October 28, 2008

अफूची गोळी

बेस्टची बस आणी त्यातील प्रवाश्यांना ओलिस धरु पाहणारया राहुल राज ह्याला मुंबई पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले.

होय , मुंबई पोलिसांनी जे केले , ते योग्यच आहे. ह्यामुळे मुंबई/ महाराष्ट्रात बिहारसारखे वागू पाहणारा प्रत्येक बिहारयाच्या मनात भय निर्माण होईल. मुंबई आणी बिहार पोलिसात फार फरक आहे. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जाते. त्या तरुणाला वाटले होते की, बिहारसारखे आपण मुंबईत वाट्टेल ते करु शकतो. त्याला इनोसंट म्हणणारया बिहारी नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, नोकरी शोधायला आलेल्या गरीब बिचारया तरुणाकडे पिस्तूल कसे आले?

आजपर्यंत सर्वात जास्त रेलवे मंत्री बिहारी झाले आहेत. बिहार मधून मुंबईला जाणारया तरुणांना, बिहारात रोजगाराच्या संधी उपल्ब्ध झालेल्या नाहीत. मिळाल्या त्या फक्त बिहारी रेल्वेमंत्र्यांनी सुरु केलेल्या, मुंबईला घेउन जाणरया रेल्वेगाड्या.

बिहारमध्ये अशी हत्यारे खुलेआम विकली जातात. अश्या राज्यातील नेत्यांनी महाराष्ट्राबद्दल तोंडातून ब्र काढू नये. गेल्या ५०- ६० वर्षांत ह्या बिहारी नेत्यांनी, बिहारची वाट लावली नसती, तर त्या राहुल राजवर आज नोकरीसाठी,मुंबई गाठायची वेळ आली असती का?

आबा पाटील, मुंबई पोलिसांच्या पाठीशी ठाम उभे आहेत , हे चांगलेच आहेत. विलासरावांनी ही संधी साधून लगेच चौकशी सामिती स्थापन केली आहे. कारण गॄह खाते राष्ट्र्वादीकडे आहे. तिकडे शिवसेनेने, मनसेला ह्या मुद्दयावर सुद्धा बरोबर घेउन जाण्याचे नाकारले आहे.

राजने उभ्या केलेल्या आंदोलनामुळे मराठी मनाची त्याला सहानुभुती निर्माण झाली होती. त्याची दखल सर्वच पक्षांना घ्यावी लागली आहे. फक्त नारायण राणे आणी छगन भुजबळ ह्यांनी त्यावेळी सरकारला, रेल्वे भरतीबाबत महाराष्ट्र सरकार, रेल्वे खात्याला तसेच रेल्वे मंत्र्यांना जाब विचारणार आहे का, असे ठणकाउन विचारले होते.

पण आता ज्याप्रकारे बिहारी नेते एकत्र आले आहेत. काही वॄत्तपत्रे आणी सबसे तेज चॅनेल्सना हाताशी धरुन, ज्याप्रकारे हिंदी मिडीयात गरळ ओकली जात आहे, तेव्हा आता ह्या मुद्द्यावर समस्त मराठी नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र आले पाहिजे. इस्त्रीचे कपडे दिवसाला तीन वेळ बदलणारे, चापून चोपून भांग काढून फिरणारे, दिल्लीतील, मराठी गॄहमंत्री आता काय भूमिका घेतात हे पहायला हवे.

मुंबई पोलिसांना ह्या बाबतीत पाठिंबा असला तरी, आर आर आबांची वक्तव्ये ही, राज ठाकरेंनी निर्माण केलेल्या, मराठी लाटेवर स्वार होऊन, त्याच्याकडे झुकणारी मते आपल्यापक्षाकडे वळवण्याचा प्रयत्नांचा एक भाग वाटतात.

अशी वक्तव्ये करुन , त्यांनी बिहारी नेत्यांना एक अफूची गोळी रेडीमेड उपलब्ध करुन दिली आहे. ही अफूची गोळी, हे बिहारी नेते येत्या निवडणूकीत वापरतील आणी आधीच विकासापासून वंचित आणी सुन्न असलेली बिहारी जनता अजून बेशुद्ध पडेल.

उद्या, एखादा मराठी कामानिमित्त कोलकात्याला जाताना, त्याला मध्येच बिहारमध्ये, बिहार पोलिसांनी हकनाक उडवला तर?

October 24, 2008

लवकरच येत आहे

लवकरच येत आहे.... Coming Up Next ....

मित्रहो, अमेरिकेतील डीयर हंटींग सिझन तसंच बरेच दिवस मनात अडकून बसलेली लंच टाईम आणि डब्बा ग्रूपची पोस्ट आता पूर्ण केली आहे. दुसरा भागही इथे आता वाचायला मिळेल.
अजून पुढच्या आठवडयात


१. अजून अमेरिकन पाटया बाकी आहेत. त्या येतील पुढच्या वीकांतात.
२. ऑफिस ऑफिस! हा इथल्या ऑफिस कल्चरबद्दलचा लेख मॅड मॅड अमेरिका ह्या सदरात टाकेन.

तुमच्या प्रतिसादाने माझा हुरुप वाढला आहे. तुमच्या अभिप्रायांचे मी स्वागत करतो. असाच वाचत रहा.. नियमीत .. माझा ब्लॉग !!

दिवाळीचा फराळ तुम्ही पोटभर खाल्लाच असेल. कुठे कुठे फिरायल गेला होता ते नक्की कळवा मेलवर.

अमेरिका उलटी..




Coming Up Next मध्ये उलटेपणावर लेख लिहिणार असं वाचून अनेक मित्रांनी त्यातील योग्य शब्द कोणता- उरफाटी की उफराटी असा बराच काथ्याकूट घातला. शेवटी हे दोन्ही शब्द वगळून उलटी असा शब्द वापरायचा ठरवलं!


इथे येइपर्यंत अमेरिकेत सगळंच उलट असतं असं ऐकून होतो. तसा, मस्कत आणि दुबईत अनुभव घेतला होता, पण आता इथे हा उलटा अनुभव घेऊन बरेच दिवस झाले. पहिल्याच दिवशी न्यूयॉर्क ला हॉटेलच्या बसमधून एअरपोर्ट्वरुन हॉटेलकडे निघालो होतो. ड्रायव्हरला एका चौकात उजवीकडे वळायचे होते. मी त्यच्या पाठीमागेच बसलो होतो. समोर रस्ता दिसत होता. त्यामुळे मी माझ्या मनात टर्न घेतला तो लाँग घेतला. मला भारतात ड्राइव्ह करायची सवय. आपल्याकडे उजवे टर्न लाँग तर डावे टर्न शॉर्ट असतात. पण इथे बघतो तर काय? ड्रायव्हर चक्क शॉर्ट टर्न मारुन निघाला होता. बाप रे!! ह्या उलट्या अमेरिकेचा पहिला धक्का बसला होता.!!


पुढे अपार्टमेंटचे कुलुप, आलो तेव्हा बरोबर आलेल्या माईकने उघडून दिले. पण दुसरया दिवशी ऑफिसला जाताना दार लॉक करता येइना. मला लॉक म्हणजे क्लॉकवाईज माहिती हो, बराच वेळ खटपट करुन लक्षात आलं, उलट फिरवून बघूया, म्हणून पाहिलं तर काय, झालं की लॉक!! पुन्हा घरी आलो तेव्हा असाच घोळ. तेव्हा पण थोडया वेळाने उलट फिरवून पाहिल्यावर खुल जा सिम सिम झालं. लाईटची बटणं तर असतातच उलटी, त्याची झाली सवय, पण किचन कॅबिनेटच्या दारं , किंवा कोणताही एका झडपेचा दरवाजा, आपल्या भारतीय पद्धतीपेक्षा उलटाच असणार. म्हणजेच त्याला डावीकडे बिजागरी( हिंजेस) आणि उजवीकडे हँडल असणार. अजूनही किचन कॅबिनेटस उघडताना हात डावीकडे जातो, पण तिथे हिंजेस असतात!! मॉल्स मधली, दूध, दही, आईस्क्रीम, फ्रोजन फूड्सची कपाटंसुद्धा उलटी. आता ती सगळी एकमेकाला चिकटून ठेवलेली असतात. त्यामुळे काचेतून दिसणारया,आपल्याला हव्या असलेल्या वस्तूसमोरचा दरवाजा उघडला की समोर भलतीच वस्तू असते. कारण आपण पुढच्या कपाटाचा दरवाजा उघडलेला असतो!! इथे टाकलेले फोटो पहा. त्या फोटोंवर क्लिक केल्यावर ते मोठे दिसतील.

इथल्या जाहिरातीत दिसणारे कॉल सेंटर्सचे नंबर्स. ते नंबर म्हणजे आकडे नसतात, तर इंग्रजी अल्फाबेट्स असतात. म्हणजे इथेही उलटेपणाच की? मी आलो तेव्हा एअरलाईनच्या बॅगेज क्लेमचा नंबर दिला होता. तो असा 1-800-2235-BAGS. आता ही BAGS ही काय भानगड? हा नंबर डायल तरी कसा करायचा हो? तेव्हा समजलं की फोनच्या डायलपॅडवर जी इंग्रजी अल्फाबेट्स प्रत्येक आकडयाच्या खाली असतात, ते आकडे डायल करायचे, म्हणजे, BAGS साठी 2247 डायल करायचं. इथल्या लोकांच्या मेमरीला नंबर ध्यानात ठेवायचा जास्त ताण पडू नये म्हणून ही युक्ती. तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर डायल करा BOOK म्हणजे 2665 वगैरे वगैरे..


इथे एक गोष्ट मात्र सुलटी बघितली. ती म्हणजे पोस्टाची डिलीव्हरी व्हॅन. ती मात्र आपल्यासारखी राइट हॅन्ड ड्रीव्हन. (पण इथल्या लोकांसाठी उलटीच नाही का?) का असे? म्हणून बघितलं तर प्रत्येक घरासमोर लावलेल्या पेटीत पत्र टाकणे डिलीव्हरीचालकाला न उतरता सुलभ व्हावे यासाठी! हो, पत्र पेटी रस्त्याकडेला घराच्या समोर असते. आता जर नेहमीसारखी लेफ्टहॅन्ड ड्रीव्हन गाडी असेल तर तो पत्र काय खाली उतरून टाकणार पेटीत? कल्पना करा लेफ्टहॅन्ड ड्रीव्हन गाडी रस्त्याच्या उजवीकडून जातेय , तर तो तुमचे पत्र रस्त्याकडेच्या पेटीत कसे टाकणार? व्हॅनमधे बसल्या- बसल्या त्याला तुमच्या पेटीत पत्र टाकता यावे म्हणून डिलीव्हरी व्हॅन राइट हॅन्ड ड्रीव्हन. आता बघा राइट हॅन्ड ड्रीव्हन गाडी रस्त्याच्या उजवीकडून जातेय तर तो चालक व्हॅनमधे बसल्या- बसल्या तुमच्या पेटीत पत्र टाकू शकतो की नाही?

ह्या उलटेपणाचा कहर म्हणजे घरात इस्त्री, टी.व्ही, टोस्टर आदी उपकरणांच्या टू-पिना. दिसायला अगदी साध्या. पण आता ह्यात काय उलटेपणा? सांगतो- आपल्याकड्च्या टू-पिनेला कसे गोल पाय असतात. इथे टू-पिनेला चपटे पाय असतात. हे कमी म्हणून की काय. ह्या चपटया पायांपैकी एकाची जाडी दुसरयापेक्षा जास्त असते. आणि हो, त्यामुळे ही टू-पिन अडकवण्याच्या सॉकेटला सुद्धा ज्या खाचा असतात ना, त्यातील एक जरा जास्त रुंद असते. त्यामुळे होतं काय ही टू-पिन कशीही घातली तर नाही जात सॉकेटमध्ये. ती एका ठराविक प्रकारेच जाते. जर तुम्ही टू-पिनचा जाड पाय सॉकेटच्या रुंद खाचेत घातला तरच!!


इथे एका विकांताला(हा शब्द मी माझा मित्र प्रशांतकडून उसना घेतला आहे, वीकेंड्साठी त्याने कॉईन केलेला हा शब्द!!) कारमधून भटकूया म्हणालो. माझ्याकडे आन्तरराष्ट्रीय चालक अनुमती ( ईन्टरनॅशनल ड्रायव्हींग परमीट) आहे, आणि मी रहातो तिथे विशेष ट्राफीक नाही त्यामुळे, म्ह्टलं की बघू चलवून गाडी इथे. न्यूयॉर्कचा अनुभव होताच, तसेच मी इथल्या कलिगच्या गाडीत त्यांच्या शेजारी बसलो होतो, त्यामुळे भीड चेपली होती. पहिल्यांदा अपार्टमेंट्च्या आसपास चालवली. काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे मेन रोडवर गेलो. हो जाताना उजवीकडे व्यवस्थित शॉर्ट टर्न न चुकता मारला. स्वतःलाच शाबसकी दिली.पुढे गेलो, आता सिग्नल होता. केला की घोळ भाउ, मी तिथे!! वळल्यावर पाठीमागून सायरन वाजवत कॉप हजर. समोर ट्राफिक नव्हतं त्यामुळे काही झालं नाही, पण मी चक्क राँग साईडला घुसलो होतो!! कॉपने परिस्थिती समजवून घेऊन, मोठया उदारपणे सोडून दिले!! वरती विचारले की, सोडू का घरी परत नेऊन? तेव्हापासून कार, स्वतःच चालवत कुठेही जात नाही!!

आता मीसुद्धा उजवीकडून एंटर आणि डावीकडून एक्झिटला सरावलो आहे.!
पण ह्या अमेरिकनांना,उलटेपणाची एव्हढी सवय झाली आहे, की ते ऑफिसच्या कॉरिडॉरमधून सुद्धा उजवीकडून चालतात, कार रस्त्यावरुन उजवीकडून चालवल्याप्रमाणे!!

घरोघरी मातीच्या चुली.. अमेरिकेतील निवडणूक प्रचार

सध्या इथे निवडणूकांचे दिवस आहेत. अगदी आपल्याकडच्यासारखा नसला तरी थोडाफार तसाच प्रचार सुरु आहे. ऑफिसमधे तीच चर्चा सुरु असते.

डेमोक्रॅटीक पक्षाचे बराक ओबामा हे रिपब्लिकन जॉन मॅक्-केन यांच्याविरुद्ध उभे ठाकले आहेत.बराक ओबामांचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे. आजपर्यन्त झालेल्या तिन्ही आमने-सामने डिबेट्समध्ये तर ओबामा भाव खाउन गेले. उपहास, नर्म्-विनोद,वेळोवेळी वस्तुस्थितीची जाणिव करुन देणे आणि समोरच्यावर चिखलफेक न करता आपले मुद्दे ठाशीवपणे मांडण्याच्या त्यांच्या शैलीमुळे, मॅक्-केन हे पुरते बॅक-फूटवर गेलेले आढळले. गेल्या ८-९ वर्षातील रिपब्लिकन बुश शासनाचा कारभार, आणि सध्याची मंदीसादॄश्य परिस्थिती मॅक्-केन यांच्या काळजीत भर घालत आहेत. त्यांच्याकडे मुद्द्यांचा अभाव दिसतो आणि ओबामांएव्हढा कोणत्याही प्रश्नाचा अभ्यासही दिसत नाही.


डेमोक्रॅट पक्षाचे तिकिट मिळवण्यासाठी हिलरी आणि ओबामा यांच्यातील लढत, ओबामांनी जिंकून इतिहास घडवला. प्रथमच एक आफ्रो-अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या इतका जवळ आला आहे. त्या दोघांपैकी कोणीही जिंकले असते तरी तो इतिहासच होता कारण तर दुसरी महिला होती. पण एक झालं, डेमोक्रॅट पक्षाने त्या दोघांना उमेदवारी देऊन आपली प्रतिमा पुरोगामी बनवली.

आंतरराष्ट्रीय राजकारणाचा कमी अनुभव असलेल्या ओबामांनी त्या विषयातील महारथी जो बिडेन यांना आपला उपाध्यक्षपदाचा उमेदवार बनवले तर हिलरींना मिळणारा महिलांचा पाठिंबा लक्षात घेऊन, राजकारणात मुरलेल्या धूर्त मॅक्-केन यांनी अलास्काच्या गव्हर्नर सारा पॅलिन यांना आपला उपाध्यक्षपदाचा उमेदवार बनवले. तोपर्यन्त ह्या पॅलिन बाई कुणाला ठाउकही नव्हत्या. ह्या अनपेक्षित खेळीने ओबामांची कॅम्पेन १-२ आठवडे पिछाडीवर होती.पॅलिन बाई, त्यांचे फॅशनेबल कपडे,त्यांची धर्म श्रद्धा, त्यापोटी त्यांना झालेली पाच मुलं, त्यापैकी सगळ्यात मोठया षोडशवरशा मुलीला तिच्या बॉय-फ्रेंडपासून गेलेले दिवस (ज्यूली आठवतोय का?), पॅलीन बाईंचे फॅशनेबल ड्रेस ह्याने जणू काही अमेरिकेच्या समाजमनावर मोहिनी घातली. बाई आपल्या कुटुंब-कबिल्यासह प्रचारासाठी दिसू लागल्या. त्यांची ५ महिन्याची पोटुशी मुलगी, त्यांच्या प्रचाराचे जणू साधन बनली. धर्मनिष्ठेपोटी आपण मुलीचा, गर्भपात न करता तिचे, तिच्या बॉय-फ्रेंडबरोबर कसे लग्न लावून देणार आहोत, त्याच्या सुरस कथा साक्षात पॅलीन बाईंकडूनच ऐकाव्यात. त्या ऐकून इथल्या कॅथॉलिक सनातन्यांचे आपल्या बाजूने ध्रुवीकरण होइल अशी अपेक्षा असणारे रिपब्लिकन काही दिवसातच जमिनीवर आले. कारण ह्या सगळ्याला कंटाळलेली अमेरिकन जनता शेवटी, ओबामांकडे झुकती झाली. (आपल्याकडे त्यांना पालिन असे म्हटले जाते, इथे उच्चार पॅलिन असा करतात.बराक ओबामांना बर्राकोबामा, तर मॅक-केन ह्यांचा उच्चार जॉनकेन असा केला जातो.)


ओबामांनी छोटे उद्योगधंद्याना, तसेच मध्यम वर्गीयांना करसवलती देण्याचे घोषित केले आहे. इथे हेल्थ-इन्शुरन्स फार महाग आहे. त्यामुळे आम्ही तो स्वस्त कसा करु हे, ओबामा प्रत्येक डिबेटमधे मांडताना दिसतात. शिक्षणव्यवस्थेतही महत्त्वाचे बदल घडवून आणण्याचे त्यांचे मनसुबे त्यांनी जाहीर केले आहेत. इराकपेक्षा , अफगाणीस्तान- पाकिस्तानात सैनिकी कारवाईची गरज असल्याचे ओबामांचे मत आहे. इराक युद्धात किती मिलियन डॉलर्स फुकट चालले आहेत त्याची ते आकडेवारी देतात. आपला हेल्थ-इन्शुरन्सचा मुद्दा पटवून देताना, आपल्या आईच्या आजारपणाच्यावेळी इन्शुरन्स कंपनीबरोबर आपल्याला किती भांडावे लागले होते ह्याची ते भावनाविवश होऊन आठवण करुन देताना पाहून, आपल्या देशातील राजकारण्यांची आठवण येते. कोणत्याही फोरममध्ये, आम्हा पोलिटीशीयन्सना असलेल्या सुविधा, सामान्य माणसाला मिळत नाहीत, ह्याची आपल्याला किती खंत वाटते, ह्याची ओबामा वारंवार आठवण करून देतात असे म्हणण्यापेक्षा,संभाषणाची गाडी ह्याच मुद्द्यावर आणण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. ते बघून आपल्या देशातील आम आदमीचा नारा लावणार्या राजकारण्यांची आठवण येते.
बेल आउट पॅकेजचे श्रेय दोन्ही उमेदवार घेताना दिसतात.


परंतु मॅक्-केन यांच्याकडे मुद्द्याची कमतरता जाणवते. नवीन मुद्दे मांडण्यापेक्षा ओबामांचे मुद्दे खोडण्यावरच त्यांचा भर दिसतो. इराक युद्ध हे देवाने सोपवलेली जबाबदारी आहे, आणि खर्च होतोय म्हणून माघार घेणे म्हणजे आतापर्यन्त सांडलेल्या रक्ताचा अपमान आहे,असे सनातन्यांच्या हृदयाला हात घालणारे,टाळीखाउ मुद्दे ते मांडतात.त्यांच्या घरातील, आजोबांपासून चालत आलेल्या, सैन्यात सेवा करण्याच्या परंपरेचे ते भांडवल करायचा प्रयत्न करतात. भारताशी केलेया अणु- करारामुळे, अमेरिकेला किती बिलियन डॉलर्स धंदयाची संधी उपलब्ध झाली आहे, ह्याचा मॅक्-केन यांच्या वाद सभेतील उल्लेखाखेरीज, भारताचा कुठेही उल्लेख होत नाही.


मी सध्या आहे त्या लुईझिआनाच्या सिनेटर डेमोक्रॅट मेरी लँन्ड्रू आहेत. त्यांचे विरोधक रिप. जॉन केनेडी त्यांच्या विरोधात जोरात जाहिरात करतात. ह्या बाईंची भ्रष्ट्राचाराची प्रकरणे तसेच त्यांनी किती वेळा, कोणत्या विधेयकाच्या बाजूने अथवा विरोधात मतदान केले आहे त्याची आकडेवारी केनेडी आपल्या जाहिरातींमध्ये दाखवतात. त्यांच्या विरोधात लँन्ड्रू बाई, केनेडींनी कितीवेळा पक्ष बदललेला आहे त्याची जंत्री देतात. त्यांच्या जाहिरातीत केनेडींच्या फोटोबरोबर एक रंग बदलणारा शॅमेलियॉन दाखवला आहे.ओबामा-मॅक्-केन ह्यांच्या जाहीराती अश्याच एकमेकांवर चिखलफेक करतात. जाहीरात संपता संपता ही जाहीरात कोण करत आहे हे दिसते , तसेच घाईघाईने सांगितले जाते.( म्युचुअल फंडाच्या जाहीरातीच्या शेवटच्या डिस-क्लेमर प्रमाणे!)


असे असले तरी ह्या आठवडयाअखेरीस ओबामांनी ५०% मतदारांची पसंती मिळवली आहे. मॅक्-केन ह्यांना ३९% पसंती आहे. प्री एलेक्शन ओपिनिअन पोलचे फॅड फार आहे. त्यातील निकालांच्या विश्लेषणाचे दळण मिडीया करत असतो. तसेच त्यावर उमेदवारांचाही विश्वास दिसत आहे. "मॅक्-केन इज अ फायटर, फायटर आल्वेज कम्स बॅक" हे खुद्द मॅक्-केन यांचे ताजे उद्गार ह्याच गोष्टीचे द्योतक आहेत. आघाडीच्या सर्व वृतपत्रांच्या ओपिनिअन पोलमध्ये ओबामाच आघाडीवर आहेत.


आर्थिक मंदीच्या गाळात , रिपब्लीकन पक्षाचे जहाज खोल रुतले आहे. त्यामुळे त्यातून उडया ठोकून तीर गाठणारयांची चढाओढ लागली आहे. अशीच उडी ठोकून, बुशप्रशासनातील माजी परराष्ट्रमंत्री जनरल कॉलिन पॉवेल ह्यांनी सरळ ओबामांचा तीर गाठला आहे. ओबांमाची कँपेन त्यांना "फिनॉमेनल" वाटायला लागली आहे. ते काही असले तरी ओबामांनी कँपेनच्या खर्चासाठी ह्या एका आठवडयात १५ कोटी डॉलर्स मिळवले आहेत.

मॅक्-केन ह्यांनी नुकतीच केलेली, बुशप्रशासनावरची जाहीर टीका, आणि प्रेसिडेंट बुश ह्यांना त्यांनी आपला प्रचार करण्यासाठी नाकारलेली अनुमती दोन गोष्टी पुरेशा बोलक्या आहेत असे मला वाटते. असे असले तरी, इथल्या अनेक विचारवंतांना ओबामांचा ब्रॅडली होणार की काय? अशी भिती वाटते. ब्रॅडली हे लॉस-एंजलिसचे अत्यंत लोकप्रिय, पण कृष्णवर्णीय मेयर होते. ते कॅलिफोर्निआच्या गव्हर्नरपदाच्या निवडणूकीला उभे राहिले होते, तेव्हा त्यांना मतदानपूर्व भरघोस पाठिंबा मिळत होता. तेच जिंकणार अशी परिस्थिती असताना ऐन मतदानाच्यावेळी वर्णभेद उफाळून आल्यामुळे, ते निवडणूक हरले. ही साधारण ३० वर्षांपूर्वीची घटना आता इथे सर्वांना आठवू लगली आहे.

इथला निवडणूक प्रचार पाहून,त्याची भारतातील प्रचाराशी तुलना केली तर, घरोघरी मातीच्याच चुली, ह्या म्हणीची सार्थता पटल्यावाचून रहात नाही.

October 23, 2008

नमनाला तेल !!

अमेरिकेबद्दल अनेकांनी लिहीलं आहे. अनेकांची प्रवासवर्णने आत्तापर्यंत वाचायला उपलब्ध आहेत. असं आसताना मी परत काय लिहू त्याच्या वर ? असा विचार आला मनात.

पण नंतर म्ह्टलं की इथली प्रगती तर माहीत आहेच मग त्याच्याबद्दल, हाय्-स्पीड रेल्वे बद्दल, गुळगुळीत रुंद रस्त्यांबद्दल आणि ऐहिक सुखांबद्दल, परत परत न लिहिता जरा आपण ही अमेरिका थोडी वेगळ्या नजरेतून पाहू, आणि लिहूया जशी दिसली, थोडी ह्टके!!

आजपर्यन्त खादाडीवरचा लेख तुम्ही वाचला असेलच. अमेरिकन व्हॅल्यूजवरचा लेख तर सकाळमधेच वाचला आहे तुम्ही सगळ्यांनी, तो ही टाकलाय इथे.

ह्यापुढे मी ह्या लेखमालेचे ६-७ भाग माझ्या ब्लॉगवर प्रकाशित करेन. मॅड,मॅड अमेरिका ह्या सदरात तुम्ही माझी ही लेखमाला वाचू शकता.आपण ते वाचून मला नक्की प्रतिक्रिया दया!

मराठी अस्मितेबद्दलचा लेख, रोखठोक ह्या सदरात वाचायला मिळेल. माझ्या गावच्या आणि माझ्या लहानपणीच्या आठवणी तुम्ही वाचू शकता, आठवणी दाटतात ह्या सदरात.

लवकरच येत आहे मध्ये ३ विषयांची झलक आहेच, ते मिळतील वाचायला पुढच्या आठवडयात,मॅड,मॅड अमेरिका ह्या लेखमालेत!!