Showing posts with label आठवणी दाटतात. Show all posts
Showing posts with label आठवणी दाटतात. Show all posts

November 17, 2008

जुवळ-भाग -१

मी नववीत होतो तेव्हा पावसाळ्यात ट्रेक करायचा ठरवला. तेव्हा काही बाही पुस्तकं वगैरे वाचून, नॅट-जिओवर काही फिल्म्स बघून ट्रेकबद्दल एकदम आकर्षण निर्माण झालेलं.आम्ही सगळे मित्र तसे पावसात क्रिकेट खेळता येत नाही म्हणून डोंगरउतारावरुन घसरगुंडी खेळायचो. पावसाळ्यात उतार निसरडा झाला की खाली सरकत यायचं. त्यामुळे दर पावसाळ्यात घसरुन उतरुन एक चड्डी फाटली की तो खेळ बंद.
पण त्या वर्षी गावातल्या व्हाळातून* चालत ट्रेक करण्याचा घाट घातला. ते भाद्रपदातले दिवस होते. शाळेला गणपतीची सुट्टी नुकतीच लागली होती. ह्या दिवसात कोकणात पाउस जरा खळावतो* आणि थोडी ताप* पडते. त्यामुळे जनावरं* बिळातून बाहेर येतात. तापलेल्या खडकांवर, डांबरी सडकेवर पहूडून उष्णता मिळवत रहातात. त्यांच्या बिळांमध्ये तेव्हा पाणी गेलेलं असतं. मातीत ओलावा असतो. त्याचप्रमाणे हा त्यांचा मेटींग सिझन असतो.

आम्ही फार काही अवघड वाटेवरुन जाणार नव्हतो. आमच्या कॉलनीपासून मुंबइ- गोवा हायवे वर साधारण एक किलोमीटर अंतरावर तो व्हाळ ( त्याचं नाव अव्हेरयाचा व्हाळ) हायवेला छेदून जायचा. तिथे हायवेवर पूल आहे. तिथून खाली उतरुन अव्हेरयाच्या पात्रातून, तासभर नदीकडे चालत गेलो की डाव्या अंगाला वर व्हायचं. तिथून पुन्हा अर्धा तास चाललो की आमच्या कॉलनीच्या पाठीमागच्या गेटातून घरी. असा साधारण कार्यक्रम आम्ही आखला.

पाउस थोडासा थांबला असल्याने व्हाळात पाणी कमी असतं. पात्रातले शेवाळ धरलेले दगड आता वरती आलेले असतात. अव्हेरयाच्या व्हाळाचं पात्र चांगलं रुंद. त्याच्या प्रवाहाने घळइ निर्माण केली आहे. दोन्ही काठ चांगले उंच आहेत. त्याच्या प्रवाहाच्या वेगामुळे दगडांना वेगवेगळे आकार प्राप्त झाले आहेत.

आमचा एकंदरीत प्लान एकून शेवटी आम्ही तिघेच उरलो. आणि आता उद्याच जायचं ठरवलं.

त्यादिवशी घरातून साडेतीन- चारला निघालो. तसं वरती बघितलं तर आभाळ भरुन आलं नव्हतं पण संध्याकाळपर्यंन्त पाउस पडेल असं वातावरण होतं .

त्याप्रमाणे अव्हेरयावरच्या पुलाखाली उतरलो. जिथून उतरलो तिथे वरती डाव्या हाताला, गावात जे हिंदू लोक पुरुन(दफन) अंत्यविधी करतात त्यांचं स्मशान आहे. खाली उतरताना सहज वर बघितलं तर खड्डा खोदायला काही माणसं जमली होती. आधीच आम्ही घरी न सांगता हा बेत आखला होता. आता त्या मंडळींपैकी आपल्याला कोणी बघू नये असं एकमेकांत म्हणतोय न म्हणतोय तोपर्यन्त कानावर कुकारा* आलाच

“रे गजा, रे जातावायस खंय अव्हेरयात?” मित्राचं बाजारपेठेत दुकान होतं त्यामुळे त्याला ओळखणारे बरेच.
“ नाही, असंच जरा फिरायला.”
“ हो अवेरो फिरोची जागा हा की? फाटी फिरा बघू, नायत घराकडे सांगतो..”
“ नाही, जरा इथेच पुढे जातो, जास्त लांब नाही जात.”
“भीती हा हंय अव्हेरयात, मागल्या म्हैन्यातच गाडी उलाटली होती पुलावरसून, दोगे गेले हुते तुमी खाली उतारलात थंयच. ही काय आज भिक्याची आवस गेली, तिका घेवन इलो हाव्तं आमी..”
“ नाही तू काळजी नको करु, आम्ही सांगितलंय घरी, लगेच येतो परत.”

असं सांगून आम्ही त्यांना गुंगारा दिला आणी पुढे सुटलो. आधी कधीच आलो नव्हतो अव्हेरयात. साधारण तासाभरात आपण योग्य जागी पोचून मग वरती जाउ डावीकडे असा विचार होता. आम्ही उन्हाळ्यात आमच्या घराकडून करवंद काढायला येत असू तेव्हा अव्हेरयात उतरायचो. पण तेव्हा पाणी नसायचं पात्रात . त्यामुळे घरापासून अव्हेरा ही वाट सरावाची होती. हायवेवरचा पूल ते अव्हेरयाच्या पात्रातून चालत त्याजागेपर्यंत जाणे ही एक त्या वयानुरुप एक्साइटमेंट होती. ती जागा आली की वरती व्हायचं हे ठरलेलं. ती जागा पुलाकडून चालत आलो तर साधारण तासाभराने लागेल असा आमचा अंदाज होता.
अर्धा – पाउण तास झाला .आता वरती आभाळ भरुन येउ लागलं होतं, त्यात त्या स्मशानातल्या भाउने मनात भीती निर्माण करुन ठेवलेली. आम्ही तसे लहानच अजून. नववी- दहावीतले. आता आम्हालाही थोडीफार भीती वाटू लागली. पण आता आलोच आहोत तर पूर्ण करायचं म्हणून चालू लागलो. अजूनही आमच्या ठरलेल्या जागेचा पत्ता नव्हता.

शेवाळाने बुळबुळीत झालेल्या दगडावरुन सांभाळून चालावं लागतं होतं. एक- दोनदा तर आम्ही सरकून पड्लो देखील. पण एकदम थ्रील वाटत होतं आता बाकिच्या मित्रांना काय काय सांगायचं याच प्लानिंग सुरु झालं होतं. पण आता पाय दुखू लागले होते.
चांगल्या दीड तासांच्या पायपीटीनंतर एकदा आमची नेहमीची जागा दिसू लागली. म्हणजे आमचा अंदाज अगदीच काही चुकला नव्हता.

त्यामुळे आता डावीकडे चढून गेल्यावर अर्ध्या तास पायपीटीनंतर घरी पोचू शाश्वती होती. त्यामुळे आता एक भली थोरली धोंड * बघून त्यावर आम्ही तिघे पाय पासरुन बसलो. पाण्यात अर्धवट बुडालेल्या दगडांना मुळे* चिकटले होते. पाणी आवाज करत वाहत होतं. आम्ही पात्रात मध्यभागी बसून छान दॄष्य बघत होतो. आजूबाजूला माजलेल्या रानाचा, पावसाळी झुड्पांचा संमिश्र उग्र गंध वातावरणात पसरला होता.

आत्तापर्यन्त पायपीट करताना भुरंबुळे* काढले होतेच. त्या विस्तीर्ण धोंडीवर बसून आम्ही ते धुउन सोलून खाल्ले. थोडावेळ शांत बसून आता जाउया म्हणून उठलो तोच…

उजव्या हाताला वरती खस फस आवाज येत होता.. म्हणून धोंडीवरुन उतरुन व्हाळ ओलांडून पलीकडे गेलो. थोडी चढण चढून गेल्यावर पुढे जरा सपाटी होती. आणि चढण परत सुरु होत होती. त्या सपाटीवरुनच हा आवाज येत होता. कुणीतरी गवतात बेभान होउन लोळताना येइल तसा हा आवाज येत होता.

जाउया की नको वरती, काय असेल......?
चलबिचल होउन शेवटी वरती जाउन काय ते बघायचं ठरवलं. पहिली छोटीशी चढाई करुन वर गेलो. समोर बघतो तर काय, एक विलक्षण दॄश्य दिसत होतं. आम्ही देहभान हरपून बघतच उभे राहिलो. शेजारी कोणी उभं आहे ह्याची सुद्धा जाणिव झाली नाही. नजरबंदी झाल्यागत होउन गेलं.

त्या छोट्याश्या सपाटीवर दोन तीन बांबूची बेटं होती. दोन तीन वीत भर उंच गवत माजलं होतं. त्या गवतात एक नाग- नागीणीची जोडी आपल्या मीलनात हरवून गेली होती.

पिवळी जर्द , उमदी अशी ती दोन जनावरं* एकमेकांत अक्षरश: गुंतून गेली होती. गुरफटली होती. एकमेकाला विळखा घालून दोघंही खाली गवतावर आपटत होती. मध्येच विळखा न सोडवता गवतातून लोळत बांबूच्या बेटापर्यंत पोचत होती. तिथले काटे टोचले की पुन्हा गवताच्या मउ मुलायम शेजीवर येत होती.

त्यांच्याच गवतात लोळण्याचा आणी मधूनच हुंकारण्याचा, फुत्कारण्याचा आवाज आम्हाला खाली व्हाळात येत होता.
अत्यंत देखणी जनावरं होती ती. पिवळ्या अंगावरचं करडया, तपकिरी ठिपक्यांचं नक्षीकाम उठून दिसत होतं, मध्येच फणा फुलवल्यानंतर आकडा दिसत होता, लवलवत्या जिभल्यांनी एकमेकाला स्पर्श होत होते. मध्येच हुंकार टाकले जात होते.आपल्याच आनंदात मश्गुल झालेली ती दोघंही एकमेकांला विळखे घालून शेपटीवर उभी राहीली की आमच्या एवढी उंचीची होत होती. आणी हे सगळं बघायला आम्हांला धैर्य कुठुन आलं होतं न कळे?

तेव्हा नुकताच गावाकडे टीव्ही दिसू लागला होता. भली थोरली डिश बसवून दोन तीन वाहिन्या दिसायच्या. त्यात दूरदर्शन वर नॅट-जिओच्या अश्या काही वन्य जीवनावरच्या फिल्म्स दाखवत. ते कॅमेरामन महिनोनमहिने कॅमेरे रोखून रहात तेव्हा कुठे त्यांना पाहिजे ते चित्रीकरण करता येत असे. त्यांच्या चिकाटीचे तेव्हा कौतुक वाटत असे. पण आम्हाला आज असे काही डोळे दिपवून टाकणारे दॄश्य प्रत्यक्ष नैसर्गिक स्वरुपात बघायला मिळत होते.

जुवळ भाग-२

त्या दोघांचं तांडव चालूच होतं. आमच्या पासून काही फूट अंतरावर आम्ही ते सगळं बघत होतो. चांगली मनगटाएवढी जाड ती जनावरं कधी थोडी अलग होत होती. वरची चढण चढून जात होती. फिरुन खाली येउन एकमेकांना फणे पसरुन, समोरासमोर डोळाभर न्याहाळत होती आणी पुन्हा गुरफटून बिलगून जात होती. आपल्या फण्यांनी , जिभल्यांनी एकमेकाला स्पर्श करत होती.

तो सगळया परिसर त्यांच्या थैमानाच्या खुणा आपल्या अंगावर बाळगता झाला होता. गवत अस्ताव्यस्त झालं होतं. रानअळू जागोजागी मोडून पडलं होतं. बांबूच्या काटयांवर ती जोडी आपटून त्यांच्या अंगावर त्याच्या खुणा दिसत होत्या. पण त्या दोघांना त्याचं कसलंही भान उरलं नव्हतं.

आम्ही तिघेही नि:स्तब्ध, थिजल्यासारखे नजरबंद होउन ते अनोखं , दुर्मिळ दॄश्य बघत उभे राहिलो होतो.

हे सगळं बघून फारतर दहा मिनिटं झाली असतील, त्या दोघांनी एकमेकाला विळखे घालत आता पूर्ण उंची गाठली, शेपटीकडे ते दोघे आता एकत्र झाले. आपण आपले हात एकमेकाभोवती पिरगाळून दोन्ही तळहात थोडे बाजूला घेउन फुलवले तर जसं दिसेल तसे एकमेकाला विळखे मारुन त्यांनी आपले फणे एकमेकाच्या आजूबाजूला फुलवले….. ती उमदी जनावारं आता दोन,वेगवेगळी उरली नव्हती. परस्परांत रममाण असे त्यांचे अद्वैत झाले होते.

पुढच्या काही क्षणांत ती जोडी अलग झाली. त्यातील एक जनावर आता निपचीत श्रांत- क्लांत पसरलं होतं. दुसरं मात्र आमच्या रोखाने फणा काढून बघत होतं. आता इतक्या वेळाने भानावर येउन त्याला आमची चाहूल लागली होती.

खाडकन जाग यावी तसे आम्ही भानावर आलो. काय करावं ते सुचेना. वरती कसं जाणार. त्याने वाट तर अडवून धरलेली. शिवाय थोडं पुढे त्यांच्या पैकी एक जण पसरलं होतं. खाली व्हाळ. प्रवाहात उडी मारायला आवश्यक एवढं पाणी सुद्धा नव्हतं.

निर्णय घ्यायला फक्त काही क्षण होते आमच्या जवळ. बघितलं तर थोडा पुढे, व्हाळाचा प्रवाह जराश्या उंचीवरुन खाली पडत होता. तिथे एक कोंड* होती. उतारावरुन आडवं धावत जाउन त्या कोंडीत उडी मारणे हा एकच पर्याय होता.
दोघांनाही हाक देउन मी पुढे पळत गेलो , पाठचा पुढचा विचार न करता साधारण पाच- सहा फूट उंचीवरुन उडी टाकली थेट कोंडीत. माझ्या पाठोपाठ अजून दोन आवाज झाले.
आता संकट तरी टळलं होतं. जीवाच्या आकांताने उड्या मारल्या खरया, पण आमच्यापैकी कोणालाच पोहायला येत नव्हतं.

आमचं नशीब त्या दिवशी खरोखरच जोरावर होतं. कोंड फारशी खोल नव्हती. एकदा- दोनदा असहाय्यपणे त्या पाण्याबरोबर गोल गोल फिरुन आमचे पाय आता खाली टेकले. तोपर्यन्त बरच पाणी खाल्लं होतं. कसाबसा मी काठावर हात टेकून वरती आलो. पाठोपाठ दोघा मित्रांनाही वरती काढलं.

काठावर येउन धापा टाकत बसलो. दहा मिनिटामध्ये एवढं सगळं घडून गेलं होतं. एव्हाना ती खस-फस सुद्धा एकू येइनाशी झाली. आमच्या पायातल्या चपला आता कोंडीतल्या पाण्याबरोबर गोल फिरु लागल्या होत्या. दगड मारुन त्या काठाला लावल्या. काढून घेतल्या. कपडे तर ओले चिंब झाले होते.

नववी- दहावीच्या वयाच्या अवघड टप्प्यावर असताना असे काही बघायला मिळाल्यामुळे, किंवा एवढे चालल्याच्या श्रमांमुळे, की कोंडीत सापडून बाहेर आल्यामुळे, कोण जाणे कश्यामुळे, आम्हा तिघांचेही उर आता धपापू लागले. कपाळ,कान,गाल, गळा आणी छाती गरम झाली होती. ताप बघताना जसा हात लावून बघतो तसा हात लावला तर चटका बसण्याइतपत . तोंडाला कोरड पडली होती. कोणच कोणाशी बोलत नव्हतं. जणू एक अनामिक, विलक्षण गारुड पडलं होतं. डोळ्यासमोरुन ते दॄश्य हलत नव्हतं.. अजूनही आहे तसं आठवतं.

धोंडीवर थोडावेळ टेकलो. भारल्यागत होउन तसेच अबोलसे उठलो. पुढे चालून आमच्या खुणेच्या जागेवर आलो. तिथून वरती होउन अर्धा तास वाट तुडवली की घरी.

एवढ्या कालावधीत आता अंधारुन यायला सुरुवात झाली. आकाश भरुन येउ लागलं. थोड्याच वेळात पाउस सुरु झाला.तसेच भिजत भिजत घराकडे चालताना कधीतरी पाउस संपला. हळूहळू आम्ही भानावर येउन एकमेकांशी बोलू लागलो. आता अंग हळूहळू नेहमीसारखं होउ लागलं. भर पावसातही जाणवणारा चटका आता जाणवेनासा झाला होता.

आता घरी जाउन पावसात भिजायला झाल्याचं सांगून जमणार होतं.

शाळेत स्त्रीकेसर, पुंकेसर, पुनरुत्पादन संस्था वगैरे फक्त पुस्तकात वाचायला शिकायला मिळत होतं. पण हे असं काही प्रत्यक्ष बघितल्यामुळे, ते अजून डोळयासमोरुन हलत नव्हतं. ते ही इतकी उमदी , देखणी जनावरं बघायला मिळणे हा अजून एक योग.

घरी जाउन गरम पाण्याने आंघोळ केली. देवासमोर दिवा लागला होता. रामरक्षा म्हटली तेव्हा कुठे जरा चित्त ताळ्यावर आलं.

गेल्यावर्षी एका मित्राबरोबर बोलताना त्याला हा प्रसंग सांगितला. तो नाथपंथी. बैरागी. त्याच्याकडून समजलं की आम्ही जे काही बघितलं ते फार कमी जणांना प्रत्यक्ष बघायला मिळतं. असे बघणारे फार भाग्यवान असतात असं त्यांच्या समाजात प्रचलित आहे. भाग्योदय होइल तेव्हा होइल. पण हा विलक्षण अनुभव मात्र तसाच साठवलेला राहिल.

हा अनुभव शब्दबद्ध करताना कोकणी बोलीभाषेतील अनेक शब्द वापरणे आवश्यक झाले. त्यांचा अर्थ तिथेच कंसात दिला असता तर अडथळल्यासारखं वाटलं असतं म्हणून त्या शब्दांना * असे चिन्ह टाकून त्यांचा अर्थ खाली देत आहे.

व्हाळ : रुंद, मोठा ओढा
खळावतो: पाउस थोडे दिवस थांबतो.
ताप पडणे: उन पडणे.
कुकारा : खच्चून, लांबवर एकू जाइल अशी मारलेली हाळी.
धोंड : प्रवाहाच्या पात्रातील विस्तीर्ण, काळे पाषाण.
कोंड : प्रवाहाची धार एकत्र, थोड्या उंचीवरुन पडून खड्ड्यासारखा भाग तयार होतो. तिथे पाणी
गोल फिरते. थोडावेळाने ठरावीक उंचीपर्यन्त आले की पुढे सरकते. प्रवाहात भोवरा बनतो
जनावर : नाग असा थेट उल्लेख कोकणात करत नाहित. त्याएवजी जनावर असा शब्द
भुरंबुळे : हे कंद कोकणात,पावसाळ्यात मिळतात.ओल्या मातीत थोडंसं खोदल्यावर सापडतात. पण जपून नीट पाने जोखून काढावे लागतात, कारण तश्याच पानांची अजून एक वनस्पती असते, तिचे कंद खाल्ल्यास तोंडाला खाज येते.
मुळे : शंखात मांसल भाग असलेला माशाचा प्रकार. त्याचं सार करतात पावसाच्या दिवसात.पावसात भिजून सर्दी झाली की मुळ्यांचं मसालेदार सार हा अक्सीर इलाज.
जुवळ : नाग- सापाच्या मीलनासाठी कोकणी बोलीभाषेतला प्रतिशब्द

November 1, 2008

लंच टाईम आणि डब्बा ग्रूप - भाग १

मी कामाला जाताना डबा न्यायला लागलो, त्याला आता १२ वर्षे होउन गेली. शाळा, कॉलेज घराजवळ होते , त्यामुळे, मधल्या सुट्टीत, घरी जेवायला येत होतो. नंतर इंजिनिअरींगला असताना, कॉलेज मेस आणि हॉस्टेल एकाच कॅम्पसमध्ये असल्यामुळे, तिथेही डब्याचा संबंध आला नाही.

पुण्याला,जॉब सुरु केल्यावर,डबा सुरु झाला. बॅचलर असताना, आमच्या कंपनीत एक डबेवाला यायचा. त्याचा डबा असायचा छान, पण अगदीच कमी पडायचा. त्याला आम्ही, "काय भोसले आज वाटाण्याच्या उसळीत फक्त २५ वाटाणे होते, तिसरया घासाला पोळी संपली” असं खुलेआम चिडवलं तरी त्याची क्वांटीटी काही वाढायची नाही. डब्याचे पैसे मात्र वेळेवर घ्यायला यायचा. पुढच्या आठवड्याचे ऍडव्हान्स द्याल? अशी ओशाळी विनंती सुद्धा तो करत असे. घोडयांच्या रेसचा त्याला भारी नाद. त्याची बायको पुढे पुढे पैसे जमा करायला लागली होती. पण त्याचा डबा बंद करुन लवकरच,मी आमच्या मेसच्या बीडकर काकूंकडून डबा घेउन जाण्यास सुरुवात केली. अगदी घरगुती पद्धतीच्या डब्यामुळे दुपारी जेवण्याची छान सोय झाली होती.

तेव्हा, माझ्या पहिल्याच जॉबमध्ये( म्हणजे ऍडॉर सामिया) लंच ब्रेकला डबा खाणे, म्हणजे एक माहोल असायचा. एका मोठया टेबलावर आम्ही दहा-पंधरा जण जमत असू. त्यामुळे विविध पद्धतीने केलेल्या भाज्या, उपलब्ध असत. फ़्रान्सिसला त्याने आणलेली अप्पम किंवा इडली मिळायची नाही आणि यादवभय्याला त्याच्या डब्यातील करेला.मिलिंद आणि आनंदच्या डब्यातील, साखरांबा-तूप बघून, आपल्या डब्यात कधी येणार असा विचार येउन जायचा. बरेच कलीग्स बॅचलर होते, त्यामुळे जसे दिवस जाउ लागले तसे डबा, बनवणारी व्यक्ती बदलत गेली. एखाद्याचं लग्न झाल्यावर, तो डबा कसा आणतो ह्याकडे सगळ्यांचं लक्ष असायचं. त्यामुळे बायकोच्या हातचा डबा आणि, आईच्या हातचा डबा ह्यातील फरक बरयाच जणांना समजू लागला. आपल्याला मिळणारा “नवीन” डबा, आता त्या “जुन्या” उंचीला कधी जाउन पोचणार , हा विचार त्या “ डबा-डिमोटेड” मित्रांच्या मनात येत असेल. पण मेस किंवा डबेवाल्याकडून , बायकोच्या हातचा डबा मिळू लागलेल्या नवविवाहितांसाठी मात्र ते “प्रमोशन” असायचं.

पण दिवसभराचं स्ट्रॆस घालवण्याचं ठिकाण ,म्हणजे लंच टाइम असे. जेवताना क्रिकेट, राजकारण, ऑफिस गॉसिप, लोकल घडामोडी, बॉलिवूड, असे नानाविध विषय जेवणाबरोबर तेवढ्याच चवीने चघळले जात. एखाद्याला एखाद्या दिवशी टार्गेट करुन, त्याची यथेच्छ खेचली जायची. तो अर्धा तास म्हणजे आमची रिचार्जींग बे होती. उरलेला वेळ काम करण्याची मानसिक क्षमता, तो अर्धा तास देउन जायचा.

ऍडॉर सामियामध्ये एक सेल्स इंजिनिअर होती. ती अगदी टीपीकल सेल्स इंजिनिअर होती. म्हणजे तिचे व्यक्तीमत्व जेव्हढे आकर्षक होते, त्याला साजेसा तिच्याकडे ड्रेसिंग सेन्स होता.त्यामुळे तिची प्रेझेंटेशन्स “बघणेबल” असायची. कंपनीचा सेल्स मॅनेजर तिच्याबरोबर सेल्सप्लॅन्स करत असायचा आणि ऑपरेशन्स मॅनेजरला सेल्सप्लॅन्स बरोबर एक्झेक्यूशन प्लॅन फाइन-ट्यून करण्यासाठी तिचीच गरज भासायची. आता डब्याच्या विषयात हे इतकं विस्ताराने सांगायचा उद्देश म्हणजे, ती रोज मला तिच्या डब्यात, न चुकता, काहीतरी स्वीट आणायचीच. ते मलाच देण्यासाठी, टेबलावर ती आधी आल्यास, ती माझ्यासाठी तिच्याशेजारची खुर्ची धरुन ठेवायची. मी आधी आलो तर, मी ही तसेच करत असे. पुढे-पुढे ही गोष्ट बाकी सगळ्यांच्या लक्षात आल्यावर, मोठया मनाने(!) कुणी माझ्या किंवा तिच्या शेजारी बसत नसे. पण लंच नंतर मात्र, अरे कपिल, तू एक तर गोरा घारा,चिकना चुपडा, तुला गोडधोड खायला घालून बकरयासारखा माजलास की, एखादया इदला हलाल करेल ती, सांभाळ बाबा! असा प्रेमळ सल्ला मिळत असे.

काही वर्षांनी, आमचा ऍडॉर सामियामधील डब्बा ग्रूप पंधरावरुन पाच वर आला , तेव्हा मी तो जॉब सोडून, थर्मॅक्स मध्ये गेलो. …..
क्रमश:

लंच टाईम आणि डब्बा ग्रूप- भाग २

तिथे मी नवीनच होतो. पण काम एव्हढे प्रचंड होते की, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करुन माझा असा नवीन डब्बा ग्रूप कधी बनला तेच समजलं नाही. थर्मॅक्स जॉइन केल्यावर मी सुरुवातीच्या दिवसांत बरेच, रिव्हॅम्प आणि ऑगमेंटेशनचे प्रोजेक्टस केले. माझी जबाबदारी डिझाइन- इंजिनिअरिंगची असल्यामुळे, मी खूपवेळा साइट्सवर जात असे. ज्यात सुधारणा करायची आहे, ते बघितल्याशिवाय त्याचा अंदाज येत नसे. साइट्सवर जाउन जाउन, आमच्या कमिशनींग आणि कन्स्ट्र्कशन इंजिनिअरांशी माझे चांगले संबंध प्रस्थापित झाले. त्यांचा फिडबॅक आणि सूचना, रिव्हॅम्प आणि ऑगमेंटेशन जॉबच्या डिझाइनमध्ये मला यश देउन जायच्या. त्यात मलाही शिकायला भरपूर मिळायचं, पण अश्या ह्या अनोख्या दोस्तान्यामुळे, हे कमिशनींग आणि कन्स्ट्र्कशन इंजिनिअर्स ऑफिसमध्ये आले की, माझ्याबरोबरच डबा खात. दिवसेंदिवस साइटवर पडीक राहिल्यामुळे घरचा डबा खायचं समाधान त्यांना फार कमी दिवस मिळायचं, एक साइट संपली, की दुसरी वाटच बघत असे. घरच्या डब्याचं ते समाधान त्यांच्या चेहरयावर दिसायचं. मी, बाबर, गिरीश, भोइटे, मनोज आणि श्रीवास्तव असा आमचा तो डबा ग्रूप होता. ह्यातील कोणीना कोणी माझ्याबरोबर नक्की असे. फार क्वचीत एकटयाला जेवायला लागायचं.

थर्मॅक्स मध्येही लंच टाइम म्हणजे स्ट्रेस रिलीवींग टाइम असायचा. विविध विषयांवर चर्चा होत असे. तिथे असताना बाबरच्या डब्यातील भाजी खाल्ली की मला थेट आठवण यायची ती, मी लहान असताना, शेजारच्या गुरुप्रसादगोळांकडे खाल्लेल्या भाजीची. मूळच्या कराडच्या बाबर आणि गुरुप्रसादगोळांकडे मसाला सुद्धा एकाच पद्धतीचा कसा काय ह्याचं आश्चर्य वाटायचं. भोइटेंच्या डब्यातील साखरेच्या पाकातील रताळ्याचे काप, श्रीवास्तवकडचे “मूली और गज्जर का सलाड” अजूनही आठवतात. श्रीवास्तवकडचे जेवण जरा तिखट असायचे. त्याबद्दल विचारल्यावर, श्रीवास्तव “उसमे तेजपत्ता, धनिया और बहोत सारे मसाले डलते है भई” असे खास त्याच्या लखनवी अंदाजमध्ये सांगायचा. थर्मॅक्स मध्ये जायच्या आधीपासून माझा डबा, मेस ते बायकोच्या हातचा असा प्रमोट झाला होता. माझ्या डब्यातील रोजच्या तूप-साखरेवर किंवा आटीव आमरसावर मात्र सगळ्यांचा डोळा असायचा.

लंच झाल्यानंतर, मी माझ्या टीममध्ये काम करणारया, माझ्या ड्राफ्ट्समन मित्रांबरोबर टपरीवर जात असे. तिथे उन्हाळ्यात फ़्रूट डिश, ताक किंवा लस्सी पिण्याचा कार्यक्रम पार पडायचा. हिवाळ्यात मला हटकून सर्दी झाली की, शेख आणि जाधव मला एखादी गुडंग गरम ओढायचा आग्रह करत. त्याने ही सर्दी गेली नाही, तर मात्र एक डोळा बारीक करत, एक हात दुसरया हाताच्या तळव्याला लावून, आता “ह्याच्या” शिवाय पर्याय नाही असं ते मला सांगायचे.

जरी मी त्यांचा टीम लीड होतो तरी त्यांच्याबरोबर लंच टाईममध्ये मिसळल्यामुळे त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. त्यांच्याशी ह्याआधी एवढं मिसळून कोणी वागलंच नव्हतं, मी त्यांच्यापेक्षा अनुभव आणि वयाने लहान होतो त्यामुळे सुरुवातीला "अशा साहेबाला" सामावून घेणं त्यांना कठीण जात असे. पण काही दिवसातच आमची छान गट्टी जमली. त्या लंचटाईम टपरी मिटींगमधून एक खरंखुरं टीम बिल्डींग कोणतंही विशेष ट्रेनींग न घेता आम्ही सगळे नकळत करत होतो. कामातही मला ते उत्तम सहकार्य देउ लागले.माझ्या टीमच्या कमीटमेंट्स नेहमी पाळल्या जाउ लागल्या.त्या आगळया टीम-स्पिरीट (!) मुळे रिव्हॅम्प आणि ऑगमेंटेशनचे डिझाइन सोडा, ग्रीन फिल्ड जॉब्सही यशस्वी पणे पार पडू लागले. बॉसने एका ऍप्रायझलमध्ये ह्या गोष्टीचा उल्लेखही केला.

नंतर नंतर, मी, सुहास नातू ,सुहास जोगळेकर, सोमवंशी, कल्लू कलावडे, प्रफुल्ल आणि निलेश असा डबा खाल्ल्यानंतरचा टपरीग्रूप स्थापन झाला होता. हया आमच्या ग्रूपमध्ये कंपनीतील सगळ्या डिपार्टमेंट्सधील एक एक जण असल्यामुळे, कुठे काय चालू आहे आणि हवा कुठच्या दिशेने वाहत आहे, ह्याची डिटेल्ड माहिती तिथे मिळायची. त्यामुळे नंतर होणारया रिव्ह्यू मिटींगची स्ट्रॅटेजी ठरवायला, तिथले इनपुट्स मदत करत!! आमच्या ह्या टपरीवरच्या इलाइट ग्रूपची मेंबरशीप, सहसा कुणाला मिळायची नाही. इथेच सुहास जोगळेकरांचे गुंतवणूक आणी शेअर बाजाराचे मौलिक मार्गदर्शन होत असे. जवळच असणारया कॉल सेंटरची शिफ्ट दिड वाजता संपून "ती क्राउड" इंडिका किंवा सुमो स्वार ( की प्रविष्ट) होऊ लागली की आमचा लंच टाइम संपायचा ही मात्र थोडी दु:खदायक बाब असे.

थर्मॅक्समधल्या त्या दिवसांमध्ये डबा ग्रूप आणि टपरी ग्रूप हे दोन असे अविभाज्य घटक होते.


थर्मॅक्स सोडून एमड्ब्ल्यूएच ह्या एम.एन.सी मध्ये जॉइन केल्यावर मात्र, लंच रूम मधले वातावरण अगदी एम.एन.सी सारखे धीरगंभीर असायचे. मग आम्ही(म्हणजे मी आणि इतर काही मित्र) त्याला, भारतीय रंग देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पिझ्झा, बर्गर सारखे जंक फ़ूड तिथे मिळत असल्यामुळे, ३-४ किलो वजन वाढल्यावर , ते अजूनही खात नाही.

तिथूनही सोडून आता ट्रान्सटेक मध्ये गेलो. पण तिथे डबा खायचा प्रसंग अजूनही आला नाही. कारण जॉइन करुन सरळ इथे अमेरिकेतच आलो. भारतात परत गेल्यावर डब्याची मजा परत ह्या नवीन कंपनीत तशीच असेल ना असा विचार मनात येतो.

इथे लंच एकत्र बसून धमाल वगैरे कन्सेप्ट नाही. एखादा फूट लॉंन्ग सब (फूटभर तरी पाहिजेच हो त्यांना!), टयूना/सालमॉन सलाड किंवा गेलाबाजार हॅम असलं की झालं लंच.त्याच्याबरोबर ग्लासात आइसक्युब्ज आणि आइसक्युब्जांमधल्या पोकळयांमध्ये कोक! हापिसातच मागवायचं. क्युबीकलमध्ये एकटयानेच संपवायचं. किंवा चेंज म्हणून रेस्टारंटात जायचं.

डबा असा खाल्ला तर पचायचा नाही आपल्याला बुवा.घर आणि ऑफिस जवळच आहे. त्यामुळे मी लंचला घरी येतो. घरी एकटयाने, लंच करताना मात्र, इतकी वर्षे केलेली डबा खातान्ची धमाल आठवते, आणि हळवं करुन सोडते.

October 22, 2008

माझा गाव आणि माझे लहानपण-भाग-१

मुंबई- गोवा हायवेशेजारी वसलेलं माझं गाव- खारेपाटण(Kharepatan). रत्नागिरी- सिंधुदुर्गजिल्ह्यांच्या सीमे वर वसलेलं. हायवे वरून पाहीलं तर गाव खाली रहातो. असेल एक १०० फूट खाली नदीच्या किनारी. पण वरून छान दिसतं चित्र. गावातल्या घरांची कौलारु छपरं,भातशेती, माड, कलमं असं अगदी टीपीकल कोकणी गाव वाटतं, पण मला दिसलेलं, लहानाचा मोठा होईपर्यंत अनुभवलेलं गाव-- ते तर वेगळेच आहे.

हायवे वरून झोकदार वळण घेऊन गाडी खाली उताराला लागली की समोर आमची शाळा लागते. आणि तेव्हा आमचं गाव सुरु होतं- खारेपाटण. शाळेजवळून पुढे गेलात तर "राऊतांची विहिर" दिसते. आमच्या लहानपणी तिथे एक विचित्रपणे वाढलेला माड होता. विचित्र अशासाठी की सरळसोट वाढून तो अचानक वळण घेता झाला होता. त्यामुले तो एखादा विळा/कोयता उभा करुन ठेवल्यासारखा दिसे! ती आमच्या शाळेजवळची राऊतवाडी, विहिरीवर पाणी भरणार्या बायका, त्यांच्या गप्पा,त्यांचे कपडे धुताना येणारे फट- फट असे लयबद्ध आवाज, काढण्याने पाणी काढून, कळशीत ओतताना होणारा तो विशिष्ट नाद, आणि ह्या सगळ्याचा एकत्रित होणारा परिणाम , मी अजूनही तसाच जपून ठेवला आहे मनाच्या तळाशी!

विहीरीकडून पुढे गावात निघालो की डाव्या हाताला थोडं लांबवर राणे डॉक्टरांच्या दवाखान्याकडे नजर जाते. . लहान असताना त्यांच्या दवाखान्यात बघितलेले त्यांचे पदवीदानाचे फोटो, त्यांच्या बॅचचे फोटो अजून आठवतात. तेव्हा तर त्यांच्या दवाखान्यातील, पेशंटाना बसण्याच्या खोलीत भिंतीवर लावलेले शरीराच्या विविध भागांचे क्रॉस्-सेक्शन्स, विशेषतः मानवी जबड्याचा कुण्या फिरंगी चित्रकाराने काढलेला सेक्शन,त्यातील ती पिंग्या-सोनेरी केसांची मुलगी, आयुष्यात पहिल्यांदाच बघितलेली ती फिरंगी रंगसंगती, जुनी शिसवी लाकडाची,हात ठेवण्याची जागा गोल केलेली बाकं, काचेच्या बाटलीतून, बाहेर मापाची कागदी पट्टी लावून मिळणारं लाल औषध, आणि " काय गे, आपली बाटली येताना घेऊन येवक काय झाला?" असे लटकेच राग भरणारा कंपाऊंडर,- सगळं अजून जसच्या तसं आठवतं. विशेष म्हणजे आजही त्यांचा दवाखाना आहे तसा , त्यांच्या पुढील पिढीने जपलाय!!


रस्त्याच्या दुतर्फा असणारे भाताचे मळे आणि उजव्या अंगाला दिसते ती खडकवाडी, इथल्या देवस्थळींच आमच्या गावात मेडिकल दुकान आहे. तेव्हा त्यांच्याकडे कधीही गेलं तरी आल्याची गोळी हातावर मिळायचीच. आपल्याकडे एखादे औषध नसल्यावर ते आजोबा, थोडं इकडे-तिकडे बघून म्हणायचे " अमॄतांजन,?अमॄतांजन,अमॄतांजन,अमॄतांजन नाsssहीsss. म्हणजे कसं गिर्हाईकलाही समाधान वाटायचं की एवढं शोधून देखील आपल्याला हवंय ते औषध नाही बुवा मिळत. "लर्न द आर्ट ऑफ सेयीन्ग नो" चे धडे मी आज शिकतो, पण ती कला त्या देवस्थळीआजोबांना तेव्हाच अवगत होती!!


केदारेश्वराच्या मंदिराजवळून पुढे गेल्यावर एस्.टी स्टँड. तिथला आमचा अकबर पेपरवाला, त्याची त्याच्या भावाबरोबर पेपरविक्रीवरुन होणारी भाडणं आणि आजूबाजूच्या स्टाँल्सवरून येणारा कांदाभज्यांचा घमघमाट हे दोन गोष्टीं अजूनही आहेत. स्टँडशेजारच्या तॄप्ती कोल्ड्रींक हाऊसमधे तेव्हा मिळणार्या लस्सीची चव आणि दर्जा अजूनही आहे तसाच. पण तिथला तो गोटी सोडा फोडताना येणारा आवाज आता मात्र येत नाही कारण गोटी सोड्याची जागा आता आधुनिक कोला आणि पेप्सीने घेतली आहे.


इथून गावाची बाजारपेठ सुरु होते. बाजरपेठेतील लाल मातीच्या रस्त्यावर, धूळ उडू नये म्हणून , सपासप पाणी मारणारे व्यापारी बघत पुढे निघालं की, डाव्या बाजूला एक चप्पलांचं दुकान दिसतं. मी लहान असताना म्हणजे १९८०-८२ साली ते दुकान, भारत-पाकिस्तान फाळणीतून आमच्या गावी आलेल्या एका सिंधी कुटुंबाने सुरु केलं. त्यांच्यासमोर तळगांवकरांचं दुकान, पानाच्या करंडीवर पाणी मारत, एका हाताने ते देठाच्या बाजुने खायची पाने अशी सफाईने मोजत. त्यानंतर त्या पानांची उभी गुंडाळी करून त्याला बारीक धागा बांधून देत असत. इतका वेळ त्यांच्या दुकानासमोर उभे राहिलात की तंबाखूचा उग्र नी तिखट गंध तुमचा नाकात घुसलाच समजा!! असोली सुपारी, सुपारी खंड आणी पूजेला लागणारी अख्खी सुपारी त्यांच्याचकडे मिळायची.

माझा गाव आणि माझे लहानपण- भाग-२

थोडं पुढे गेल्यावर भाजीची दुकानं. त्याच्या पलीकडे दिसणारे कौलाचे डेपो, सॉ-मिल ( म्हणजे लाकडे चिरुन त्याच्या फळ्या, वासे बनवणारी मिल), तिथे कामाला आलेल्या, लाकूड, कौले घेऊन जाण्यासाठी उभ्या असलेल्या बैलगाडया. ह्या सॉ-मिलवर मात्र मी जायचो. तिथे दोन रेल टाकून, त्यावर एक ट्रॉली असायची, ट्रॉलीवर कापायचे लाकूड/ ओंडका ठेवून, ती ट्रॉली बटण दाबल्यावर पुढे यायची. इकडे गोल फिरणारं पातं तयार असायचं. पण त्या पात्याचा स्पीड बदलून, ओंडक्याची स्थिती बदलून वेगवेगळ्या प्रकारचे आकार तयार होत. ते बघायला मजा वाटायची. ती करवत चालवणरा आणि ओंडक्याची स्थिती बदलणारा , दोघांनीही एक जाड चामडयाचे जॅकेट घातलेले असायचे, काही इजा होऊ नये म्हणून. आजुबाजूला उडणारा लाकडाच्या भुश्शात खेळताना मजा यायची.

बाजारपेठेत विष्णूमंदिराच्या आसपास सगळी, कावळे, ब्रम्हदंडे, उन्हाळकर ह्या जैन मंडळींची दुकानं. तिथे असणार्या तिरफळ आणि काजू बियांच्या दरवळातून पोस्टापर्यंत जातोय न जातोय तर आपली तंद्री भंग पावायची ती तालबद्ध ठोक्यांच्या आवाजाने. कुठून यायचा बरं हा आवाज?

जरासं पुढे , माझा मित्र समीरच्या वडिलांचं भांडयांचं दुकान होतं. स्टेनलेस स्टील, पितळ, तांब्याची विविध भांडी आकर्षकपणे मांडून ठेवलेली असत. आता भांडी- पातेली आकाराने मोठी , म्हणून ती मावतील असा लाकडी फळ्या व साखळ्यांचा बनवलेला, एक तागडी २ फूट बाय २ फूट असेल, असा तराजू लक्ष वेधून घ्यायचा. त्यांच्या दुकानात पाठीमागे एक कारागीर बसायचा. त्याच्यासमोर एक लोखंडी खुंटा असायचा, त्या खुंट्यावर एखादा पितळी,किंवा तांब्याचा हंडा उपडा ( म्हणजे त्याचे तोंड खाली) करून , त्या हंड्यावर ठोक्याची नक्षी काढायचे काम तो कारागीर अगदी तल्लीन होऊन करायचा. त्याच ठोक्यांचा तो नाद, एखाद्या तबलजीने तबला वाजवावा तसा आसमंतात भरून राही.दुसरं महत्वाचं आकर्षण म्हणजे खरेदी केलेल्या भांड्यावर मशीनने नांव घालतानाचा आवाज!! ण्टर्र्,ण्ट्र,ण्टर्र्,ण्ट्रण्टर्र्,ण्ट्र आणि शेवाटी थांबताना एक दीर्घ ण्टर्रर्रर्रर्र.

समीरच्या दुकानासमोर, डॉ. सोमणांचे घर. माझे वडिल त्यांच्याकडे रहयला होते, शिकताना. त्यामुळे बाजारात गेलो कि सोमणांकडे गेल्याशिवाय काही आम्ही परत जात नसू. ते होते मिलिट्रीत कर्नल, तिकडून रिटायर होऊन गावाला आलेले. त्यामुळे सोमणआज्जींकडे विविध पदार्थ असायचे. माईन मुळ्याचं लोणचं, दाल-बाटी आणि पॅशन्-फ्रूटचे सरबत (त्यांनी पॅशन्-फ्रूटचे एक झाड लावलं होतं) असे त्यवेळी अनवट असलेले पदार्थ सोमणआज्जींकडे चाखायला मिळायचे.अजून थोडं चालल्यावर, धाक्रसांचा वाडा लागायचा, त्याला भव्य दिंडी दरवाजा होता.

तिथून पुढे सुरु व्हायची ती, ढेकणे, पिसे आणि गाठे ह्यांची कापड दुकाने. "घ्या हो, अगदी ब्राम्हणी वाण आहे हो, तुम्हाला छान दिसेल"असं मिठ्ठास बोलत आपण आत गेल्यागेल्या विविध लाईट्स सुरु करणरे विनायकराव पिसे म्हणयचे कि "बघा , एकच वाण आहे हो, असा दुसरा नग नाही, जणू काही तुमच्या साठीच आणला आहे' एव्हढं गोड बोलल्यावर तुम्ही नाही म्हणूच कसे शकता?

तिथून वरती घाटी चढून गेल्यावर आपण पोचतो ते किल्ल्यावर. इथे शिवाजी राजांनी राजापूरच्या दोन डचांना पकडून कैदेत ठेवलं होतं. किल्ल्यावर शिवकालीन भवानी मंदिर आहे. तिथे दसर्याला, गाव पारध झाली की मारलेल्या रान डुक्कराच नेवैद्य दाखवला जातो. गाव पारध म्हणजे दसर्याच्या दरम्यान कापणीला आलेल्या भातशेतीची नासडी करणार्या रान डुक्करांना मारणे. दसर्याला किल्ल्यावर पतंग उडावण्याचा कार्यक्रम असे. किल्ल्यावर उभं राहून समोर साजराबाईची त्रिकोणी टेकडी दिसायची. आपला पतंग अगदी त्या टेकडीपर्यंत जावा असं वाटायचं. दसर्याला गुरवाने आपट्याची पाने खड्सून ( झाडावर चढून फांद्या खाली कापून टाकणे) टाकली की त्यातील सोने लुटायला ही झुंबड उडायची.

माझा गाव आणि माझे लहानपण-भाग-३

समुद्राच्या भरतीचं पाणी खारेपाटणपर्यंत येतं.खारेपाटण हे इतिहासात एक व्यापारी बंदर होतं. तिथून मीठ आणि कौलांचा व्यापार चालायचा. गावातून वाहणारी शुक नदी सह्याद्रीत उगम पावते आणि खाली ५०- ६० किमीवर समुद्राला मिळते. त्यामुळे तेव्हा खारेपाटणच्या डाउनस्ट्रीमचे लोक बाजाराला इथे यायचे ते भरती सुरु झाली की. म्हणजे समुद्राच्या भरतीच्या पाण्याबरोबर होडी आपोआप यायची. ओहोटी सुरु झाली की ओहोटीच्या पाण्याबरोबर घरी परत जायचं. खारेपाटणला खूप जुना इतिहास आहे. तश्या इथे खूप खूणा सापडतात. फारसे कुठे न आढळणारे सूर्यमंदीर आणि सूर्यमूर्ती इथे आहे.

साजराबाईच्या टेकडीच्या पायथ्याला आमची कॉलनी आहे. ते एक २५-३० घरांचं कुटुंबच!!. गावात, बाजारपेठेत पावसाळ्यात पूर यायचे हमखास. त्यामुळे, गावापासून थोडं दूर, उंचावर, मुंबई- गोवा हायवेच्या कडेला आमची कॉलनी झाली. जेव्हा ही कॉलनी बांधली तेव्हा तिथूनच दगड काढले गेले, त्यामुळे एक मोठ्ठ तळं निर्माण झाल आहे.विशेष महत्त्वाचं म्हणजे आमची कॉलनीच्या जागेवर एक पुरातन विहीर होती. अजूनही आहे. ही काही साधी नेहमीची विहीर नाही. ही विहीर अती-प्राचीन असून तीला नऊ बाजू आहेत. म्हणजे जसं चौकोनी किंवा गोल बांधकाम असतं तसं हे नऊकोनी . कुण्या अनामिकाने प्राचीनकाळी हे नऊकोनी बांधकाम का केल ते नाही कळत.

हायवेच्या कडेने दुतर्फा वडाची झाडं छान सावली देतात. ह्या वडांच्या झाडाखाली हायवेच्या कामासाठी सिमेंटचे मोठे पाईप टाकले होते. तेव्हा आम्ही मित्रमंडळी त्या पाईपांवर चढून वरती वडाच्या पारंब्या धरून, खाली पायाने पाईप पुढे ढकलण्याचे अचाट खेळ खेळायचो. पावसाळ्यानंतर टाकळे माजले की त्यावर येणार्या पिवळ्या- करड्या फुलपाखरांच्या मागे बेभान होऊन धावायचं आणी आपली फुलपाखरांची शिकार एकमेकाला दाखवण्यात काय थ्रील वाटायचं राव. पण आता त्याला क्रूरपणा, निसर्गाचा ह्रास असे काही काही म्हणतात!

तसाच क्रूरपणा म्हणजे खैराच्या झाडावर कोवळे कोंब खायला आलेले भुंगे पकडून, त्यांना करवंदीचा काटा आणी पानात टोचून , तो कसा काटयाभोवती सुटकेसाठी फिरतो ते पाहणे. पुढे फिजिक्सच्या प्रोफ नी सेंट्रीफ्युगल फोर्सचा कन्सेप्ट शिकवताना, मला तो करवंदीच्या काट्याभोवती फिरणरा भुंगा आठवला!!मग पुढे -पुढे क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी सुरु झाल्यावर असले खेळ बंद झाले.

पण आमच्या कॉलनीत खूप धमाल यायची. समोर रामेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागे डोंगरावर आकाश टेकल्यासारखे वाटायचं. त्याला आम्ही क्षितीज-रेषा म्हणत असू. त्या डोंगरावरून पावसाळ्यात आम्ही नैसर्गिक घसरगुंडी करायचो. म्हणजे चक्क उतार पावसाने निसरडा झाला की बसून घसरत यायचं खाली. दर पावसाळ्यात एक तरी चड्डी घासून फाटायचीच!!

माझा गाव आणि माझे लहानपण-भाग-४

साजराबाईच्या टेकडीवर पाणी योजनेची टाकी आहे. टेकडीच्या टॉपवर गेल्यावर, फणफण वारा अंगावर घ्यायला जाम मजा यायची. तिथून खाली बघितल्यावर वळणं घेत जाणारी आमची शुक नदी दिसायची. तिच्यावरचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे जोडणारा पूल दिसायचा. ह्या नदीवरचा हा एकमात्र पूल. काळ्या दगडांच्या कमानींचे देखणे ब्रिटीशकालीन बांधकाम आहे. समोर पाहिल्यावर दूर वळणं घेत जाणारा हाय वे दिसायचा. तिकडे लांबवर एखादी गाडी दिसली की आम्ही आकडे मोजायला सुरुवात करायचो. गाडी किती आकडयात टेकडीच्या पायथ्याशी आली ते बघणे ह्यात पण मजा यायची.


गणपतीत एकमेकाच्या घरी जाऊन आरती करणे, उद्याच्या आरतीला प्रसाद काय पाहिजे ह्याची हक्काने फर्माईश करणे, कुणाची आरास कशी आहे त्यावर चर्चा करणे ह्यात गणपती कधी आले आणी कधी गेले तेच कळायचे नाहीत.दसर्याला घरोघर जाउन आपट्याची पाने वाटणे आणि संक्रांतीला तीळगूळ वाटणे हे ओघानेच आले.


दसर्याच्या दरम्यान रामेश्वराची समाराधना असायची. सगळ्यांनी एकत्र येऊन, एकत्र मेहनत , साफ सफाई करून, देवाची आराधना करून ,एकत्र स्वयंपाक करून, एकत्रच जेवायचे असा तो कार्यक्रम असायचा. समाराधनेचा साधा सोपा मेनू म्हणजे केळीच्या पानावर लाल भोपळ्याची, लाल मिरच्या घातलेली भाजी, भरीत आणि तांदुळाची खीर. जमल्यास भात खायचा!! आहाहा!! हाताला लागलेला भाजीचा वास कितीवेळ जायचा नाही.

कोजागिरीला तर सगळा गाव रात्री वरती हायवे वर जमा होतो. आटीव दूध आणि भेळीच्या साथीला, गाणी, गप्पा आणि भेंड्याना उत येतो.आसपासच्या सर्वांगी फुललेल्या सात्वीणीच्या सुगंधाने मन मोहून जाते!!

कॉलनीत दिवाळीला तर मजाच असायची.घरांच्या दोन-दोन ओळी आणि मधे रस्ता अशी छान रचना होती. तो रस्ता झाडून साफ करून, नंतर आम्ही दिवाळीला प्रत्येकाने आपल्या कंपाउंडवरती मेणबत्त्या लावल्या की एक नयनरम्य दॄश्य दिसायचे. त्यात परत पहाटे पहिला फटाका कोणी लावला ह्याची स्पर्धा असायची.

दिवाळीनंतर गावातल्या देवळांच्या जत्रा सुरु होत. त्यात कालभैरवाची आणी दत्तजयंतीला होणारी जत्रा तर डोळ्यासमोरुन हलत नाही. ताज्या कोकणी खाज्याचा, कांदाभज्यांचा, फुग्याच्या रबराचा, मालपुव्याचा आणि त्याचवेळी बहरणार्या काजूच्या मोहोराचा संमिश्र सुवास अजूनही डिसेंबरात येतो. तो कोलाहल, गॅसबत्त्याचा उजेड, शिटट्यांचे, पिपाण्यांचे आवाज अजूनही कानात घुमतात.


वेळ काढून मी बर्याच वेळेला जातो गावाला. सगळीकडे फिरतो. गाव विकसित होत चाललंय, इथे आता मोबाइल फोन आहेत, इंटरनेट आहे, चकचकीत रस्त्यांवर, आधुनिक गाड्या आहेत, गावाकडे चाकरमान्यांनी बांधलेली,"सेकंड होम्स" सुद्धा आहेत. त्यात माझं जुनं गाव कुठे? आहे, ते आहे तसंच आहे. आजच्या युगात तिथे बदलली नाही ती तिथली संस्कॄती. अजूनही सण - समारंभ तसेच साजरे होतात, जत्रेतही तीच मजा आहे. कोजागिरी जोरात साजरी होते,समाराधना सुद्धा केली जाते.


अर्बनायझेशनच्या रेटयात माझ्या गावाने, गावपण तसंच टिकवून ठेवलं आहे. विकासाची कास धरली असली तरी, मुळं आहेत त्याहून घट्ट आहेत.म्हणून विचार केला, निदान लिहून तर काढू शकतो सगळं. जगाच्या पाठीवर जिथे जाईन तिथे घेऊन जाईन माझे गाव, माझे लहानपण आणि माझी जडणघडण!!