November 17, 2008

जुवळ भाग-२

त्या दोघांचं तांडव चालूच होतं. आमच्या पासून काही फूट अंतरावर आम्ही ते सगळं बघत होतो. चांगली मनगटाएवढी जाड ती जनावरं कधी थोडी अलग होत होती. वरची चढण चढून जात होती. फिरुन खाली येउन एकमेकांना फणे पसरुन, समोरासमोर डोळाभर न्याहाळत होती आणी पुन्हा गुरफटून बिलगून जात होती. आपल्या फण्यांनी , जिभल्यांनी एकमेकाला स्पर्श करत होती.

तो सगळया परिसर त्यांच्या थैमानाच्या खुणा आपल्या अंगावर बाळगता झाला होता. गवत अस्ताव्यस्त झालं होतं. रानअळू जागोजागी मोडून पडलं होतं. बांबूच्या काटयांवर ती जोडी आपटून त्यांच्या अंगावर त्याच्या खुणा दिसत होत्या. पण त्या दोघांना त्याचं कसलंही भान उरलं नव्हतं.

आम्ही तिघेही नि:स्तब्ध, थिजल्यासारखे नजरबंद होउन ते अनोखं , दुर्मिळ दॄश्य बघत उभे राहिलो होतो.

हे सगळं बघून फारतर दहा मिनिटं झाली असतील, त्या दोघांनी एकमेकाला विळखे घालत आता पूर्ण उंची गाठली, शेपटीकडे ते दोघे आता एकत्र झाले. आपण आपले हात एकमेकाभोवती पिरगाळून दोन्ही तळहात थोडे बाजूला घेउन फुलवले तर जसं दिसेल तसे एकमेकाला विळखे मारुन त्यांनी आपले फणे एकमेकाच्या आजूबाजूला फुलवले….. ती उमदी जनावारं आता दोन,वेगवेगळी उरली नव्हती. परस्परांत रममाण असे त्यांचे अद्वैत झाले होते.

पुढच्या काही क्षणांत ती जोडी अलग झाली. त्यातील एक जनावर आता निपचीत श्रांत- क्लांत पसरलं होतं. दुसरं मात्र आमच्या रोखाने फणा काढून बघत होतं. आता इतक्या वेळाने भानावर येउन त्याला आमची चाहूल लागली होती.

खाडकन जाग यावी तसे आम्ही भानावर आलो. काय करावं ते सुचेना. वरती कसं जाणार. त्याने वाट तर अडवून धरलेली. शिवाय थोडं पुढे त्यांच्या पैकी एक जण पसरलं होतं. खाली व्हाळ. प्रवाहात उडी मारायला आवश्यक एवढं पाणी सुद्धा नव्हतं.

निर्णय घ्यायला फक्त काही क्षण होते आमच्या जवळ. बघितलं तर थोडा पुढे, व्हाळाचा प्रवाह जराश्या उंचीवरुन खाली पडत होता. तिथे एक कोंड* होती. उतारावरुन आडवं धावत जाउन त्या कोंडीत उडी मारणे हा एकच पर्याय होता.
दोघांनाही हाक देउन मी पुढे पळत गेलो , पाठचा पुढचा विचार न करता साधारण पाच- सहा फूट उंचीवरुन उडी टाकली थेट कोंडीत. माझ्या पाठोपाठ अजून दोन आवाज झाले.
आता संकट तरी टळलं होतं. जीवाच्या आकांताने उड्या मारल्या खरया, पण आमच्यापैकी कोणालाच पोहायला येत नव्हतं.

आमचं नशीब त्या दिवशी खरोखरच जोरावर होतं. कोंड फारशी खोल नव्हती. एकदा- दोनदा असहाय्यपणे त्या पाण्याबरोबर गोल गोल फिरुन आमचे पाय आता खाली टेकले. तोपर्यन्त बरच पाणी खाल्लं होतं. कसाबसा मी काठावर हात टेकून वरती आलो. पाठोपाठ दोघा मित्रांनाही वरती काढलं.

काठावर येउन धापा टाकत बसलो. दहा मिनिटामध्ये एवढं सगळं घडून गेलं होतं. एव्हाना ती खस-फस सुद्धा एकू येइनाशी झाली. आमच्या पायातल्या चपला आता कोंडीतल्या पाण्याबरोबर गोल फिरु लागल्या होत्या. दगड मारुन त्या काठाला लावल्या. काढून घेतल्या. कपडे तर ओले चिंब झाले होते.

नववी- दहावीच्या वयाच्या अवघड टप्प्यावर असताना असे काही बघायला मिळाल्यामुळे, किंवा एवढे चालल्याच्या श्रमांमुळे, की कोंडीत सापडून बाहेर आल्यामुळे, कोण जाणे कश्यामुळे, आम्हा तिघांचेही उर आता धपापू लागले. कपाळ,कान,गाल, गळा आणी छाती गरम झाली होती. ताप बघताना जसा हात लावून बघतो तसा हात लावला तर चटका बसण्याइतपत . तोंडाला कोरड पडली होती. कोणच कोणाशी बोलत नव्हतं. जणू एक अनामिक, विलक्षण गारुड पडलं होतं. डोळ्यासमोरुन ते दॄश्य हलत नव्हतं.. अजूनही आहे तसं आठवतं.

धोंडीवर थोडावेळ टेकलो. भारल्यागत होउन तसेच अबोलसे उठलो. पुढे चालून आमच्या खुणेच्या जागेवर आलो. तिथून वरती होउन अर्धा तास वाट तुडवली की घरी.

एवढ्या कालावधीत आता अंधारुन यायला सुरुवात झाली. आकाश भरुन येउ लागलं. थोड्याच वेळात पाउस सुरु झाला.तसेच भिजत भिजत घराकडे चालताना कधीतरी पाउस संपला. हळूहळू आम्ही भानावर येउन एकमेकांशी बोलू लागलो. आता अंग हळूहळू नेहमीसारखं होउ लागलं. भर पावसातही जाणवणारा चटका आता जाणवेनासा झाला होता.

आता घरी जाउन पावसात भिजायला झाल्याचं सांगून जमणार होतं.

शाळेत स्त्रीकेसर, पुंकेसर, पुनरुत्पादन संस्था वगैरे फक्त पुस्तकात वाचायला शिकायला मिळत होतं. पण हे असं काही प्रत्यक्ष बघितल्यामुळे, ते अजून डोळयासमोरुन हलत नव्हतं. ते ही इतकी उमदी , देखणी जनावरं बघायला मिळणे हा अजून एक योग.

घरी जाउन गरम पाण्याने आंघोळ केली. देवासमोर दिवा लागला होता. रामरक्षा म्हटली तेव्हा कुठे जरा चित्त ताळ्यावर आलं.

गेल्यावर्षी एका मित्राबरोबर बोलताना त्याला हा प्रसंग सांगितला. तो नाथपंथी. बैरागी. त्याच्याकडून समजलं की आम्ही जे काही बघितलं ते फार कमी जणांना प्रत्यक्ष बघायला मिळतं. असे बघणारे फार भाग्यवान असतात असं त्यांच्या समाजात प्रचलित आहे. भाग्योदय होइल तेव्हा होइल. पण हा विलक्षण अनुभव मात्र तसाच साठवलेला राहिल.

हा अनुभव शब्दबद्ध करताना कोकणी बोलीभाषेतील अनेक शब्द वापरणे आवश्यक झाले. त्यांचा अर्थ तिथेच कंसात दिला असता तर अडथळल्यासारखं वाटलं असतं म्हणून त्या शब्दांना * असे चिन्ह टाकून त्यांचा अर्थ खाली देत आहे.

व्हाळ : रुंद, मोठा ओढा
खळावतो: पाउस थोडे दिवस थांबतो.
ताप पडणे: उन पडणे.
कुकारा : खच्चून, लांबवर एकू जाइल अशी मारलेली हाळी.
धोंड : प्रवाहाच्या पात्रातील विस्तीर्ण, काळे पाषाण.
कोंड : प्रवाहाची धार एकत्र, थोड्या उंचीवरुन पडून खड्ड्यासारखा भाग तयार होतो. तिथे पाणी
गोल फिरते. थोडावेळाने ठरावीक उंचीपर्यन्त आले की पुढे सरकते. प्रवाहात भोवरा बनतो
जनावर : नाग असा थेट उल्लेख कोकणात करत नाहित. त्याएवजी जनावर असा शब्द
भुरंबुळे : हे कंद कोकणात,पावसाळ्यात मिळतात.ओल्या मातीत थोडंसं खोदल्यावर सापडतात. पण जपून नीट पाने जोखून काढावे लागतात, कारण तश्याच पानांची अजून एक वनस्पती असते, तिचे कंद खाल्ल्यास तोंडाला खाज येते.
मुळे : शंखात मांसल भाग असलेला माशाचा प्रकार. त्याचं सार करतात पावसाच्या दिवसात.पावसात भिजून सर्दी झाली की मुळ्यांचं मसालेदार सार हा अक्सीर इलाज.
जुवळ : नाग- सापाच्या मीलनासाठी कोकणी बोलीभाषेतला प्रतिशब्द

No comments:

Post a Comment