Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

December 3, 2008

अब पछतावेसे क्या फायदा भाग पहिला

मी कासीम. मुंबईवर हमला करुन मी एकटाच कैद झालो.बॉसने सायनाइडची गोळी दिली होती. पुलिसने पकडले तर खायला. पण इथली मुंबईची पुलिस एकदम चुस्त. ज्या अफसरवर गोळी चालवली त्याने शेवटचा सास भरण्याआधी दरोगाला तेच सांगितले. दरोगाने माझे हाथच पकडून ठेवले आणि ती गोळी काढून घेतली. म्हणूनच तर पकडला गेलो. पण आमच्या पुलिसपेक्षा इथली पुलिस एकदम जांबाज. आमच्या हाथात रायफल , तरीपण एकसाथ दोन हविलदार कूदले आमच्यावर. अमीन तर अल्ला ला प्यारा झाला. बदनसीबीने मी कैद झालो.

आता पुलिसला सांगतोय मला मरु दया. माझ्या घरवाल्यांना जिंदगी हराम करतील आता आर्मीवाले. सलमाआपाची शादी आताच झाली, तिच्या ससुरालवाल्यांना अम्मी- अब्बा आता काय सांगतील? बडे भय्या लाहोरला आहेत, मेहनत मजदूरी करतात. त्यांची पण शादी होउन चार साल झाले, दोन बच्चे आहेत. त्यांना पण आता आर्मीवाले नाही सोडणार. घरी अजून एक छोटी बह्न आणि भाइ आहे. ते काय करतील, आर्मीवाले अम्मी- अब्बुला घेउन गेले तर? मग मला मारुन टाका. म्हणजे मी काय सांगायला पण नको आणी माझ्या घरवाल्यांना काही तकलीफ पण नाही.

अब्बु फरिदपूरमध्ये कसाई होते. तेव्हा मी असेन चार सालचा. इदला बकरे हलाल करत होते अब्बु, ते बघून मी बेहोश झालो. मग अब्बुनी तो धंदा सोडला. चाटची गाडी लावली बझारमध्ये. मुलतानमध्ये किती होणार धंदा. त्यात पाच पोरांचा संसार. मग एक दिवस माझा बडा भाइजान निघून गेला. तेवढाच बोझ हल्का झाला. तो मेहनत- मजदुरी करायचा. इदला यायचा मिठाइ- कपडे घेउन.

असेच काही दिवस गेले. माझी बडी बहन सलमा आपाला रिश्ता आला. तिच्या शादीसाठी अब्बुनी घर गिरवी ठेवले. शादीनंतर दोन महिन्यातच मुलतानला दंगा झाला. सात दिन कर्फ्यू लागला. अब्बुचा काहीच धंदा नाही. अनाज संपले होते. तो शाबानचा महिना होता अजून रमजान यायला एक महिना होता, पण रमजानच्या आधीच आम्ही सात दिन रोजे केले. तेव्हा माझी उमर होती १७ सालची. काही समजत नव्हतं. उपासमारीने राग आला होता. मग अब्बुशी झगडा करुन घर सोडले. अब्बुला जोशात दिल चाहेल ते बोललो. पालना नही आता तो जना क्यू हमें असे काही बोललो अब्बु रडत होते. पण मी बाहेर पड्लो.
रागात पिंडीला पोचलो. एका मदरश्यात आसरा मिळाला. तिथे शाहरुख, आमीरचे पिक्चर बघायला मिळायचे. वाटायचं काय जन्नत आहे हिंदुस्तानात. तिथेले जातभाइ पण किती नसीबवाले, नाहीतरी काय मिळत होतं आम्हाला? दोन वेळची रोटी मिळाली तर लोक अल्लाची शुकर मानायचे. त्या पिक्चरमध्ये तर काय मस्त दिसायची हिंदुस्तानमधील जिंदगी. आमच्याकडे गोरे लोक गेल्यानंतर एक मैल पण जादा पटरी नाही वाढवली सरकारने. इकडे हिंदुस्तान कुठे पोचला.
एक दफा तरी हिंदुस्तानात जायला पहिजे तिथे असं वाटायचं.

पण मदरश्यातला मौलवी काही काही सांगायचा, त्याच्याकडे कोण कोण लोक यायचे, मग त्यांच्या लंब्या मसलती चालायच्या. ते गेले की मौलवी मदरश्यातील माझ्या सारख्या पोरांना गोळा करायचा. आणि कसले कसले कागद वाटायचा. ते वाचायला लावायचा. मग खुद भाषण दयायचा. ती भाषण एकून हळू हळू कश्मीरमध्ये हिंदुस्तानी आर्मी काय करते ते समजायला लागलं आमच्या जातभाईंवर तिथे आर्मी काय काय बदसुलूक करते ते मौलवी समजून सांगायला लागला. शाहरुख आमीरच्या मुंबईपासून कश्मीर किती दूर ते माहित नव्हतं पण नंतर मौलवीने एकदा तर मदरश्यातल्या टीव्हीवर एक टेप लावली. त्याच्यात तर कश्मीरमधे काय काय चालू आहे ते दाखवले. एकदम रक्त तापून निघाले. मग मौलवीकडे हमेशा येणरयापैकी दोघे आले. त्यांनी अजून भाषण दिले.

अजून काही कमवत नव्हतो. मदरश्यात दोन वक्तची रोटी तर मिळत होती. बस्स पिंडीत आर्मी अफसर खूप. ते कार घेउन फिरायला बाहेर पडत. त्यांची पोरं टाय लावून इंग्लीश शाळेत जायची. सुबह शाम आर्मी अफसरांच्या बायका आणी पोरी, बघत भटकायचं. शाहरुख, आमीरचे पिक्चर बघायचे. दुपारी आणि रात्री खान्या अगोदर मौलवीचे भाषण एकायचं अशी मस्त जिंदगी होती. मग नंतर मौलवीच्या त्या दोस्तांच्या खेपा वाढू लागल्या. कश्मीरच्या जोडीला आता तर हैद्राबाद- जयपूरच्या टेप येउ लागल्या. मौलवीचे दोस्त पण रोज भाषण देउ लागले.हिंदुस्तानी एवढी तरक्की केली म्हणतात मग इतके बदसुलूक का करतात?

पाच सहा महिने असेच गेले. एकदम मौलवी आला. मला म्हणाला तुला खुदाचा वास्ता, तुला खुदाने त्याची सेवा करायचा मोका दिलाय. भरोसा ठेव. मी सांगतो तिथे जा म्हणाला. तुझे घर गिरवी ठेवलंय ना ते सोडवून देतो. अब्बुकडे कुठे एवढे पैसे. घर सुटतंय म्हणून मी हो म्हणालो.

अब पछतावेसे क्या फायदा- भाग दुसरा

मौलवीचा दोस्त दुसरया दिवशी आला. त्याच्याबरोबर गेलो. रात्र भर आर्मीच्या ट्रकात बसलो होतो. पिंडीवरुन निघून मरकज़-तय्यबा ह्या गा्वात आलो. रात्रभर आर्मीच्या खुल्या ट्रकमध्ये बसून थंडीने नको जान झाली. माझ्याबरोबर अजून अशीच १२- १५ पोरं होती. सगळी अशीच गरीब. कुणाच्या बहनच्या शादीला पैसे नव्हते तर कुणाची अम्मी बीमार. पचास – साठ हजार घरवाल्यांना मिळतील म्हणून सगळे चालले होते. आणि दोन वक्ताची रोटीची तजवीज.

मौलवीचा इथे काय संबंध ते माहित नाही पडल शेवटपर्यन्त. पण मौलवीकडे येणारे त्याचे दोस्त मात्र इथे ही भाषण दयायला यायचे. काय जबान होती त्या दोघांची. तीन घंटे लगातार बोलले तरी त्यांनी अजून बोलायला पाहिजे असं वाटायचं .रोज वेगळी टेप दाखवायचे. हिंदुस्तान आपल्या जातभाईंवर नाइन्साफ करतो हे आता समोर यायला लागलं होतं. इतके दिवस पिकचरमध्ये बघितलेल्या हिंदुस्तानची ही बाजू समोर यायला लागली.

रोज कसरत मात्र करायला लागायची. झाडावर चढून रस्सीने दुसरया झाडावर जायचं. पहाडीवर धावायचं. मरकज़-तय्यबाच्या त्या थंडीत पोहायला पण लावायचे. हाथ- पायावर सरपटायला लागायचं. पच्चीस किलो वजन घेउन चालायला लावायचे. एखादा चक्कर येउन पडला तर त्याला फटके मारुन पुन्हा चालायला लावायचे. कसरत खूप करुन घेतली.एकदम आर्मीतले लोक करतात तशी. पण भूक लागली की खायला भरपूर मिळायचं. रोज मस्त गोश्त खायला दयायचे. दूध, बादाम, सेब खूप खायला देत. एवढं अब्बूने कधी दिलं नसतं.

फायरिंगमध्ये माझा निशाना बघून बॉस तर खूष झाला. हो त्याला बॉस म्हणायचं. त्याचं नाव नाही विचारायाचं तो आर्मीत होता म्हणे. माझा निशाना बघून तो म्हणायचा, काश ! करगील ला पाठवले त्यांचा असा निशाना असता तर?

आता त्या हिंदुस्तान्यांना सबक देण्याची वेळ आली होती. कश्मीरमधून हिंदुस्तानात पाठवणार होते. हिंदुस्तानात गेलो की एक दफा तरी मुंबई बघायची असं ठरवलं होतं.

पण काय झालं काय माहित , अचानक मला मरकज़-तय्यबा मधून माझी रवानगी दौरा-आम इथे झाली. तिथे सहा महिने समुंदरवर ट्रेनिंग झालं आता मला त्याची आदत पडली होती. त्यामुळे ट्रेनिंग पूरी करायला काही तकलीफ नाही झाली. फायरिंग तर माझी सगळ्यात चांगली होतीच. तेव्हा आपली बोट आपल्याला पाहिजे तिथे कशी न्यायची ते पण शिकवलं. एकदम नवीन फोन वापरायला शिकवला. त्यात तर आपण कुठे आहोत ते पण दिसायचं. आसपासचा नक्शा पाण दिसायचा. स्साल्या पिंडी कॅन्टानमेन्टमध्ल्या, आर्मी अफसरांच्या त्या घरवाल्या मोबाइलवर खिदळताना आठवायच्या. त्यांच्या मोबाइलपेक्षा हा फोन तर अजून बढकर होता.

अजून कारवाइचा हुकुम येत नव्ह्ता. कधी एकदा हिंदुस्तानात जातोय असं झालं. माझ्यासारखे अजून बरेच होते ट्रेनिंगला. पण ह्या समुंदरवर ट्रेनिंग कशाला असा एकदा प्रश्न विचारला बॉसला. हो त्याचं पण नाव नाही माहित. नेव्हीत होता तो. त्याला काय वाटलं काय माहित. त्याने सरळ मला उचलून समुंदरमध्येच फेकून दिलं आणि लॉंच घेउन गेला. तेव्हा एक डेढ घंटा पोहत राहिलो. तो परत आला. उचलून आत घेतलं आणि बेहोश होइपर्यन्त मारला मला तिघांनी मिळून.

किनारयावर आल्यावर समोर माझा छोटा भाइ रसूल दिसला. त्यांनी त्याला पकडून आणला होता. मग दोन दिवसांनी माझा इम्तेहान घेतला. माझ्याकडे रिव्हॉल्वर दिले. समोर माझा रसूल . हुकुम आला “फायर” माझे हाथ कापले. परत हुकुम आला “फायर” तरीपण हाथ कापले. मग मानेवर रिव्हॉल्वरच्या नळीचा थंडगार स्पर्श जाणवला.परत हुकुम आला “फायर”. माझे हाथ आपोआपच चालले. ट्रीगर दाबला गेला. मी डोळे मिटून घेतले. बेहोश होउन खाली पडलो. किती वेळाने शुद्धीवर आलो ते माहित नाही, पण डोळे उघडले तर समोर रसूल होता. त्याला काहीच समजले नव्हते. बॉस आला. थंडपणे म्हणाला. "तू सिलेक्ट हो गया मिशन के लिये, रिव्हॉल्वर खाली था."
मिशन पूरी होइपर्यन्त रसूल आता आमचा मेहमान बनून राहणार असे सांगून निघून गेला.

मला आता चीड आली होती. स्साला जाउन त्या हिंदुस्तान्यांवर गोळ्याच चालवतो. ग्रेनेड फेकून किती जणांना मारुन टाकतो असं होउन गेलं.अजून महिनाभर ट्रेनिंग झालं. आणी मिशन वर जायचा हुकुम आला.

त्यादिवशी आम्हाला एकदम हेवी अम्युनिशन दिले गेले. एकदम नवीन रायफल मिळाल्या. बॉसचा बॉस आला होता. बॉस त्याला सर म्हणत होता. सर म्हणाला माझी मिशन कधीच फेल नाही गेली. माझ्या मिशनमधली पोरं परत आली आहेत. तुम्ही दहाजण परत आणण्याची जिम्मेद्दारी आपली असं म्हणाला. चाहे तो हवाइजहाज अग्वा करेंगे पर तुम सबको वापस लायंगे. एकदम थंड, शांत बोलत होता. पण अजून मिशन काय ते माहित नव्हतं.

सर ने पडदयावर हिंदुस्तानचा नक्शा दाखवला. मग तो मुंबईत आला. मी मनात म्हणालो, वाह क्या बात है, आपलं स्वप्न पूरं होणार तर. पहिलंच मिशन आणि मुंबईत. आमच्यापैकी काही आधीच मुंबईत त्या हॉटेलात जाउन राहून आले होते. त्यांनी आम्हाला नकशे समजाउन सांगितले. दोन रात्री समजून घेण्यात गगुजरल्या.

तिसरया दिवशी पहाटे स्पीडबोटीतून दौरा-आम सोडलं. पोरबंदरला एक मच्छीची लॉंच पळवली. त्याच्यावर चारजण खलाशी होते . त्यांना आम्ही खलास केलं. तिथून मुंबइत उतरलो.
माझ्याकडे सीएसटी आणी कामा हॉस्पिटलचे मिशन सौपले होते. कामा हॉस्पिटल मध्येच त्या तिघांना मारले आम्ही. मरकझ- तय्यबाला फोन लाउन खुष- खबरी दिली. बाहेर पडून पळून जात होतो तर मुंबईची पुलिस पाठी पडली. त्यांनी जीपच घातली आमच्या कारवर. आमच्याहातात गन्स दिसतात तरी ते जांबाज पुलिस आमच्यावर कूदले. सायनाइड यला टाइमच नाही मिळाला. आणी कैद झालो.

आता माझ्या साथीदारांना, इथले मुस्लीमभाई कब्रस्तानात दफन करु नाही देणार. मी जेव्हा माझ्या छोट्या रसूलवर गोळी चालवली ना, तेव्हाच मेलो. पण आर्मीच्या खौफमुळे काम करत राहिलो. आता तर रसूल त्यांच्या ताब्यात आहे. काय करतील त्याचं . त्याचा दुसराकासीम करतील की त्याला मौत देतील? अम्मी-अब्बुला ते एक लाख देणार होते . आता देतील का? एक लाख जाउ दे, तकलीफ तरी नक्कीच देतील. आर्मीवाले नाही सोडणार माझ्या बडेभय्याला, सलमाआपाला.

पण आता पछतावा होउन काय फायदा. त्या वेळीच विचार करायला हवा होता. पण हे पोट? त्याचं काय केलं असतं?

छोट्या रसूलवर गोळी चालवली ना, तेव्हाच मेलो मी. आता जिंदा राहून काय करु? म्हणून सांगतो मला मारुन टाका..

पूर्णत: काल्पनिक. तसेच खालील बातम्यांवर आधारित.
१.TOI Making of a Jehadi page 13 http://epaper.timesofindia.com/Daily/skins/TOI/navigator.asp?Daily=TOIM&login=default
३.
४.
५.