January 24, 2009
January 17, 2009
धैर्य धुरंधर आणि दहशतवादी पक्षी
न्यूयॉर्कमधून उड्डाण केलेल्या १५० प्रवाश्यांना घेउन जाणारया यू.एस एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्यामुळे, विमानाची दोन्ही इंजिन बंद पडली. त्यामुळे कप्तान सुलेनबर्गर ह्यांनी विमान हडसन नदीत उतरवले. ह्या त्यांच्या धाडसी निर्णयामुळे मोठी जिवीतहानी वाचली. ११ सप्टेंबरसारखा दुर्दैवी प्रसंग टाळण्यासाठी कप्तानाने लोकवस्तीचा भाग टाळून विमान नदीवर उतरवले.
आधुनिक विमाने पाण्यावर बराच काळ तरंगू शकतात. त्यासाठी पाण्यावर विमान उतरवण्याचेही खास कसब लागते. त्यापेक्षाही प्रसंगावधान महत्त्वाचे. उड्डाण सुरक्षेबद्दल आपल्याला विमानात ज्या सूचना दिल्या जातात त्यात अश्या दुर्मिळ प्रसंगी काय करावे ह्याबद्दलही सूचना असतात.
परंतु असा धाडसी निर्णय घेणे आणि त्याची पूर्ण प्रसंगावधानाने अंमलबजावणी करणे हे काम ज्यांनी केले त्या कप्तान सुलेनबर्गर ह्यांना माझा सलाम. विमानातील १५० फक्त नव्हे तर अश्या दुर्घटनाग्रस्त विमानामुळे धोका उत्पन्न झालेल्या , शहरातील इतर लोकसंख्येलाही त्यांनी वाचवले. असा निर्णय घेण्यातील थोडीशी दिरंगाई एका मोठ्या दुर्घटनेचे निमित्त झाली असती.
हडसन नदीतील १ अंश सेल्सियस तापमानात बचावकार्यासाठी फेरी, पोलिस, कोस्ट-गार्ड तत्परतेने आल्यामुळे प्राणहानी झाली नाही. सर्व १५० लोक वाचले.
सगळ्यात शेवटी कप्तान सुलेनबर्गर बाहेर आले. बाहेर येण्यापूर्वी आइल्समधून त्यांनी दोन चकरा मारुन कोणी राहिले नसल्याची खात्री करुन घेतली. त्यांना कॅप्टन करेजियस असेच म्हणावे लागेल.
पण इथे तर अमेरिकेच्या हवाई दलातील निवॄत्त वैमानिकाने आपला अनुभव आणी कौशल्य पणाला लावत, विमान नदीवर उतरवले. लगोलग मदतकार्य सुरु होउन सर्वांचे प्राण वाचले. ह्या घटनेचे विश्लेषण करताना तज्ञांनी असे सांगितले की, विमानातील हवेच्या दाबामुळे बायोनन्सी प्राप्त होते , त्यामुळे विमानाचे दरवाजे उघडले जाइपर्यन्त विमान पाण्यावर तरंगू शकते. पाण्यावर विमान उतरवताना असामान्य कौशल्याशी गरज भासते. पहिल्यांदा शेपटी पाण्यात घालून धक्का कमी करावा लागतो. इथे वैमानिक हवाइ दलात काम केलेला असल्यामुळे त्याने आपला अनुभवाच्या जोरावर ही अशक्य बाब शक्य करुन दाखवली. नदीवर हे लॅन्डींग करताना विमान पूर्णपणे वैमानिकाच्या ताब्यात होते. हे त्यांचे कौशल्य म्हणावे लागेल. अश्या धाडसी, प्रसंगावधानी कॅप्टनला सलाम.
दरम्यान आत्ताच समजलेल्या वॄत्तानुसार ह्या घटनेमागे अल- कायदाचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ह्या दहशतवादयांनी विमान अपघात घडवून आणण्यसाठी खास प्रशिक्षित पक्षी आपल्या संघटनेत भरती केले असून, असे पक्ष्यांचे थवे मुंबई, हिथ्रो, न्यूयॉर्क अश्या महत्त्वाच्या विमानतळांच्या आसपास सोडून दिले आहेत.
हे पक्षी फिदायीन असून, आपल्या जीवाची पर्वा न करता विमानाच्या इंजिनात घुसतात. विमानाची आणी पर्यायाने त्यामुळे मोठी जिवीतहानी घडवून आणाण्याचा हा मोठा डाव आहे. ह्या पक्ष्यांना अफगाणिस्ताना खास प्रशिक्षण दिले जात असून, हळूहळू जगातील सर्व महत्त्वाच्या विमानतळांच्याआसपास हे पक्षी आपला तळ ठोकतील.
अश्या पक्षांवर मनुष्यहानीस कारणीभूत ठरल्यामुळे न्यूयॉर्क न्यायालयात खटला दाखल झाल्याचेही समजले आहे. मूक मानवाच्या हत्येचा प्रयत्न करणारया पक्षांना इतके दिवस पाठिशी घालणारया मनेका, अल गोर वगैरे प्रभॄतींना सुद्धा ह्या खटल्यात प्रतिवादी केल्याचे समजते.
Subscribe to:
Posts (Atom)