाधकीच्या जीवनात आधीच ताण- तणाव फार, गाडी चालवताना ट्रॅफिकचा त्रास, हापिसात गेलो तिथे तणाव, घरी आलो सोसायटीच्या कटकटी, मग सकाळी पेपर वाचताना तरी आनंदी रहा की. पण कसचं काय राव, बंदपीठ हातात घेतलं की हात लागतो कापायला. आनंदी विचार मग कुठच्या कुठे पळून जातात. चोरट्याने धक्का मारुन दगडावर आपटलेल्या वृद्धेच्या जागी आपली आई दिसू लागते, दोन ट्रकांमध्येचेपल्या गेलेल्या कारच्या जागी आपल्या कारचे भास होतात, व्हॅनवाल्याने अपहॄत केलेल्या शाळकरी मुलीची जागा मनातल्या मनात आपली मुलगी घेते. अजून थोडी धक धक वाढते.

मॄत्यू हा माणसाच्या जीवनाला सुंदर बनवतो. पण तो किती भयप्रद अवस्थेत येउ शकतो त्याचे वर्णन करणारे अनेक पुठ्ठा बांधणीचे ग्रंथ भरतील इतके लेख ह्या बंदपीठात आले असतील आजपर्यन्त. वाइट अनुभव नसतातच असं नाही म्हणायच मला. कधी न कधी ते येणारच त्याच्यासाठी तयार असायला हव हे मान्य. त्यातून गेलेल्यांप्रति मी सहॄदय आहे. असे प्रसंग कुणावर येउ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.

पण जगात चांगुलपणादेखील आहे की शिल्लक, तो येउ द्या की भाउ समोर. जरा हुरुप वाढेल असं काहीतरी छापा ना जरा. सकाळी पेपर उघडला की समोर डोक्यातून भळभळ रक्त वाहणारी आज्जी, नाहितर पाय वर टांगून हॉस्पिटलात पडलेले आजोबा. कशी होइल बरं दिवसाची सुरुवात? आणि प्रत्येक आठवड्याला हे सगळं एकत्र छापून देणारे ते “बंदपीठ”

मी तर म्हणतो की Happy people find happy experiences, मग अश्या अनुभवांना पण येउ दया की समोर.चांगले- वाइट अनुभ येणारच की प्रत्येकाला कारण तुम्ही जगाकडे ज्या दॄष्टीतून बघता, जग तुमच्याकडे त्याच दॄष्टीतून बघते.
माणूस जगतो कश्यासाठी? त्याची जगण्याची प्रेरणा काय असते? दु:ख की सुखाची आशा? त्याचे प्रयत्न कश्यासाठी असतात? चांगल्यासाठी की वाईटासाठी? साधा विचार करा, प्रवासाला जाताना आपण आपली गाडी चुकेल असा विचार मनात आणतो का? मग अशी दु:खच समाजाच्यासमोर समोर आली तर त्याला जगायचा हुरुप कुठुन येणार?

इथे अनुभव लिहिल्याने दु:खितांची दु:खे नाहिशी होणार आहेत का? थोडा दिलासा मिळेल, दोन चार फोन येतील. पण आपला लढा आपल्यालाच लढायचा असतो, तिथे कोणी मदत नाही करत. माझ्या तरी मते त्यांनी समाजातील चांगुलपणाचे अनुभव वाचले तर त्यांची इच्छाशक्ती वाढेल. जगण्यासाठी काही प्रेरणा मिळेल.

अर्धा पेला रिकामा असला तरी अर्धा भरलेला असतो हे कळू दया की समाजाला. एखादया अग्रगण्य वॄत्तपत्राने हे असले टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार बंद करुन समाजाचा हुरुप वाढवण्यासाठी प्रयत्न करायला नको ?

सुखी ताणरहित जीवनशैलीसाठी माझ्याकडे तरी एकच उपाय आहे.. "बंदपीठ" वाचायचं बंद करा.. मी ही तेच करतोय..

November 17, 2008

जुवळ-भाग -१

मी नववीत होतो तेव्हा पावसाळ्यात ट्रेक करायचा ठरवला. तेव्हा काही बाही पुस्तकं वगैरे वाचून, नॅट-जिओवर काही फिल्म्स बघून ट्रेकबद्दल एकदम आकर्षण निर्माण झालेलं.आम्ही सगळे मित्र तसे पावसात क्रिकेट खेळता येत नाही म्हणून डोंगरउतारावरुन घसरगुंडी खेळायचो. पावसाळ्यात उतार निसरडा झाला की खाली सरकत यायचं. त्यामुळे दर पावसाळ्यात घसरुन उतरुन एक चड्डी फाटली की तो खेळ बंद.
पण त्या वर्षी गावातल्या व्हाळातून* चालत ट्रेक करण्याचा घाट घातला. ते भाद्रपदातले दिवस होते. शाळेला गणपतीची सुट्टी नुकतीच लागली होती. ह्या दिवसात कोकणात पाउस जरा खळावतो* आणि थोडी ताप* पडते. त्यामुळे जनावरं* बिळातून बाहेर येतात. तापलेल्या खडकांवर, डांबरी सडकेवर पहूडून उष्णता मिळवत रहातात. त्यांच्या बिळांमध्ये तेव्हा पाणी गेलेलं असतं. मातीत ओलावा असतो. त्याचप्रमाणे हा त्यांचा मेटींग सिझन असतो.

आम्ही फार काही अवघड वाटेवरुन जाणार नव्हतो. आमच्या कॉलनीपासून मुंबइ- गोवा हायवे वर साधारण एक किलोमीटर अंतरावर तो व्हाळ ( त्याचं नाव अव्हेरयाचा व्हाळ) हायवेला छेदून जायचा. तिथे हायवेवर पूल आहे. तिथून खाली उतरुन अव्हेरयाच्या पात्रातून, तासभर नदीकडे चालत गेलो की डाव्या अंगाला वर व्हायचं. तिथून पुन्हा अर्धा तास चाललो की आमच्या कॉलनीच्या पाठीमागच्या गेटातून घरी. असा साधारण कार्यक्रम आम्ही आखला.

पाउस थोडासा थांबला असल्याने व्हाळात पाणी कमी असतं. पात्रातले शेवाळ धरलेले दगड आता वरती आलेले असतात. अव्हेरयाच्या व्हाळाचं पात्र चांगलं रुंद. त्याच्या प्रवाहाने घळइ निर्माण केली आहे. दोन्ही काठ चांगले उंच आहेत. त्याच्या प्रवाहाच्या वेगामुळे दगडांना वेगवेगळे आकार प्राप्त झाले आहेत.

आमचा एकंदरीत प्लान एकून शेवटी आम्ही तिघेच उरलो. आणि आता उद्याच जायचं ठरवलं.

त्यादिवशी घरातून साडेतीन- चारला निघालो. तसं वरती बघितलं तर आभाळ भरुन आलं नव्हतं पण संध्याकाळपर्यंन्त पाउस पडेल असं वातावरण होतं .

त्याप्रमाणे अव्हेरयावरच्या पुलाखाली उतरलो. जिथून उतरलो तिथे वरती डाव्या हाताला, गावात जे हिंदू लोक पुरुन(दफन) अंत्यविधी करतात त्यांचं स्मशान आहे. खाली उतरताना सहज वर बघितलं तर खड्डा खोदायला काही माणसं जमली होती. आधीच आम्ही घरी न सांगता हा बेत आखला होता. आता त्या मंडळींपैकी आपल्याला कोणी बघू नये असं एकमेकांत म्हणतोय न म्हणतोय तोपर्यन्त कानावर कुकारा* आलाच

“रे गजा, रे जातावायस खंय अव्हेरयात?” मित्राचं बाजारपेठेत दुकान होतं त्यामुळे त्याला ओळखणारे बरेच.
“ नाही, असंच जरा फिरायला.”
“ हो अवेरो फिरोची जागा हा की? फाटी फिरा बघू, नायत घराकडे सांगतो..”
“ नाही, जरा इथेच पुढे जातो, जास्त लांब नाही जात.”
“भीती हा हंय अव्हेरयात, मागल्या म्हैन्यातच गाडी उलाटली होती पुलावरसून, दोगे गेले हुते तुमी खाली उतारलात थंयच. ही काय आज भिक्याची आवस गेली, तिका घेवन इलो हाव्तं आमी..”
“ नाही तू काळजी नको करु, आम्ही सांगितलंय घरी, लगेच येतो परत.”

असं सांगून आम्ही त्यांना गुंगारा दिला आणी पुढे सुटलो. आधी कधीच आलो नव्हतो अव्हेरयात. साधारण तासाभरात आपण योग्य जागी पोचून मग वरती जाउ डावीकडे असा विचार होता. आम्ही उन्हाळ्यात आमच्या घराकडून करवंद काढायला येत असू तेव्हा अव्हेरयात उतरायचो. पण तेव्हा पाणी नसायचं पात्रात . त्यामुळे घरापासून अव्हेरा ही वाट सरावाची होती. हायवेवरचा पूल ते अव्हेरयाच्या पात्रातून चालत त्याजागेपर्यंत जाणे ही एक त्या वयानुरुप एक्साइटमेंट होती. ती जागा आली की वरती व्हायचं हे ठरलेलं. ती जागा पुलाकडून चालत आलो तर साधारण तासाभराने लागेल असा आमचा अंदाज होता.
अर्धा – पाउण तास झाला .आता वरती आभाळ भरुन येउ लागलं होतं, त्यात त्या स्मशानातल्या भाउने मनात भीती निर्माण करुन ठेवलेली. आम्ही तसे लहानच अजून. नववी- दहावीतले. आता आम्हालाही थोडीफार भीती वाटू लागली. पण आता आलोच आहोत तर पूर्ण करायचं म्हणून चालू लागलो. अजूनही आमच्या ठरलेल्या जागेचा पत्ता नव्हता.

शेवाळाने बुळबुळीत झालेल्या दगडावरुन सांभाळून चालावं लागतं होतं. एक- दोनदा तर आम्ही सरकून पड्लो देखील. पण एकदम थ्रील वाटत होतं आता बाकिच्या मित्रांना काय काय सांगायचं याच प्लानिंग सुरु झालं होतं. पण आता पाय दुखू लागले होते.
चांगल्या दीड तासांच्या पायपीटीनंतर एकदा आमची नेहमीची जागा दिसू लागली. म्हणजे आमचा अंदाज अगदीच काही चुकला नव्हता.

त्यामुळे आता डावीकडे चढून गेल्यावर अर्ध्या तास पायपीटीनंतर घरी पोचू शाश्वती होती. त्यामुळे आता एक भली थोरली धोंड * बघून त्यावर आम्ही तिघे पाय पासरुन बसलो. पाण्यात अर्धवट बुडालेल्या दगडांना मुळे* चिकटले होते. पाणी आवाज करत वाहत होतं. आम्ही पात्रात मध्यभागी बसून छान दॄष्य बघत होतो. आजूबाजूला माजलेल्या रानाचा, पावसाळी झुड्पांचा संमिश्र उग्र गंध वातावरणात पसरला होता.

आत्तापर्यन्त पायपीट करताना भुरंबुळे* काढले होतेच. त्या विस्तीर्ण धोंडीवर बसून आम्ही ते धुउन सोलून खाल्ले. थोडावेळ शांत बसून आता जाउया म्हणून उठलो तोच…

उजव्या हाताला वरती खस फस आवाज येत होता.. म्हणून धोंडीवरुन उतरुन व्हाळ ओलांडून पलीकडे गेलो. थोडी चढण चढून गेल्यावर पुढे जरा सपाटी होती. आणि चढण परत सुरु होत होती. त्या सपाटीवरुनच हा आवाज येत होता. कुणीतरी गवतात बेभान होउन लोळताना येइल तसा हा आवाज येत होता.

जाउया की नको वरती, काय असेल......?
चलबिचल होउन शेवटी वरती जाउन काय ते बघायचं ठरवलं. पहिली छोटीशी चढाई करुन वर गेलो. समोर बघतो तर काय, एक विलक्षण दॄश्य दिसत होतं. आम्ही देहभान हरपून बघतच उभे राहिलो. शेजारी कोणी उभं आहे ह्याची सुद्धा जाणिव झाली नाही. नजरबंदी झाल्यागत होउन गेलं.

त्या छोट्याश्या सपाटीवर दोन तीन बांबूची बेटं होती. दोन तीन वीत भर उंच गवत माजलं होतं. त्या गवतात एक नाग- नागीणीची जोडी आपल्या मीलनात हरवून गेली होती.

पिवळी जर्द , उमदी अशी ती दोन जनावरं* एकमेकांत अक्षरश: गुंतून गेली होती. गुरफटली होती. एकमेकाला विळखा घालून दोघंही खाली गवतावर आपटत होती. मध्येच विळखा न सोडवता गवतातून लोळत बांबूच्या बेटापर्यंत पोचत होती. तिथले काटे टोचले की पुन्हा गवताच्या मउ मुलायम शेजीवर येत होती.

त्यांच्याच गवतात लोळण्याचा आणी मधूनच हुंकारण्याचा, फुत्कारण्याचा आवाज आम्हाला खाली व्हाळात येत होता.
अत्यंत देखणी जनावरं होती ती. पिवळ्या अंगावरचं करडया, तपकिरी ठिपक्यांचं नक्षीकाम उठून दिसत होतं, मध्येच फणा फुलवल्यानंतर आकडा दिसत होता, लवलवत्या जिभल्यांनी एकमेकाला स्पर्श होत होते. मध्येच हुंकार टाकले जात होते.आपल्याच आनंदात मश्गुल झालेली ती दोघंही एकमेकांला विळखे घालून शेपटीवर उभी राहीली की आमच्या एवढी उंचीची होत होती. आणी हे सगळं बघायला आम्हांला धैर्य कुठुन आलं होतं न कळे?

तेव्हा नुकताच गावाकडे टीव्ही दिसू लागला होता. भली थोरली डिश बसवून दोन तीन वाहिन्या दिसायच्या. त्यात दूरदर्शन वर नॅट-जिओच्या अश्या काही वन्य जीवनावरच्या फिल्म्स दाखवत. ते कॅमेरामन महिनोनमहिने कॅमेरे रोखून रहात तेव्हा कुठे त्यांना पाहिजे ते चित्रीकरण करता येत असे. त्यांच्या चिकाटीचे तेव्हा कौतुक वाटत असे. पण आम्हाला आज असे काही डोळे दिपवून टाकणारे दॄश्य प्रत्यक्ष नैसर्गिक स्वरुपात बघायला मिळत होते.

जुवळ भाग-२

त्या दोघांचं तांडव चालूच होतं. आमच्या पासून काही फूट अंतरावर आम्ही ते सगळं बघत होतो. चांगली मनगटाएवढी जाड ती जनावरं कधी थोडी अलग होत होती. वरची चढण चढून जात होती. फिरुन खाली येउन एकमेकांना फणे पसरुन, समोरासमोर डोळाभर न्याहाळत होती आणी पुन्हा गुरफटून बिलगून जात होती. आपल्या फण्यांनी , जिभल्यांनी एकमेकाला स्पर्श करत होती.

तो सगळया परिसर त्यांच्या थैमानाच्या खुणा आपल्या अंगावर बाळगता झाला होता. गवत अस्ताव्यस्त झालं होतं. रानअळू जागोजागी मोडून पडलं होतं. बांबूच्या काटयांवर ती जोडी आपटून त्यांच्या अंगावर त्याच्या खुणा दिसत होत्या. पण त्या दोघांना त्याचं कसलंही भान उरलं नव्हतं.

आम्ही तिघेही नि:स्तब्ध, थिजल्यासारखे नजरबंद होउन ते अनोखं , दुर्मिळ दॄश्य बघत उभे राहिलो होतो.

हे सगळं बघून फारतर दहा मिनिटं झाली असतील, त्या दोघांनी एकमेकाला विळखे घालत आता पूर्ण उंची गाठली, शेपटीकडे ते दोघे आता एकत्र झाले. आपण आपले हात एकमेकाभोवती पिरगाळून दोन्ही तळहात थोडे बाजूला घेउन फुलवले तर जसं दिसेल तसे एकमेकाला विळखे मारुन त्यांनी आपले फणे एकमेकाच्या आजूबाजूला फुलवले….. ती उमदी जनावारं आता दोन,वेगवेगळी उरली नव्हती. परस्परांत रममाण असे त्यांचे अद्वैत झाले होते.

पुढच्या काही क्षणांत ती जोडी अलग झाली. त्यातील एक जनावर आता निपचीत श्रांत- क्लांत पसरलं होतं. दुसरं मात्र आमच्या रोखाने फणा काढून बघत होतं. आता इतक्या वेळाने भानावर येउन त्याला आमची चाहूल लागली होती.

खाडकन जाग यावी तसे आम्ही भानावर आलो. काय करावं ते सुचेना. वरती कसं जाणार. त्याने वाट तर अडवून धरलेली. शिवाय थोडं पुढे त्यांच्या पैकी एक जण पसरलं होतं. खाली व्हाळ. प्रवाहात उडी मारायला आवश्यक एवढं पाणी सुद्धा नव्हतं.

निर्णय घ्यायला फक्त काही क्षण होते आमच्या जवळ. बघितलं तर थोडा पुढे, व्हाळाचा प्रवाह जराश्या उंचीवरुन खाली पडत होता. तिथे एक कोंड* होती. उतारावरुन आडवं धावत जाउन त्या कोंडीत उडी मारणे हा एकच पर्याय होता.
दोघांनाही हाक देउन मी पुढे पळत गेलो , पाठचा पुढचा विचार न करता साधारण पाच- सहा फूट उंचीवरुन उडी टाकली थेट कोंडीत. माझ्या पाठोपाठ अजून दोन आवाज झाले.
आता संकट तरी टळलं होतं. जीवाच्या आकांताने उड्या मारल्या खरया, पण आमच्यापैकी कोणालाच पोहायला येत नव्हतं.

आमचं नशीब त्या दिवशी खरोखरच जोरावर होतं. कोंड फारशी खोल नव्हती. एकदा- दोनदा असहाय्यपणे त्या पाण्याबरोबर गोल गोल फिरुन आमचे पाय आता खाली टेकले. तोपर्यन्त बरच पाणी खाल्लं होतं. कसाबसा मी काठावर हात टेकून वरती आलो. पाठोपाठ दोघा मित्रांनाही वरती काढलं.

काठावर येउन धापा टाकत बसलो. दहा मिनिटामध्ये एवढं सगळं घडून गेलं होतं. एव्हाना ती खस-फस सुद्धा एकू येइनाशी झाली. आमच्या पायातल्या चपला आता कोंडीतल्या पाण्याबरोबर गोल फिरु लागल्या होत्या. दगड मारुन त्या काठाला लावल्या. काढून घेतल्या. कपडे तर ओले चिंब झाले होते.

नववी- दहावीच्या वयाच्या अवघड टप्प्यावर असताना असे काही बघायला मिळाल्यामुळे, किंवा एवढे चालल्याच्या श्रमांमुळे, की कोंडीत सापडून बाहेर आल्यामुळे, कोण जाणे कश्यामुळे, आम्हा तिघांचेही उर आता धपापू लागले. कपाळ,कान,गाल, गळा आणी छाती गरम झाली होती. ताप बघताना जसा हात लावून बघतो तसा हात लावला तर चटका बसण्याइतपत . तोंडाला कोरड पडली होती. कोणच कोणाशी बोलत नव्हतं. जणू एक अनामिक, विलक्षण गारुड पडलं होतं. डोळ्यासमोरुन ते दॄश्य हलत नव्हतं.. अजूनही आहे तसं आठवतं.

धोंडीवर थोडावेळ टेकलो. भारल्यागत होउन तसेच अबोलसे उठलो. पुढे चालून आमच्या खुणेच्या जागेवर आलो. तिथून वरती होउन अर्धा तास वाट तुडवली की घरी.

एवढ्या कालावधीत आता अंधारुन यायला सुरुवात झाली. आकाश भरुन येउ लागलं. थोड्याच वेळात पाउस सुरु झाला.तसेच भिजत भिजत घराकडे चालताना कधीतरी पाउस संपला. हळूहळू आम्ही भानावर येउन एकमेकांशी बोलू लागलो. आता अंग हळूहळू नेहमीसारखं होउ लागलं. भर पावसातही जाणवणारा चटका आता जाणवेनासा झाला होता.

आता घरी जाउन पावसात भिजायला झाल्याचं सांगून जमणार होतं.

शाळेत स्त्रीकेसर, पुंकेसर, पुनरुत्पादन संस्था वगैरे फक्त पुस्तकात वाचायला शिकायला मिळत होतं. पण हे असं काही प्रत्यक्ष बघितल्यामुळे, ते अजून डोळयासमोरुन हलत नव्हतं. ते ही इतकी उमदी , देखणी जनावरं बघायला मिळणे हा अजून एक योग.

घरी जाउन गरम पाण्याने आंघोळ केली. देवासमोर दिवा लागला होता. रामरक्षा म्हटली तेव्हा कुठे जरा चित्त ताळ्यावर आलं.

गेल्यावर्षी एका मित्राबरोबर बोलताना त्याला हा प्रसंग सांगितला. तो नाथपंथी. बैरागी. त्याच्याकडून समजलं की आम्ही जे काही बघितलं ते फार कमी जणांना प्रत्यक्ष बघायला मिळतं. असे बघणारे फार भाग्यवान असतात असं त्यांच्या समाजात प्रचलित आहे. भाग्योदय होइल तेव्हा होइल. पण हा विलक्षण अनुभव मात्र तसाच साठवलेला राहिल.

हा अनुभव शब्दबद्ध करताना कोकणी बोलीभाषेतील अनेक शब्द वापरणे आवश्यक झाले. त्यांचा अर्थ तिथेच कंसात दिला असता तर अडथळल्यासारखं वाटलं असतं म्हणून त्या शब्दांना * असे चिन्ह टाकून त्यांचा अर्थ खाली देत आहे.

व्हाळ : रुंद, मोठा ओढा
खळावतो: पाउस थोडे दिवस थांबतो.
ताप पडणे: उन पडणे.
कुकारा : खच्चून, लांबवर एकू जाइल अशी मारलेली हाळी.
धोंड : प्रवाहाच्या पात्रातील विस्तीर्ण, काळे पाषाण.
कोंड : प्रवाहाची धार एकत्र, थोड्या उंचीवरुन पडून खड्ड्यासारखा भाग तयार होतो. तिथे पाणी
गोल फिरते. थोडावेळाने ठरावीक उंचीपर्यन्त आले की पुढे सरकते. प्रवाहात भोवरा बनतो
जनावर : नाग असा थेट उल्लेख कोकणात करत नाहित. त्याएवजी जनावर असा शब्द
भुरंबुळे : हे कंद कोकणात,पावसाळ्यात मिळतात.ओल्या मातीत थोडंसं खोदल्यावर सापडतात. पण जपून नीट पाने जोखून काढावे लागतात, कारण तश्याच पानांची अजून एक वनस्पती असते, तिचे कंद खाल्ल्यास तोंडाला खाज येते.
मुळे : शंखात मांसल भाग असलेला माशाचा प्रकार. त्याचं सार करतात पावसाच्या दिवसात.पावसात भिजून सर्दी झाली की मुळ्यांचं मसालेदार सार हा अक्सीर इलाज.
जुवळ : नाग- सापाच्या मीलनासाठी कोकणी बोलीभाषेतला प्रतिशब्द

November 14, 2008

धन्यवाद

आज मी ब्लॉग लिहायला सुरुवात करुन तीन आठवडे झाले. पण आजचा दिवस माझ्यासाठी विशेष आनंदाचा आहे.


मी ब्लॉग लेखनाला तशी बरीच उशीरा सुरुवात केली. मराठीत हजारो ब्लॉग आहेत. लाखो वाचक असणारे ब्लॉग आहेत. अतिशय सरस , सकस साहित्य ब्लॉगवर वाचायला मिळतं.ह्यात मी कुठेच नाही ह्याची मला कल्पना आहे. तरी पण एक प्रयत्न करुन बघू म्हणून मी ब्लॉग लेखन सुरु केलं. मी दोन प्रकारचे गणक( हिट काउंटर) लावले . एक फक्त हिट्स मोजतो, ते म्हणजे भेट देणारे लोक. दुसरा गणक हया ब्लॉगावर पुन्हा- पुन्हा येणारे( रिटर्नींग) तसेच यूनिक वाचक मोजतो. हे वाचक ठरवण्याचे निकष अत्यंत कडक आहेत. ते तुम्हाला
इथे वाचायला मिळू शकतील ह्यांनी काही ना काही वाचन केलेले असते.

तर ही वाचक संख्या आता १००० चा आकडा ओलांडून गेली आहे.एवढया कमी कालावधीत माझ्या ब्लॉगला भेट देणारयांची संख्या १६०० पार करुन गेली. त्यापैकी १००० जणांनी कोणता न कोणता लेख वाचला.

मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा इतक्या लवकर वाचकांचा आकडा १००० पार होइल असं वाटलं नव्हतं. मुदलात आपलं लेखन कितपत आवडेल असा प्रश्न होता.

पण तुम्ही मला सांभाळून घेतलं, माझा हुरुप वाढवणारया प्रतिक्रिया दिल्या, आपल्याला जे आवडलं नाही ते ही सांगितलं. आपल्या स्नेहामुळे हे शक्य झालं.

आपल्या सर्वांचे आभार किती आणी कोणत्या शब्दांत मानू ते मला कळत नाहीसं झालं आहे. य़ापुढेही मी माझ्या परीने चांगले लेखन देण्याचा प्रयत्न करीत राहिन. माझ्यावर असाच लोभ ठेवा. माझा ब्लॉग वाचत रहा. मला माझ्या चुका दाखवत रहा.

धन्यवाद
!!

November 13, 2008

एकलेचपणा

आता अमेरिकेत येउन दोन महिने झाले. घरी परत जायचा दिवस आता एक महिन्यावर आलाय. बरयाच वर्षानी घरापासून दूर राहिलो इतके दिवस. त्यामुळे साहजिकच आठवण येउ लागली आहे. माझा मुलगा अनुष्टुभ आता सहा महिन्यांचा झालाय. त्याच्या बाललीलांचे विडियो पहावे लागतात. अनुष्टुभची अनन्या ताई मला त्याची प्रगती सांगत असते.


असा थोडा भावनाविवश असतानाच, माझे स्नेही श्री.धोंडोपंत यांनी अभंग किंवा देवद्वार छंदाबद्द्ल मार्गदर्शन केले. चार ओळींचा हा छंद ६,६,६,४ असे शब्द प्रत्येक ओळीत आणि दुसरया / तिसरया ओळीचे यमक अश्या सोप्या शब्दांत धोंडोपंतांनी हा छंद समजावून सांगितला.


मग माझ्या मनाच्या त्या भावनाविवशतेत असताना मला ही एक ह्याच छंदातील कविता स्फुरली. मग घरी वडिलांना ऎकवून त्यात बरिचशी सुधारणा केली. ती कविता आज इथे देतोय.

एकलेंचपणा
संपेलच आतां
जाईन भारतां
माझ्या गावां

अमेरिका वारी
एकाकी जीवन
कसलें मरण
पैशापोटीं.

माझ्या लेखनाने
दिली मला साथ
करितोहो बात
मनासवें.

मित्रही लाभले
उत्तम अनेक
हिरा हा प्रत्येक
पारखिलां.

कपिलच्या मना
ओढ ही लागते
मायभूं दिसते
स्वप्नांमध्यें.

पिंजरा सोनेरी
टाळू येणे कसें
मन वेडेपिसें
करितोहां