November 1, 2008

लंच टाईम आणि डब्बा ग्रूप - भाग १

मी कामाला जाताना डबा न्यायला लागलो, त्याला आता १२ वर्षे होउन गेली. शाळा, कॉलेज घराजवळ होते , त्यामुळे, मधल्या सुट्टीत, घरी जेवायला येत होतो. नंतर इंजिनिअरींगला असताना, कॉलेज मेस आणि हॉस्टेल एकाच कॅम्पसमध्ये असल्यामुळे, तिथेही डब्याचा संबंध आला नाही.

पुण्याला,जॉब सुरु केल्यावर,डबा सुरु झाला. बॅचलर असताना, आमच्या कंपनीत एक डबेवाला यायचा. त्याचा डबा असायचा छान, पण अगदीच कमी पडायचा. त्याला आम्ही, "काय भोसले आज वाटाण्याच्या उसळीत फक्त २५ वाटाणे होते, तिसरया घासाला पोळी संपली” असं खुलेआम चिडवलं तरी त्याची क्वांटीटी काही वाढायची नाही. डब्याचे पैसे मात्र वेळेवर घ्यायला यायचा. पुढच्या आठवड्याचे ऍडव्हान्स द्याल? अशी ओशाळी विनंती सुद्धा तो करत असे. घोडयांच्या रेसचा त्याला भारी नाद. त्याची बायको पुढे पुढे पैसे जमा करायला लागली होती. पण त्याचा डबा बंद करुन लवकरच,मी आमच्या मेसच्या बीडकर काकूंकडून डबा घेउन जाण्यास सुरुवात केली. अगदी घरगुती पद्धतीच्या डब्यामुळे दुपारी जेवण्याची छान सोय झाली होती.

तेव्हा, माझ्या पहिल्याच जॉबमध्ये( म्हणजे ऍडॉर सामिया) लंच ब्रेकला डबा खाणे, म्हणजे एक माहोल असायचा. एका मोठया टेबलावर आम्ही दहा-पंधरा जण जमत असू. त्यामुळे विविध पद्धतीने केलेल्या भाज्या, उपलब्ध असत. फ़्रान्सिसला त्याने आणलेली अप्पम किंवा इडली मिळायची नाही आणि यादवभय्याला त्याच्या डब्यातील करेला.मिलिंद आणि आनंदच्या डब्यातील, साखरांबा-तूप बघून, आपल्या डब्यात कधी येणार असा विचार येउन जायचा. बरेच कलीग्स बॅचलर होते, त्यामुळे जसे दिवस जाउ लागले तसे डबा, बनवणारी व्यक्ती बदलत गेली. एखाद्याचं लग्न झाल्यावर, तो डबा कसा आणतो ह्याकडे सगळ्यांचं लक्ष असायचं. त्यामुळे बायकोच्या हातचा डबा आणि, आईच्या हातचा डबा ह्यातील फरक बरयाच जणांना समजू लागला. आपल्याला मिळणारा “नवीन” डबा, आता त्या “जुन्या” उंचीला कधी जाउन पोचणार , हा विचार त्या “ डबा-डिमोटेड” मित्रांच्या मनात येत असेल. पण मेस किंवा डबेवाल्याकडून , बायकोच्या हातचा डबा मिळू लागलेल्या नवविवाहितांसाठी मात्र ते “प्रमोशन” असायचं.

पण दिवसभराचं स्ट्रॆस घालवण्याचं ठिकाण ,म्हणजे लंच टाइम असे. जेवताना क्रिकेट, राजकारण, ऑफिस गॉसिप, लोकल घडामोडी, बॉलिवूड, असे नानाविध विषय जेवणाबरोबर तेवढ्याच चवीने चघळले जात. एखाद्याला एखाद्या दिवशी टार्गेट करुन, त्याची यथेच्छ खेचली जायची. तो अर्धा तास म्हणजे आमची रिचार्जींग बे होती. उरलेला वेळ काम करण्याची मानसिक क्षमता, तो अर्धा तास देउन जायचा.

ऍडॉर सामियामध्ये एक सेल्स इंजिनिअर होती. ती अगदी टीपीकल सेल्स इंजिनिअर होती. म्हणजे तिचे व्यक्तीमत्व जेव्हढे आकर्षक होते, त्याला साजेसा तिच्याकडे ड्रेसिंग सेन्स होता.त्यामुळे तिची प्रेझेंटेशन्स “बघणेबल” असायची. कंपनीचा सेल्स मॅनेजर तिच्याबरोबर सेल्सप्लॅन्स करत असायचा आणि ऑपरेशन्स मॅनेजरला सेल्सप्लॅन्स बरोबर एक्झेक्यूशन प्लॅन फाइन-ट्यून करण्यासाठी तिचीच गरज भासायची. आता डब्याच्या विषयात हे इतकं विस्ताराने सांगायचा उद्देश म्हणजे, ती रोज मला तिच्या डब्यात, न चुकता, काहीतरी स्वीट आणायचीच. ते मलाच देण्यासाठी, टेबलावर ती आधी आल्यास, ती माझ्यासाठी तिच्याशेजारची खुर्ची धरुन ठेवायची. मी आधी आलो तर, मी ही तसेच करत असे. पुढे-पुढे ही गोष्ट बाकी सगळ्यांच्या लक्षात आल्यावर, मोठया मनाने(!) कुणी माझ्या किंवा तिच्या शेजारी बसत नसे. पण लंच नंतर मात्र, अरे कपिल, तू एक तर गोरा घारा,चिकना चुपडा, तुला गोडधोड खायला घालून बकरयासारखा माजलास की, एखादया इदला हलाल करेल ती, सांभाळ बाबा! असा प्रेमळ सल्ला मिळत असे.

काही वर्षांनी, आमचा ऍडॉर सामियामधील डब्बा ग्रूप पंधरावरुन पाच वर आला , तेव्हा मी तो जॉब सोडून, थर्मॅक्स मध्ये गेलो. …..
क्रमश:

लंच टाईम आणि डब्बा ग्रूप- भाग २

तिथे मी नवीनच होतो. पण काम एव्हढे प्रचंड होते की, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करुन माझा असा नवीन डब्बा ग्रूप कधी बनला तेच समजलं नाही. थर्मॅक्स जॉइन केल्यावर मी सुरुवातीच्या दिवसांत बरेच, रिव्हॅम्प आणि ऑगमेंटेशनचे प्रोजेक्टस केले. माझी जबाबदारी डिझाइन- इंजिनिअरिंगची असल्यामुळे, मी खूपवेळा साइट्सवर जात असे. ज्यात सुधारणा करायची आहे, ते बघितल्याशिवाय त्याचा अंदाज येत नसे. साइट्सवर जाउन जाउन, आमच्या कमिशनींग आणि कन्स्ट्र्कशन इंजिनिअरांशी माझे चांगले संबंध प्रस्थापित झाले. त्यांचा फिडबॅक आणि सूचना, रिव्हॅम्प आणि ऑगमेंटेशन जॉबच्या डिझाइनमध्ये मला यश देउन जायच्या. त्यात मलाही शिकायला भरपूर मिळायचं, पण अश्या ह्या अनोख्या दोस्तान्यामुळे, हे कमिशनींग आणि कन्स्ट्र्कशन इंजिनिअर्स ऑफिसमध्ये आले की, माझ्याबरोबरच डबा खात. दिवसेंदिवस साइटवर पडीक राहिल्यामुळे घरचा डबा खायचं समाधान त्यांना फार कमी दिवस मिळायचं, एक साइट संपली, की दुसरी वाटच बघत असे. घरच्या डब्याचं ते समाधान त्यांच्या चेहरयावर दिसायचं. मी, बाबर, गिरीश, भोइटे, मनोज आणि श्रीवास्तव असा आमचा तो डबा ग्रूप होता. ह्यातील कोणीना कोणी माझ्याबरोबर नक्की असे. फार क्वचीत एकटयाला जेवायला लागायचं.

थर्मॅक्स मध्येही लंच टाइम म्हणजे स्ट्रेस रिलीवींग टाइम असायचा. विविध विषयांवर चर्चा होत असे. तिथे असताना बाबरच्या डब्यातील भाजी खाल्ली की मला थेट आठवण यायची ती, मी लहान असताना, शेजारच्या गुरुप्रसादगोळांकडे खाल्लेल्या भाजीची. मूळच्या कराडच्या बाबर आणि गुरुप्रसादगोळांकडे मसाला सुद्धा एकाच पद्धतीचा कसा काय ह्याचं आश्चर्य वाटायचं. भोइटेंच्या डब्यातील साखरेच्या पाकातील रताळ्याचे काप, श्रीवास्तवकडचे “मूली और गज्जर का सलाड” अजूनही आठवतात. श्रीवास्तवकडचे जेवण जरा तिखट असायचे. त्याबद्दल विचारल्यावर, श्रीवास्तव “उसमे तेजपत्ता, धनिया और बहोत सारे मसाले डलते है भई” असे खास त्याच्या लखनवी अंदाजमध्ये सांगायचा. थर्मॅक्स मध्ये जायच्या आधीपासून माझा डबा, मेस ते बायकोच्या हातचा असा प्रमोट झाला होता. माझ्या डब्यातील रोजच्या तूप-साखरेवर किंवा आटीव आमरसावर मात्र सगळ्यांचा डोळा असायचा.

लंच झाल्यानंतर, मी माझ्या टीममध्ये काम करणारया, माझ्या ड्राफ्ट्समन मित्रांबरोबर टपरीवर जात असे. तिथे उन्हाळ्यात फ़्रूट डिश, ताक किंवा लस्सी पिण्याचा कार्यक्रम पार पडायचा. हिवाळ्यात मला हटकून सर्दी झाली की, शेख आणि जाधव मला एखादी गुडंग गरम ओढायचा आग्रह करत. त्याने ही सर्दी गेली नाही, तर मात्र एक डोळा बारीक करत, एक हात दुसरया हाताच्या तळव्याला लावून, आता “ह्याच्या” शिवाय पर्याय नाही असं ते मला सांगायचे.

जरी मी त्यांचा टीम लीड होतो तरी त्यांच्याबरोबर लंच टाईममध्ये मिसळल्यामुळे त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. त्यांच्याशी ह्याआधी एवढं मिसळून कोणी वागलंच नव्हतं, मी त्यांच्यापेक्षा अनुभव आणि वयाने लहान होतो त्यामुळे सुरुवातीला "अशा साहेबाला" सामावून घेणं त्यांना कठीण जात असे. पण काही दिवसातच आमची छान गट्टी जमली. त्या लंचटाईम टपरी मिटींगमधून एक खरंखुरं टीम बिल्डींग कोणतंही विशेष ट्रेनींग न घेता आम्ही सगळे नकळत करत होतो. कामातही मला ते उत्तम सहकार्य देउ लागले.माझ्या टीमच्या कमीटमेंट्स नेहमी पाळल्या जाउ लागल्या.त्या आगळया टीम-स्पिरीट (!) मुळे रिव्हॅम्प आणि ऑगमेंटेशनचे डिझाइन सोडा, ग्रीन फिल्ड जॉब्सही यशस्वी पणे पार पडू लागले. बॉसने एका ऍप्रायझलमध्ये ह्या गोष्टीचा उल्लेखही केला.

नंतर नंतर, मी, सुहास नातू ,सुहास जोगळेकर, सोमवंशी, कल्लू कलावडे, प्रफुल्ल आणि निलेश असा डबा खाल्ल्यानंतरचा टपरीग्रूप स्थापन झाला होता. हया आमच्या ग्रूपमध्ये कंपनीतील सगळ्या डिपार्टमेंट्सधील एक एक जण असल्यामुळे, कुठे काय चालू आहे आणि हवा कुठच्या दिशेने वाहत आहे, ह्याची डिटेल्ड माहिती तिथे मिळायची. त्यामुळे नंतर होणारया रिव्ह्यू मिटींगची स्ट्रॅटेजी ठरवायला, तिथले इनपुट्स मदत करत!! आमच्या ह्या टपरीवरच्या इलाइट ग्रूपची मेंबरशीप, सहसा कुणाला मिळायची नाही. इथेच सुहास जोगळेकरांचे गुंतवणूक आणी शेअर बाजाराचे मौलिक मार्गदर्शन होत असे. जवळच असणारया कॉल सेंटरची शिफ्ट दिड वाजता संपून "ती क्राउड" इंडिका किंवा सुमो स्वार ( की प्रविष्ट) होऊ लागली की आमचा लंच टाइम संपायचा ही मात्र थोडी दु:खदायक बाब असे.

थर्मॅक्समधल्या त्या दिवसांमध्ये डबा ग्रूप आणि टपरी ग्रूप हे दोन असे अविभाज्य घटक होते.


थर्मॅक्स सोडून एमड्ब्ल्यूएच ह्या एम.एन.सी मध्ये जॉइन केल्यावर मात्र, लंच रूम मधले वातावरण अगदी एम.एन.सी सारखे धीरगंभीर असायचे. मग आम्ही(म्हणजे मी आणि इतर काही मित्र) त्याला, भारतीय रंग देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पिझ्झा, बर्गर सारखे जंक फ़ूड तिथे मिळत असल्यामुळे, ३-४ किलो वजन वाढल्यावर , ते अजूनही खात नाही.

तिथूनही सोडून आता ट्रान्सटेक मध्ये गेलो. पण तिथे डबा खायचा प्रसंग अजूनही आला नाही. कारण जॉइन करुन सरळ इथे अमेरिकेतच आलो. भारतात परत गेल्यावर डब्याची मजा परत ह्या नवीन कंपनीत तशीच असेल ना असा विचार मनात येतो.

इथे लंच एकत्र बसून धमाल वगैरे कन्सेप्ट नाही. एखादा फूट लॉंन्ग सब (फूटभर तरी पाहिजेच हो त्यांना!), टयूना/सालमॉन सलाड किंवा गेलाबाजार हॅम असलं की झालं लंच.त्याच्याबरोबर ग्लासात आइसक्युब्ज आणि आइसक्युब्जांमधल्या पोकळयांमध्ये कोक! हापिसातच मागवायचं. क्युबीकलमध्ये एकटयानेच संपवायचं. किंवा चेंज म्हणून रेस्टारंटात जायचं.

डबा असा खाल्ला तर पचायचा नाही आपल्याला बुवा.घर आणि ऑफिस जवळच आहे. त्यामुळे मी लंचला घरी येतो. घरी एकटयाने, लंच करताना मात्र, इतकी वर्षे केलेली डबा खातान्ची धमाल आठवते, आणि हळवं करुन सोडते.

डियर हंटींग अमेरिका भाग -१

कोकणात, माझ्या काकांबरोबर शिकारीसाठी भरपूर हिंडलो आहे. जंगलातही खूप भटकंती केली आहे.दसरयाच्या आसपास भातशेती कापणीला आली की, काकांना हमखास बोलावणं येई. भातशेतीची नासाडी करणारया रानडुकरांचा बंदोबस्त करायला. काकांबरोबर शिकारीला ,त्यांच्या गावातली माणसं उत्सुक असायची, कारण काका कधीच काही खात नसत. फक्त शौक म्हणून शिकार करायचे. त्यामुळे शिकार झाल्यावर आपल्याला मेजवानी मिळणार ह्या विचाराने, कोणीही तयार व्हायचं. मी त्यांच्याकडे असलो की मी पण जात असे भटकायला.....

पण हे सगळं आत्ता आठवायचं कारण म्हणजे, इथे अमेरिकेत सध्या डिअर हंटींग चा मोसम चालू आहे. दरवर्षी ,ऑक्टोबर ते जानेवारी ह्या महिन्यांत असतो. क्वेल पक्षी, ससे, खारी आणी हरणांची शिकार करण्याचा हा मोसम. पण ह्याला डिअर हंटींग सिझन असंच म्हणतात. ह्या सिझनबददल एकून होतो. त्यामुळे ऑफिसमधल्या शिकारयांची माहिती काढून ठेवली होती. आमच्या ऑफिसमधील अनुभवी शिकारी, चार्ल्स ब्रायन आणी लुईस लगाटुटा ह्यांच्या बरोबर मी मागच्या वीकांताला, जंगलात शिकार बघायला गेलो होतो.

इथल्या रहिवाश्यांना, काही अटी-शर्तींची पूर्तता केल्यावर डिअर हंटींग परवाना मिळतो. बो- आर्चरी(धनुष्य-बाण), प्रिमीटीव्ह फायर आर्म्स ( ठासणीची बंदूक) आणी शॉट गन ने शिकार करण्यास परवानगी असते. शिकारी कुत्र्यांना घेउन सुद्धा शिकारीला जाता येतं आणी still (कुत्रे न घेता).ह्या प्रत्येक प्रकारे शिकार करण्याचा ठराविक कालावधी असतो. त्या त्या काळात, त्याच साधनाने शिकार करता येते. म्हणजे बो-आर्चरीच्या काळात शॉटगन ने शिकार करता येत नाही. कारण त्यामुळे इतर शिकारयांना धोका उत्पन्न होतो.

बरंच दाट जंगल जवळच असल्यामुळे डिअर हंटींग सिझनची इथे लुइझिआनामध्ये भारी क्रेझ आहे. खास हंटर टी- शर्ट, ट्राउझर, कॅप्स, हंटर शूज वगैरे जामानिमा करुन बरेच लोक जातात हंटींगला.

इथे हरिणाच्या नराला बक, मादीला डो, आणी बछड्याला फॉन असं म्हणतात.फॉनच्या शिकारीवरती पूर्णपणे बंदी आहे. डोची शिकार पूर्ण मोसमात फक्त १ आठवडयाच्या कालावधीसाठी दोनदा म्हणजे एकूण २ आठवडे करण्यास परवानगी आहे. बकची शिकार मोसमभर कधीही चालते. सूर्योदयापूर्वी अर्धा तास ते सूर्यास्तानंतर अर्धा तास अशा ठरावीक वेळेतच शिकार करता येते. म्हणजेच रात्री करता येत नाही. शिकारीसाठी राखीव अवाढव्य जंगले आहेत.

परंतु ह्या शिकारींवर निर्बंध म्हणून एक शिकारयाला जास्तीत जास्त तीन शिंगवाल्या( with antelers) आणी तीन बिनशिंगाच्या हरणांची शिकार करता येते. एका शिकारयाला, एका मोसमात वरीलप्रमाणे ६ तसेच एका दिवसात जास्तीत जास्त २ हरणांची शिकार करता येते. ही शिकार झाल्यावर, त्याच्यावर फॉरेस्ट खात्याकडून मिळालेले “किल स्टीकर” लावावे लागते. त्या स्टीकरशिवाय जंगलातून शिकार बाहेर आणता येत नाही. हे सगळं पाळलं जातय की नाही ते बघायला रेंजर्स गस्त घालत असतात.

मादी म्हणजे डो माजावर येण्याचा हंगाम साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर असा असतो. ह्या अवधीत तिचा बकशी संबंध येउन गर्भधारणा होते. त्यामुळे डो ला ह्या हंगामात मारण्यावर बंधन असते. अश्यावेळी तिची गर्भधारणा झाल्याचा संभव असतो.ह्या महिन्यांत अमावस्या ते पौर्णींमा असे पंधरा दिवस मादीसाठी गर्भधारणेसाठी योग्य असतात.

ऑक्टोबरपासून डिअर हंटींग सिझनची सुरुवात होण्याचं कारण म्हणजे,मोठ्या संख्येने, मादयांना आकर्षित करण्यासाठी जंगलात फिरणारे नर. इथल्या शिकारयांचं एथिक्स म्हणजे ते सहसा मादीला मारत नाहीत. आणी धनुष्य-बाणाने शिकार करण्याची हौस फार!!

नर माजावर आला की तो झाडाच्या बुंध्याला पुढचे दोन पाय लावून,आपली मान, डोकं आणी शिंग घासायला लागतो. आणी एक प्रकारचा गंध तिथे सोडतो. ह्याला इथे स्क्रेपिंग असे म्हणतात.अश्या अनेक पाइन वॄक्षांवर अश्या प्रकारे स्क्रेपिंग करुन झाल्यावर , त्याच्या गंधाचा सुगावा मादीला लागतो.नर पुढच्या दोन पायांनी जमीनीवरचा पाला-पाचोळा दूर करुन, जमीन थोडी खोदल्यासारखी करतो. त्या उथळ खड्ड्यात तो मूत्र विसर्जन करुनही मादीला इशारा देत असतो.

परंतु , त्याच्या गंधाने इतर इच्छुक नरसुद्धा तिथे येउन आधीच्या नराला आव्हान देतात. आणी मग सुरु होते ती त्यांची, मादीला प्राप्त करण्यासाठीची लढत.

थोडयाच दिवसांत येतोय भाग -२.. वाचत रहा .. पहा मिळाली का शिकार आम्हांला...
क्रमश:

डियर हंटींग अमेरिका भाग -२

शिंगावर किती पॉइंट्स(गाठी) आहेत त्यावर नराचे वय / प्रौढत्व ठरत असते. पूर्ण वाढ झालेल्य नराच्या शिंगांवर १०- १२ पॉइंट्स असतात. आपली डौलदार शिंगे रोखून, दोन नर एकमेकांवर चाल करुन जातात. मध्येच ते आपला राग (आणी रग!) जिरवण्यासाठी,एखाद्या झाडावर शिंगे किंवा मानेचा, तोंडाचा भाग घासतात. लढतीच्या वेळी पालापाचोळा, धूळ उडत असते. त्या दोन योदध्यांना कशाचेही भान उरत नाही.ह्या लढतीत, बलवान नराचा विजय होतो, आणि हरलेला घायाळ नर त्याच्या एरियातून निघून जातो. मग त्या एरियातील मादयांवर, जेत्या नराचा अधिकार असतो. नराने मादीला आकर्षित करुन घेण्यासाठी स्क्रेपिंग करणे आणी शेवटी त्याचा मादीशी संबंध येण्या पर्यंतच्या सगळ्या सिक्वेन्सला Rutting म्हणतात.

हुशार शिकारी, आपल्याकडील हरिणशिंगाचा एकमेकांवर घासून आवाज काढून नरांचे लक्ष वेधून घेतो. असा आवाज दोन नरांच्या झुंजीच्या वेळी तसंच नराने शिंग झाडावर घासताना येतो. त्यामुळे शिकारयाकडे अनायासेच इतर नर चालून येतात.नर बाणाच्या किंवा बंदूकीच्या टप्प्यात आल्यावर, त्याची शिकार करणं सोपं असतं. ह्या प्रकाराला Rattling म्हणतात.

पण म्हणून जंगलात कुठेही जाउन, असा शिंगांचा आवाज काढला की, नर तिकडे येतात का? नाही.

असा आवाज काढण्यासाठी, नरांची संख्या जास्त असलेला जंगली भाग निवडावा लागतो. तो भाग शोधण्याची सोपी युक्ती म्हणजे, त्या भागातील माद्या कधी पिल्ले घालतात ते पाहणे.

मादयांचे गर्भारपणाचा काळ सात महिने असतो. आधी उल्लेख केल्याप्रमाणे मादी माजावर येण्याचा हंगाम साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर असा असतो.मादयांच्या माजावर येण्याच्या हंगामात त्यांना नराची साथ मिळाली तर त्या सात महिन्यांनी पिल्ले घालतात.म्हणजेच ज्या भागातील मादया जून ते जुलैमध्ये पिल्ले घालतात, त्या भागात पुरेसे नर असतात.

ह्या काळात मादीला गर्भधारणा झाली नाही, तर ती परत पुढच्या फेब्रुवारी मध्ये माजावर येते. त्यामुळे ज्याभागात मादया सप्टेंबरमध्ये पिल्ले घालतात, त्या भागात नर कमी असतात.

इथले शिकारी ह्या आडाख्यांबरोबरच, कोणत्या भागात पाइन वॄक्षांचे स्क्रेपिंग होत आहे, तसेच पुढच्या खुरांनी जमीन उकरली गेली आहे, पाला पाचोळा विस्कटला गेला आहे ते ही बघून आपले मचाण बांधतात.

मी, चार्ल्स आणी लुई,मागच्या वीकांताला, दोन दिवस रानात फिरुन काही हाती लागले नाही.दोन दिवस जंगलात फुकाची पायपीट मात्र झाली. जंगल जवळून बघायला मिळाले ते गोष्ट निराळी!

कधी लुईचा नेम चुकायचा तर कधी चार्लीचा. एकदा तर निसटता बाण बसून बक पळून गेला. चार्ली तसा अनुभवी खिलाडी, त्यामुळे तो इकडे तिकडे जाउन टेहळणी करुन आला की त्याला त्या भागात जास्त स्क्रेपिंग दिसायचे, किंवा एखाद्या भागात त्याच्या दिव्य दॄष्टीला पाला पाचोळा विस्कटलेला दिसायचा. त्याच्या सांगण्यावरुन मचाण हलवून जीव मेटाकुटीस आला. ह्या झाडावरुन उतरुन त्या झाडावर चढून मांडया भरुन आल्या. मात्र दोन दिवसांत अमेरिकेतील डिअर हंटींगची भरपूर माहिती मिळाली. तीच इथे दिली आहे.

शेवटी येता येता एक जंगली ससा आणी एक टर्की पक्षी मिळाला. त्यांचे चार्ल्सच्या रॅंचवर बार्बेक्यू करुन,त्यावर सगळ्यांनी आडवा हात मारला. बरोबर झक्कास वेस्ट इंडियन रम!!

कोकणात मी भेकरु (हरणाचा प्रकार)च्या लुसलुशीत मांसाची सागुती खाल्ली होती. डिअर हंटींग सिझनची सुरुवात झाल्यावर चार्ल्स आणी लुईसोबत, इथेही एखादे हरिण चापायला मिळेल म्हणून गेलो होतो, पण शेवटी ससा आणी टर्कीवर समाधान मानून परत आलो.

चार्ल्स आणी लुईने अजूनही हिंमत हारलेली नाही. पुढच्या वीकांतात परत जायचे प्लॅन्स आखले जातायत. त्यांच्याकडची लुईझिआना वाईल्ड लाइफ डिपार्टमेंटने दिलेली, शिकारीवर लावण्याची “किल स्टीकर्स” त्यांना खुणावतायत.

हॅलोविन...हॅलोविन...






आज ऑफिसमध्ये हॅलोविन पार्टी होती. त्यानिमित्त हॅलोविन म्हणजे काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. १९व्या शतकात अमेरिकेत आलेल्या, आयरिश लोकांनी ही प्रथा त्यांच्याबरोबर अमेरिकेत आणली. हॅलोविनच्या आसपास हिवाळ्याची चाहूल लागते. त्यामुळे येणारया हिवाळ्यासाठी घरात, पुरेसा धान्य आणी मांसाचा साठा आहे का नाही त्याचा हिशोब, ह्या दिवशी पूर्वी (१७/१८ व्या शतकात) लावला जात असे. कारण नंतरच्या कडाक्याच्या थंडीत, बाहेर पडायची पंचाईत व्हायची.

हॅलोविन, ऑक्टोबरच्या शेवटच्या शुक्रवारी साजरा करतात. नोव्हेंबरचा पहिला शनिवार, हा ऑल हॅलोज डे किंवा ऑल सेन्ट्स डे असतो. त्यामुळे हॅलोज ईव्ह, वरुन हॅलोविन असं नाव पडलं आहे. हॅलोज ईव्ह, हॅलोज ईव्ह, असं भरभर म्हणून बघा!!

थोडं विषयांतर!! अमेरिकेत एक मात्र बरं आहे. सगळे सण,ठराविक महिन्यात, ठराविक दिवशी असतात. म्हणजे शेवटचा शुक्रवार, पहिला शनिवार, तिसरा गुरुवार वगैरे. असो.

हॅलोविन चा सण अतॄप्त आत्मे, चेटकीणी, डाकीणी, भूत-खेत- पिश्शाच, वगैरे लोकांना शांत ठेवण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे हॅलोविन पार्टीत घुबड, कावळा, कोळी, चेटकीण, डाकीण, गिधाड, काळं मांजर, हाडांचा सांगाडा, ममी ( इजिप्तमधली हो!), राक्षस अशी “त्या” कॅटॅगरीतील सोंगं काढली जातात. म्हणजे कावळ्याकडे बघण्याचा सगळ्यांचाच दॄष्टीकोन एकच की!!
भूतांच्या गोष्टी सांगितल्या जातात, हॉरर सिनेमे बघितले जातात, गूढकथा वाचल्या जातात. बोनफायर म्हणजे शेकोटीत हाडकं टाकायची प्राण्यांची. म्हणजे अतॄप्त आत्मे घरी येत नाहीत अशी इथे श्रद्धा आहे. ( अनिस वाल्यांना स्कोप आहे तर इथेही!!)
हॅलोविनच्या रात्री म्हणे इथल्या कुमारिकेने (!) मंद प्रकाशात आरश्यात एकटक बघितलं तर , तिला तिच्या होणारया पतीचा चेहरा दिसतो!!

भोपळ्याच्या केकशिवाय हा सण साजरा होत नाही. तसच लाल मोठे भोपळे कापून, त्यावर सुंदर नक्षीकाम कोरुन, त्यात मेणबत्त्या लावून, ते भोपळे घराबाहेर भूत- पिश्शाच्चांची ( लिहायला किती कठीण!) बाधा होउ नये म्हणून ठेवले जातात.

ऑफिसमधली काही भूतं खास तुमच्या साठी वरती दिली आहेत….. ह्यात एका मुलीने पॅलिनबाईंचे सोंग काढले आहे. पॅलिनबाई हे सुद्धा एक "भूत" आहे, ही विशेष दखल घेण्याजोगी गोष्ट आहे.

अजून बघायची असतील तर भेट दया माझ्या वेबअल्बमला.. त्याचा दुवा आहे..
http://picasaweb.google.com/kapilkale75/Halloween#