October 23, 2008
अमेरिका म्हणजे फक्त पिझ्झा आणि कोक नव्हे
मी आलो तेव्हा अमेरिकेला नुकताच हरिकेन "आयके'चा तडाखा बसला होता. मला न्यूयॉर्कला उतरून पुढे ह्यूस्टनला जायचं होतं. मुंबईला बोर्डिंगच्या वेळीच सांगितलं होतं, की हवामान खराब असल्याने ह्यूस्टनचं उड्डाण रद्द झाल्यास एअरलाइनतर्फे कोणतीही सोय केली जाणार नाही. न्यूयॉर्कला उतरल्यावर समजलं, की हरिकेनमुळे ह्यूस्टन विमानतळ बंद आहे. लगेच मुंबईतील घोषणा आठवली. मनाशी विचार केला, आठवड्यानंतर आलो तरी चालणार होतं. मुंबईत हे समजल्यावर तरी तिकीट पुढं ढकलायला हवं होतं. असू दे. आता आलोच आहे तर बघू काय होतंय ते, म्हणून एअरलाइनच्या काऊंटरवर चौकशी केली. पहिला धक्का इथंच बसला. एअरलाइनने चक्क न्यूयॉर्कमध्ये दोन दिवस चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली होती! खरं तर तांत्रिक किंवा तत्सम कारणास्तव उड्डाण रद्द झाल्यास एअरलाइनतर्फे सोय केली जाते. पण इथ ते "ग्राहक देवो भव' या उक्तीला जागले. ग्राहक हा राजा असतो, त्याचा अनुभव आला.
दुसऱ्या दिवशी ह्यूस्टन विमानतळ सुरू झाल्याचं समजलं, म्हणून न्यूयॉर्क विमानतळावर गेलो. पाऊण तासानंतर फ्लाइट होती. त्यामुळे बोर्डिंग गेटजवळ गेलो. तिथं घोषणा होत होती, "हरिकेनमुळे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी आयोजित केलेलं हे विशेष उड्डाण असून, ते कॉंटिनेंटलच्या नेहमीच्या वेळापत्रकात समाविष्ट नाही. त्याचप्रमाणे हरिकेनमुळे ह्यूस्टन विमानतळावरील आमचा स्टाफ न्यूयॉर्कला येऊ न शकल्यामुळे हे उड्डाण घेऊन जाण्यासाठी पायलट, को-पायलट, तसेच केबिन क्रू उपलब्ध नाहीत. त्यामुळे उड्डाणाला उशीर होत आहे. आम्ही प्रयत्न करतच आहोत. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व."
मला कॉंटिनेंटल एअरलाइनचा सच्चेपणा आवडला. जे आहे ते सत्य सांगितल्यामुळे तेथे उपस्थित २००-३०० प्रवाशांपैकी कोणीही तक्रारीचा सूर काढला नाही.
पुढे ह्यूस्टनमार्गे लुईझिआनामधील रस्टन येथे आलो. उतरल्यावर पाहिलं तर काय, माझं लगेज आलंच नव्हतं. कॉंटिनेंटलच्या काऊंटरवर क्लेमफॉर्म भरला. तेथील सुंदरीने बऱ्याच वेळा "सॉरी, सॉरी' म्हणत सांगितलं, की हरिकेनमुळे त्यांच्या सेवेवर परिणाम झाला असून, बराच स्टाफ ह्यूस्टनला कामावर येऊ शकलेला नाही. त्यामुळे ह्यूस्टनहून जे विमान मला घेऊन निघालं, त्यात माझं लगेज चढवलं गेलं नाही. सुंदरीने सांगितलं, की लगेज मिळण्यास २-३ दिवस तरी लागतील. तसं बघितलं तर सर्व कपड्यांचा एक संच हातातल्या बॅगेत ठेवला होता. त्यामुळे दोन-तीन दिवस काढायला हरकत नव्हती; पण एअरलाइनतर्फे मला एक नित्योपयोगी वस्तूंचे किट दिल्यावरच तिचं समाधान झालं.
तिने दोन-तीन दिवस म्हणून सांगितलं खरं, पण खरोखरच दोन दिवसांनंतर लगेज घेऊन कुरिअरचा माणूस घरी हजर! आल्यावर एकच प्रश्न, ""यू, कॅपिल?'' मी हो म्हणताच कोणतेही ओळखपत्राचे सोपस्कार न करता लगेज माझ्या हवाली! समोरच्यावर विश्वास दाखवला, तर सगळ्याच गोष्टी सोप्या होतात त्या अशा. पण एवढाही विश्वास बरा नाही, असं मनाशी म्हणत लगेज ताब्यात घेतलं.
आता काम सुरू करून तीन आठवडे झाले. थोडासा उष्णतेचा त्रास सुरू झाला. अंगावर फोड आले. ऑफिसमध्येच ताप आला. त्यामुळे डॉक्टरचा शोध सुरू केला. जवळच्या डॉक्टरकडे दोन आठवडे बुकिंग म्हणून "वॉक-इन' क्लिनिक (वॉक-इन क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंटची गरज नसते. नावाप्रमाणे जस्ट वॉक-इन!)ची चौकशी केली. आता ही बातमी कानावर जाऊन कंपनीची एच.आर. हेड ब्रेंडा रॉबिन्सन माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, ""माझ्याकडेच का नाही आलास थेट? आता चल, मी तुला घेऊन जाते वॉक-इन क्लिनिकमध्ये.'' असं म्हणून ती मला स्वतःच्या गाडीत घालून घेऊनसुद्धा गेली.
क्लिनिकमध्ये ती माझ्यासोबत माझा नंबर लागेपर्यंत तासभर आपलं काम सोडून बसली. हे कमी म्हणून की काय, डॉक्टरनी लिहून दिलेली औषधं जाता जाता वॉल-मार्टमधून घेऊन जाण्याचा आग्रहसुद्धा तिने केला. वॉल-मार्टमध्ये प्रिस्क्रिप्शन "ड्रॉप' केल्यापासून औषधं मिळेपर्यंत अर्धा तास गेला. तोपर्यंत ब्रेंडा माझ्याबरोबरच! औषधं घेऊन मला घरी सोडेपर्यंत संध्याकाळचे साडेसात वाजले. आता हिला "थॅंक्यू' तरी कसं म्हणावं, या विचारात मी असताना ब्रेंडा मला म्हणते कशी, ""तू आता औषधं घे आणि दोन दिवसांत नेहमीप्रमाणे उत्साहात कामावर ये पाहू. तुझ्या "थॅंक्यू'पेक्षा तू बरा होणं हेच माझ्यासाठी मोठं आहे, माय सन! तुझी आई नसती का आली तुझ्याबरोबर?''
कंपनीची एच.आर. हेड हजारो मैलांवरून आलेल्या एक नवीन, अनोळखी स्टाफसाठी आपला एवढा वेळ खर्च करते, याचं मला कितीतरी कौतुक वाटत राहिलं.
हा देश प्रगत असण्याचं कारण तांत्रिक प्रगती तर आहेच, पण इथल्या माणसांची मानसिकता, त्यांचा सच्चेपणा आणि दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्तीसुद्धा आहे. हा समाज परस्परांवरच्या विश्वासावर चालतो.
आता मला आलेल्या अनुभवांकडे दुसऱ्या नजरेतूनही पाहता येईल; पण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. असं म्हणतात ना, की "द वर्ल्ड इज द मिरर फॉर यू. द वर्ल्ड लुक्स ऍट यू, इन द सेम वे, यू लुक ऍट द वर्ल्ड.' माझ्या आधीच्या कंपनीतील बॉस म्हणायचा, ""हॅप्पी पीपल गेट हॅप्पी एक्स्पिरिअन्सेस.''
काही वर्षांपूर्वी अंतर्नाद चे संपादक भानू काळे यांनी एका लेखात एक अमेरिकन कोट्याधीश एका बेकार तरुणाला मदत करुन, त्याला आपला धंदा सुरु करण्यास कशी मदत करतो, ते सांगून, अमेरिकन व्हॅल्यूज ची चर्चा केली होती. लेख संपवताना त्यांनी म्हटलं होतं की, "अमेरिका म्हणजे फक्त पिझ्झा आणि कोक नव्हे." त्या वेळी ते काही तितकंसं पटलं नव्हतं मनाला.
पण आज ग्राहकाप्रती सच्ची, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारी, परस्परांवर विश्वास ठेवणारी अमेरिकन माणसं अनुभवल्यानंतर मीसुद्धा म्हणेन!
अमेरिका म्हणजे फक्त पिझ्झा आणि कोक नव्हे."
अमेरिकेतील खादययात्रा!! भाग-१
तर असो! मी काय सांगत होतो, मेडीयम वेजीपिझ्झा ऑर्डर केला. त्याच्याबरोबर गार्लिक ब्रेड, चीज डीप आणि सलाड. ऑर्डर सर्व्ह होईपर्यन्त माउंटन ड्यू घेतले. ते वर सांगितल्याप्रमाणे आले-निम्मा ग्लास आईसक्युब्ज घालून! मित्राशी गप्पा मारताना पहिला ग्लास संपवला. म्हणून दुसरा ग्लास आणू का, असं विचारयला आलेल्या वेट्रेसला म्हटलं की "येस, प्लीज रीफील, बट विदाउट आईसक्युब्ज" कुठ्च्या परग्रहावरुन आलाय हा प्राणी, असे भाव चेहर्यावर आणत तिने दुसरं ग्लास आणून ठेवला.सॉफ्ट ड्रींक विदाउट आईसक्युब्ज हे काही तिला पचनी पडलेलं दिसलेलं नव्हतं.
पण आता आलेला मेडीयम वेजीपिझ्झा पाहून आम्ही दोघेही हादरलो, त्या सहा तुकड्यांपैकी दोघात कसेबसे चार संपले. बहुतेक दोन ग्लास माउंटन डयू चा परिणाम असावा.त्या स्मॉल पोर्शन गार्लिक ब्रेडकडे पाहून वाटलं की हा स्मॉल तर लार्ज केव्हढा असेल? त्त्याच्यासोबत असेलेले चीज हे डीप करण्यासाठी होतं की चमच्याने खाण्यासाठी ते कळेना! दोन माणसांसाठीचे सलाड म्हणजे आम्हा दोघांना आठवडयाची पालेभाजी झाली असती.
शेवटी होईल तेव्हढे संपवून बाकीचे पॅक करुन घेऊन आम्ही निघालो.पण बाकी सर्व टेबलांवर यथेछ खादाडी सुरु होती. ग्लासावर ग्लास सॉफ्ट ड्रींक कुरुम, कुरुम आवाज करत रिचवली जात होती. चिकन सलाड, टुना आणि सलमॉन माश्याचे सलाड, टर्कीब्रेस्ट, बीफस्टीक, लार्ज पिझ्झे, लार्ज गार्लिक ब्रेड विथ चीज डीप आरामात संपत होते. आसपासची अमेरिकन माणस डीनरांनंदात तल्लीन झाली होती!!
इथे खाण्याचे सगळेच प्रकार किंगसाईझ!! तयार फ्रोझन फूड असूदे, किंवा दही , दूध चीज असूदे. सगळ्याचं पॅकिंग मोठं मिळणार. दूध लिटरमधे नाही मिळत, एक किंवा अर्धा गॅलन मिळतो ( १ गॅलन= ३.७८ लिटर!!) दह्याचा, सँडविच स्प्रेडचा, पी-नट किंवा आलमंड बटरचा, चीजचा,पॅक कमीतकमी २ पौंडी( म्हणजे साधारण १ किलो). ब्रेडचा लोफ सुद्धा दिड पौंडी. सफरचंद, पीचेस, प्लम फ्रूट्स,पीअर,वाटरमेलन,पम्प्कीन काहीही घ्या ३पौंडी आकर्षक भरलेल्या पिशव्या मिळतील, लूजपण मिळतात. छोटया भोपळ्याएव्हढा टोमॅटो बघायला मिळेल. कांदे- बटाटे बचक्यात बसणार नाहीत-एकाचं वजन असेल अर्धा पौंड! वेफर्सची पाकीटं सुद्धा अशीच प्रचंड. कॉर्न ऑइलची, ऑलिव्ह ऑइलची बाटली कपाटात सहसा न मावणारी! महात्मा ब्रॅन्ड तांदूळ मिळेल १०पौंडी पॅकमधे. विश्वास बसत नाही . फोटो पहा.
आटयाचे कितीप्रकार सांगू? ब्लीच्ड आटा, स्टोन ग्राउंड आटा( म्हणजे काही प्रक्रिया न- करता, आपल्या चक्कीवर मिळतो तसा!!) ऑल्-परपज आटा,कॉर्न्-मील( मक्याचा प्रकार) ओट-मील घ्याल तेव्ह्ढे !!
मांसाहारींसाठी तर इथे स्वर्ग आहे. पोर्क,मटण, लॅम्ब, बीफ, चिकन, बेकन, टर्की ( बदक?) , कोळंबी, लॉबस्टर, टुना आणि सलमान फीश (खान नव्हे) चे विविध प्रकार दिसतील, किसलेले लांब शेवयांसारखे बीफ, कणकीच्या गोळ्यासारखे बीफ, जाडसर काप काढून ठेवलेले बीफ मिळेल, पापडाची लाटी करायच्या आधी आपण जशी लांब गुडाळी करतो तशी लांब गुंडाळी केलेले बीफ तर फूटावर मिळते. म्हणजे पॅकच्या बाहेर किती फूट लांब गुंडाळी ते लिहिलेले असते. बहुधा अश्या गुंडाळ्यांचे डायमीटर सगळीकडे सारखे असावेत!!
पोर्कच्या चरबीत तळलेल्या वेफर्स आणि चिकनच्या चरबीतील बिस्किटे हा इथला हीट आयटेम आहे. बहूतेक वेळा हे दोन्ही पदार्थ आउट ऑफ स्टॉक असल्याचे बोर्ड लागलेले दिसतात.
हे सगळं वाचून ह्या पॄथ्वीतलावर चार पायांवर चालणारे कोणतेही प्राणी इथे खायला उपलब्ध असतात की काय अशी शंका आल्यास ते वावगे नाही.
असं असेल तर शाकाहारींनी खायचं तरी काय?... नाराज नका होऊ, वाचा भाग-२ नमुन्यादाखल फोटो इथे दिले आहेतच. अजून फोटो बघण्यासाठी भेट द्या माझ्या पिकासा वेब अल्बमला.
अमेरिकेतील खादययात्रा!! भाग-२
मग हे सगळं घेऊन स्वयंपाक करायचा तर कांदा- लसूण पेस्ट? ती सुद्धा आहे. त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. लसणीची बारीक पूड मिळेल, तसेच लसणीचे क्युब्ज मिळतील( क्यूब्ज करण्याइतपत जाड पाकळी असते लसणीची!!) कांदयाचे ग्रॅन्यूल्स आवडतात की पावडर? ते ही आहेत. कांदा- लसूण पेस्ट बरोबर, आलं घालून मिळालं तर काय बहार येइल ? नाराज नका होऊ ते ही मिळेल. टोमॅटोचे किती प्रकार? डाईस्ड(काप केलेला),मिन्स्ड(छोटे गोळे केलेला),बॉईल्डपील्ड-व्होल,( उकडून सोललेला पण अख्खा!!) प्युरी आणि पेस्ट. एक ना अनेक, दम लागेल, बेताने वाचा.
आणि मग मसाल्यांचं काय हो? प्रवीणचे मसाले आहेत ( पण किंमत बघून, ५० ने गुणून झालं की पाकीट परत कपाटात आपसूकच जाईल) पण म्हणून काय झालं? वेस्ट इंडीज आणि मेक्सिकोहून आलेले मसाले घ्या ना.!! दालचिनी, तमालपत्र, पांढरी मिरी, काळी मिरी, धने,जिरं,मोहरी, मेथी संकेश्वरी मिरचीच्या तोडीसतोड लाल मिरची एव्हढं कमी म्हणून की काय दगडफूल सुद्धा आहे.
आता एव्हढं सगळं चांगलं-चुंगलं हादडल्यावर स्वीट डीश हवी ना? का नाही? विविध आईस्क्रीम्स आहेत. त्यातही ब्लॅक फॉरेस्ट, वालनट- आलमंड, ड्राय्-फ्रूट, फ्रेश- फ्रूट असे तोंडाला पाणी सोडणारे प्रकार आहेत. अट एव्हढीच की कमीत कमी २पौंडी पॅक मिळेल, जास्तीत जास्त १०पौंडापर्यंत. इथे पहिल्यांदा आईस्क्रीम्स टब असे का म्हणतात असा प्रश्न पडला होता. पण ते आपल्याकडच्या ऑईलपेंट्च्या प्लॅस्टीकच्या डब्यांएवढे आईस्क्रीम्सचे कंटेनर पाहून टब ह्या नावाव्यतिरिक्त दुसरं कोणतंही नाव त्याला शोभून दिसणार नाही याची खात्री होते.
इथल्या चॉकलेट्सबद्दल मी काय सांगावं? केक आणि पेस्ट्रीजची रेलचेल असते. हलोविनसाठी भोपळ्याचा केक मला आपल्या दसर्याच्या भोपळ्याच्या घारग्यांची आठवण करुन गेला. आगेमागे येणारे दोन्ही सण भोपळ्याशिवाय साजरे नाही होत. चॉकलेट फज केक,चीज केक, प्लम फ्रूट् केक, ब्लॅक फॉरेस्ट,स्ट्रॉबेरी, रास्पेरी केक, ऑरेंज्-ब्लॅक ग्रेप केक, अशा नानाविध प्रकारांबरोबरच तेव्ह्ढीच नवलाईची मूज मिळतात- मॅगो, पायनापल चॉकलेट ह्या आपल्याकडे उपलब्ध असणार्या मूजबरोबरच, मी इथे किवी, ग्रेप आणि क्रॅनबेरीचे मूज अवश्य खातो. मूज म्हणजे आईस्क्रीमही नाही आणि केकही नाही असा अर्धवट प्रकार. पण तो मूज केक नको हं फक्त मूज आहे का ते पहा.
विविध प्रकारच्या फळांचे रस मिळतील अगदी आपल्या आंबा, संत्र्यापासून ते किवी, लिची, स्ट्रॉबेरी, रास्पेरी,क्रॅनबेरीच्या रसापर्यन्त. ही सगळी फळं- डाईस्ड( काप काढलेली) मिळतील, टीनपॅक करुन. फोडून खाल्ला की दिला फेकून. तशी नकोत तर फ्रेशली कट ह्या प्रकारात घ्या की!!
अमेरिकेत खादाडीला फुल्ल स्कोप आहे बरं का भाऊ, फक्त तुमची नजर हवी आणि काही दिवस आपल्या नेहमीच्या डायेटमधे बदल करुन हे सगळं एक-एकदा तरी ट्राय करुन बघायची हौस!!
(नमुन्यादाखल फोटो इथे दिले आहेतच. अजून फोटो बघण्यासाठी भेट द्या माझ्या पिकासा वेब अल्बमला)
October 22, 2008
माझा गाव आणि माझे लहानपण-भाग-१
हायवे वरून झोकदार वळण घेऊन गाडी खाली उताराला लागली की समोर आमची शाळा लागते. आणि तेव्हा आमचं गाव सुरु होतं- खारेपाटण. शाळेजवळून पुढे गेलात तर "राऊतांची विहिर" दिसते. आमच्या लहानपणी तिथे एक विचित्रपणे वाढलेला माड होता. विचित्र अशासाठी की सरळसोट वाढून तो अचानक वळण घेता झाला होता. त्यामुले तो एखादा विळा/कोयता उभा करुन ठेवल्यासारखा दिसे! ती आमच्या शाळेजवळची राऊतवाडी, विहिरीवर पाणी भरणार्या बायका, त्यांच्या गप्पा,त्यांचे कपडे धुताना येणारे फट- फट असे लयबद्ध आवाज, काढण्याने पाणी काढून, कळशीत ओतताना होणारा तो विशिष्ट नाद, आणि ह्या सगळ्याचा एकत्रित होणारा परिणाम , मी अजूनही तसाच जपून ठेवला आहे मनाच्या तळाशी!
विहीरीकडून पुढे गावात निघालो की डाव्या हाताला थोडं लांबवर राणे डॉक्टरांच्या दवाखान्याकडे नजर जाते. . लहान असताना त्यांच्या दवाखान्यात बघितलेले त्यांचे पदवीदानाचे फोटो, त्यांच्या बॅचचे फोटो अजून आठवतात. तेव्हा तर त्यांच्या दवाखान्यातील, पेशंटाना बसण्याच्या खोलीत भिंतीवर लावलेले शरीराच्या विविध भागांचे क्रॉस्-सेक्शन्स, विशेषतः मानवी जबड्याचा कुण्या फिरंगी चित्रकाराने काढलेला सेक्शन,त्यातील ती पिंग्या-सोनेरी केसांची मुलगी, आयुष्यात पहिल्यांदाच बघितलेली ती फिरंगी रंगसंगती, जुनी शिसवी लाकडाची,हात ठेवण्याची जागा गोल केलेली बाकं, काचेच्या बाटलीतून, बाहेर मापाची कागदी पट्टी लावून मिळणारं लाल औषध, आणि " काय गे, आपली बाटली येताना घेऊन येवक काय झाला?" असे लटकेच राग भरणारा कंपाऊंडर,- सगळं अजून जसच्या तसं आठवतं. विशेष म्हणजे आजही त्यांचा दवाखाना आहे तसा , त्यांच्या पुढील पिढीने जपलाय!!
रस्त्याच्या दुतर्फा असणारे भाताचे मळे आणि उजव्या अंगाला दिसते ती खडकवाडी, इथल्या देवस्थळींच आमच्या गावात मेडिकल दुकान आहे. तेव्हा त्यांच्याकडे कधीही गेलं तरी आल्याची गोळी हातावर मिळायचीच. आपल्याकडे एखादे औषध नसल्यावर ते आजोबा, थोडं इकडे-तिकडे बघून म्हणायचे " अमॄतांजन,?अमॄतांजन,अमॄतांजन,अमॄतांजन नाsssहीsss. म्हणजे कसं गिर्हाईकलाही समाधान वाटायचं की एवढं शोधून देखील आपल्याला हवंय ते औषध नाही बुवा मिळत. "लर्न द आर्ट ऑफ सेयीन्ग नो" चे धडे मी आज शिकतो, पण ती कला त्या देवस्थळीआजोबांना तेव्हाच अवगत होती!!
केदारेश्वराच्या मंदिराजवळून पुढे गेल्यावर एस्.टी स्टँड. तिथला आमचा अकबर पेपरवाला, त्याची त्याच्या भावाबरोबर पेपरविक्रीवरुन होणारी भाडणं आणि आजूबाजूच्या स्टाँल्सवरून येणारा कांदाभज्यांचा घमघमाट हे दोन गोष्टीं अजूनही आहेत. स्टँडशेजारच्या तॄप्ती कोल्ड्रींक हाऊसमधे तेव्हा मिळणार्या लस्सीची चव आणि दर्जा अजूनही आहे तसाच. पण तिथला तो गोटी सोडा फोडताना येणारा आवाज आता मात्र येत नाही कारण गोटी सोड्याची जागा आता आधुनिक कोला आणि पेप्सीने घेतली आहे.
इथून गावाची बाजारपेठ सुरु होते. बाजरपेठेतील लाल मातीच्या रस्त्यावर, धूळ उडू नये म्हणून , सपासप पाणी मारणारे व्यापारी बघत पुढे निघालं की, डाव्या बाजूला एक चप्पलांचं दुकान दिसतं. मी लहान असताना म्हणजे १९८०-८२ साली ते दुकान, भारत-पाकिस्तान फाळणीतून आमच्या गावी आलेल्या एका सिंधी कुटुंबाने सुरु केलं. त्यांच्यासमोर तळगांवकरांचं दुकान, पानाच्या करंडीवर पाणी मारत, एका हाताने ते देठाच्या बाजुने खायची पाने अशी सफाईने मोजत. त्यानंतर त्या पानांची उभी गुंडाळी करून त्याला बारीक धागा बांधून देत असत. इतका वेळ त्यांच्या दुकानासमोर उभे राहिलात की तंबाखूचा उग्र नी तिखट गंध तुमचा नाकात घुसलाच समजा!! असोली सुपारी, सुपारी खंड आणी पूजेला लागणारी अख्खी सुपारी त्यांच्याचकडे मिळायची.
माझा गाव आणि माझे लहानपण- भाग-२
बाजारपेठेत विष्णूमंदिराच्या आसपास सगळी, कावळे, ब्रम्हदंडे, उन्हाळकर ह्या जैन मंडळींची दुकानं. तिथे असणार्या तिरफळ आणि काजू बियांच्या दरवळातून पोस्टापर्यंत जातोय न जातोय तर आपली तंद्री भंग पावायची ती तालबद्ध ठोक्यांच्या आवाजाने. कुठून यायचा बरं हा आवाज?
जरासं पुढे , माझा मित्र समीरच्या वडिलांचं भांडयांचं दुकान होतं. स्टेनलेस स्टील, पितळ, तांब्याची विविध भांडी आकर्षकपणे मांडून ठेवलेली असत. आता भांडी- पातेली आकाराने मोठी , म्हणून ती मावतील असा लाकडी फळ्या व साखळ्यांचा बनवलेला, एक तागडी २ फूट बाय २ फूट असेल, असा तराजू लक्ष वेधून घ्यायचा. त्यांच्या दुकानात पाठीमागे एक कारागीर बसायचा. त्याच्यासमोर एक लोखंडी खुंटा असायचा, त्या खुंट्यावर एखादा पितळी,किंवा तांब्याचा हंडा उपडा ( म्हणजे त्याचे तोंड खाली) करून , त्या हंड्यावर ठोक्याची नक्षी काढायचे काम तो कारागीर अगदी तल्लीन होऊन करायचा. त्याच ठोक्यांचा तो नाद, एखाद्या तबलजीने तबला वाजवावा तसा आसमंतात भरून राही.दुसरं महत्वाचं आकर्षण म्हणजे खरेदी केलेल्या भांड्यावर मशीनने नांव घालतानाचा आवाज!! ण्टर्र्,ण्ट्र,ण्टर्र्,ण्ट्रण्टर्र्,ण्ट्र आणि शेवाटी थांबताना एक दीर्घ ण्टर्रर्रर्रर्र.
समीरच्या दुकानासमोर, डॉ. सोमणांचे घर. माझे वडिल त्यांच्याकडे रहयला होते, शिकताना. त्यामुळे बाजारात गेलो कि सोमणांकडे गेल्याशिवाय काही आम्ही परत जात नसू. ते होते मिलिट्रीत कर्नल, तिकडून रिटायर होऊन गावाला आलेले. त्यामुळे सोमणआज्जींकडे विविध पदार्थ असायचे. माईन मुळ्याचं लोणचं, दाल-बाटी आणि पॅशन्-फ्रूटचे सरबत (त्यांनी पॅशन्-फ्रूटचे एक झाड लावलं होतं) असे त्यवेळी अनवट असलेले पदार्थ सोमणआज्जींकडे चाखायला मिळायचे.अजून थोडं चालल्यावर, धाक्रसांचा वाडा लागायचा, त्याला भव्य दिंडी दरवाजा होता.
तिथून पुढे सुरु व्हायची ती, ढेकणे, पिसे आणि गाठे ह्यांची कापड दुकाने. "घ्या हो, अगदी ब्राम्हणी वाण आहे हो, तुम्हाला छान दिसेल"असं मिठ्ठास बोलत आपण आत गेल्यागेल्या विविध लाईट्स सुरु करणरे विनायकराव पिसे म्हणयचे कि "बघा , एकच वाण आहे हो, असा दुसरा नग नाही, जणू काही तुमच्या साठीच आणला आहे' एव्हढं गोड बोलल्यावर तुम्ही नाही म्हणूच कसे शकता?
तिथून वरती घाटी चढून गेल्यावर आपण पोचतो ते किल्ल्यावर. इथे शिवाजी राजांनी राजापूरच्या दोन डचांना पकडून कैदेत ठेवलं होतं. किल्ल्यावर शिवकालीन भवानी मंदिर आहे. तिथे दसर्याला, गाव पारध झाली की मारलेल्या रान डुक्कराच नेवैद्य दाखवला जातो. गाव पारध म्हणजे दसर्याच्या दरम्यान कापणीला आलेल्या भातशेतीची नासडी करणार्या रान डुक्करांना मारणे. दसर्याला किल्ल्यावर पतंग उडावण्याचा कार्यक्रम असे. किल्ल्यावर उभं राहून समोर साजराबाईची त्रिकोणी टेकडी दिसायची. आपला पतंग अगदी त्या टेकडीपर्यंत जावा असं वाटायचं. दसर्याला गुरवाने आपट्याची पाने खड्सून ( झाडावर चढून फांद्या खाली कापून टाकणे) टाकली की त्यातील सोने लुटायला ही झुंबड उडायची.